रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१. ध्यानमंदिरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मन शांत होणे, त्यांना प्रार्थना केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कक्षात येतो, तसा दैवी सुगंध येणे अन् मन निर्विचार होणे

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

‘३०.४.२०२६ या दिवशी मी नामजप करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा माझे लक्ष समोर असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे गेले. त्यांचे मधुर हास्य पाहून माझे मन शांत झाले. त्या वेळी माझ्याकडून त्यांच्या चरणी आपोआप पुढील प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, आपले वास्तव्य या आश्रमात, म्हणजेच भूलोकातील वैकुंठात आहे. या आश्रमात आपल्या श्वासातून सतत चैतन्य प्रक्षेपित होत आहे. हे चैतन्य मला सतत अनुभवता येऊ दे.’ त्यानंतर मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या खोलीत येतो, तसा गोड सुगंध आला. तो सुगंध मला १५ ते २० मिनिटे येत होता. त्या दैवी सुगंधामुळे माझे मन निर्विचार झाले.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून अष्टभुजा देवीच्या रूपात दर्शन होणे आणि भावजागृती होऊन भावावस्था पुष्कळ वेळ टिकून रहाणे 

त्यानंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ एका साधकाशी बोलत आहेत. मी त्यांच्याजवळ जाताच त्यांचे मला अष्टभुजा देवीच्या रूपात दर्शन झाले. त्यानंतर मी केवळ ‘माते’, एवढेच त्यांना म्हणू शकले आणि त्यांच्या चरणांना साष्टांग नमस्कार केला.’ हे दृश्य दिसल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि बराच वेळ माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. ‘मी ध्यानमंदिरात आहे’, हे विसरून गेले होते. ही माझी भावावस्था पुष्कळ वेळ टिकून होती.

३. मी सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३९ वर्षे) यांना या अनुभूतींविषयी सांगितल्यावर त्यांनाही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या खोलीत जसा सुगंध येतो, तसा सुगंध आला.

‘हे गुरुदेवा, आपण आम्हा साधकांना आपल्या छत्रछायेत ठेवले आहे. आपण आम्हा सर्वांवर कृपा करत आहात’, त्याबद्दल आम्ही सर्व साधक आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.