मिरज (सांगली) येथे हिंदु युवकावर प्राणघातक आक्रमण करणार्‍या मतीन काझीसह ६ जणांना पोलिसांकडून अटक !

टोळी युद्धाचा कट उधळला

 प्रातिनिधीक इमेज

मिरज – येथील टाकळी रस्ता परिसरात प्रदीप उपाख्य शिव अथणीकर या हिंदु युवकावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांध मतीन काझी अन् त्याचे ५ साथीदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही कह्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून हे जीवघेणे आक्रमण करण्यात आले असून मिरज शहर पोलिसांनी सतर्कता दाखवत संभाव्य टोळी युद्ध आणि प्रतिआक्रमणाचा मोठा कट उधळून लावला आहे.

२ जूनला प्रदीप अथणीकर यांच्यावर आरोपींनी तलवार आणि कोयत्याने भीषण आक्रमण केले होते. या आक्रमणात अथणीकर गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. घटनेनंतर संशयित आक्रमणकर्ते घटनास्थळावरून पसार झाले होते. मुख्य संशयित मतीन काझी आणि त्याच्या टोळीला अटक केली. मतीन काझी (सराईत गुन्हेगार, पूर्वी हद्दपारीची कारवाई झालेला), शौकत शेख (सराईत गुन्हेगार), आयान लांडगे, शोएब शेख, शाकिब खान अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा म्हणाले की, न्यायालयाने सर्व आरोपींना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही जप्त केली आहे.

प्रदीप अथणीकर यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर आरोपी मतीन काझी आणि त्याच्या टोळीवर प्रतिआक्रमण करण्याची सिद्धता चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत गोविंद नाईक, रिहान तौफिक शिकलगार, राजू अजीज मुल्ला, अनीश अल्ताफ सौदागर आणि अल्फाज अखिल मुल्ला या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २ कोयते, १ लोखंडी रॉड आणि १ मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांचा धाक अल्प झाल्याने गुन्हे करणार्‍यांचे मनोबल वाढले आहे, पोलीस त्यांची कार्यक्षमता कधी वाढवणार ?