दैनिक ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादकांनी ११ वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांकडून जाणून घेतला शिक्षणव्यवस्थेतील भयावह अपप्रकार !
मे २०२६ मध्ये झालेल्या ‘नीट यूजी’ परीक्षेची (राष्ट्रीय पात्रता परीक्षेची) प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. याचे अन्वेषण करता-करता अन्वेषण यंत्रणांनाही कल्पना नव्हती, असे समाजाला सुसंस्कृत करणार्या शिक्षणव्यवस्थेचा बिभत्स चेहरा जगासमोर आला. जेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या उपसंपादकांनी या संदर्भात ११ वी आणि १२ वी इयत्तांत शिकणार्या काही प्रतिभावान विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला, तेव्हा ‘नीट पेपरफुटी’चे संपूर्ण प्रकरण भलेही राष्ट्रव्यापी असले, तरी ते हिमनगाचे टोक आहे, हे त्यांना उमगले. यातून शिक्षणव्यवस्थेचे नैतिकीकरण नव्हे, तर अध्यात्मीकरण करणे का आवश्यक आहे, हे या कमालीच्या भयावह अपप्रकारांतून लक्षात येईल. विद्यार्थ्यांच्या शब्दांतच हे अपप्रकार मांडण्याचा अल्पसा प्रयत्न !

१. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थीच शाळा-महाविद्यालयांवर आणतात दबाव ?
अलीकडे विद्यार्थ्यांनी ११ वी-१२ वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी निर्लज्जपणाचे टोक गाठले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये त्यांना उत्तीर्ण होण्याची हमी असते, तेथेच ते प्रवेश घेतात. ते संबंधित शिक्षकांना बिनदिक्कतपणे विचारतात, ‘तुमच्या महाविद्यालयात ‘कॉपी’ अथवा इतर गैरप्रकार होत असतील, तरच आम्ही येथे प्रवेश घेऊ.’ संबंधितांनी नकार दिल्यास त्यांना पैशांचे आमीष दाखवले जाते अथवा त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यांना गैरप्रकार करण्यास भाग पाडण्यात येते. अनेक महाविद्यालये अशा दबावांना भुलून ‘अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा’, म्हणून त्यांना प्रवेश देतात आणि परीक्षांमध्ये अपप्रकारांना वाट करून देऊन मोकळे होतात. आमच्या शहरांमधील अनेक महाविद्यालयांत असे चित्र पहावयास मिळते. (आजच्या शिक्षणक्षेत्राची झालेली दुरवस्था पहाता सूज्ञ नागरिकांचे मनही विषण्ण होईल. उद्या हे विद्यार्थी नागरिक बनल्यानंतर ते देशाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहेत, याचा विचार एक व्यवस्था म्हणून करण्याचे दायित्व कुणाचे ? हाच यामुळे मोठा प्रश्न आहे. – संपादक)
२. स्वत:च्या महाविद्यालयाचा निकाल चांगला लागण्यासाठी प्राध्यापकच विद्यार्थ्यांना अपप्रकार करण्यास देतात प्रोत्साहन !
२ अ. प्रश्नपत्रिका देऊन उत्तरे लिहून घेण्यास प्रवृत्त करणारे प्राध्यापक ! : अनेक वेळा महाविद्यालयांचा निकाल चांगला लागण्यासाठी स्वतः प्राध्यापकच अपप्रकारांना प्रोत्साहन देतात. काही महाविद्यालयांनी १२ वी बोर्डातील ‘माहिती तंत्रज्ञान’ विषयाची परीक्षा स्वतःच्याच महाविद्यालयात आयोजित केली होती. त्यांनी त्या दिवशी विद्यार्थ्यांना भ्रमणभाष आणायला सांगितला. त्यातून प्रश्नपत्रिका ‘स्कॅन’ करून विद्यार्थ्यांना उत्तरे लिहून घेण्यास सांगितले. अशा विषयांमध्ये प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याला ‘पूर्णचे पूर्ण गुण मिळतील’, याची सुनिश्चिती करून घेतात. (भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. शिक्षणक्षेत्रात ‘कॉपी करणे’ हे भ्रष्ट वर्तनच होय. त्यामुळे जर अशी पिढी निपजत असेल, तर भारत कधीतरी आध्यात्मिक विश्वगुरु बनेल का ? – संपादक)
२ आ. बोर्डाच्या परीक्षेत ‘कॉपी (नक्कल) कशी करायची ?’, याचे सभेद्वारे शाळांकडून ‘अधिकृत मार्गदर्शन’ ! : महाराष्ट्र सरकारने १० वीच्या परीक्षेचे नियम कडक केले आहेत. एका विद्यालयात १० वीच्या बोर्डाची परीक्षा होणार होती. सर्व विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक (सीट नंबर) आल्यावर शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांची सभा घेतली. त्या सभेत ‘आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यास (कॉपी करण्यास) साहाय्य करा’ अथवा ‘शेवटच्या १५ मिनिटांत त्यांना उत्तरे सांगा’, असे सांगितले. एवढेच नाही, तर ‘अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांशी गोड-गोड बोलून त्यांच्याकडूनही साहाय्य मिळत असेल, तर पहा’, अशा स्वरूपाचे चक्क मार्गदर्शन केले.
३. आधुनिक काळात प्रश्नपत्रिका फुटीला मिळालेले ‘डिजिटल’ स्वरूप
१० वी आणि १२ वी यांचे ‘ऑनलाईन’ वर्ग घेणार्या लक्षावधी ‘सबस्क्रायबर्स’ (सभासद) असलेल्या काही ‘यू ट्यूब’ वाहिन्यांवर परीक्षेच्या आदल्या दिवशी अथवा परीक्षेच्या दिवशी भल्या पहाटे ‘यू ट्यूब लाईव्ह’ (लाईव्ह प्रक्षेपण) असते. त्यात ७० ते ८० टक्के प्रश्नपत्रिका फोडली जाते. ‘हेच प्रश्न विचारले जातील’, हे साहजिकच उघडपणे सांगितले जात नाही; परंतु अप्रामाणिक विद्यार्थ्यांची यंत्रणा कामाला लागलेली असते. ज्या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची पात्रता नसते किंवा ज्यांनी वर्षभर काहीच परिश्रम घेतलेले नसतात, ते अशा गोष्टींचा अपलाभ उठवतात आणि चुकीच्या मार्गाने अधिक गुण मिळवतात. शेवटी प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पदरी अन्यायच येतो. (या सगळ्यातून यंदाच्या ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे एकच प्रकरण आपल्यासमोर आले, असे म्हटले पाहिजे. अन्यथा प्रश्नपत्रिका कशा फुटतात आणि त्यातील प्रश्न कुठपर्यंत येऊन ठेपतात, त्याची साखळी कशी गुंफलेली असते, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे ! – संपादक)
४. विविध उपाययोजना करूनही नक्कल करण्याचे प्रकार चालूच
अलीकडे १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये ‘सीसीटीव्ही’, ‘झूम मॉनिटरिंग’ (छायाचित्रकांच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवणे) आणि ‘ड्रोन सर्व्हिलन्स’ यांचा वापर होत असूनही काही ठिकाणी सामूहिक नक्कल (mass copying) करण्याची प्रकरणे समोर आली आहेत. काही परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित केल्यावर विद्यार्थी वर्गाबाहेर असलेल्या त्यांच्या ‘नियोजित’, म्हणजेच ‘विकत घेतलेल्या’ सहकार्याला प्रश्नपत्रिका पुरवतात. तो सहकारी तेथीलच एखादा शिपाई अथवा कर्मचारी असतो. तो मिळालेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे काही वेळात निर्धारित लोकांकडून उत्तरपत्रिका सिद्ध करवून घेतो, त्याची ‘प्रिंट’ काढतो आणि परीक्षा केंद्रावरील प्रसाधनगृहात लपवतो. थोड्या वेळाने विद्यार्थी प्रसाधनगृहात जाण्याच्या नावाखाली उत्तरपत्रिका पहातात. नियमाप्रमाणे परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला असलेली ‘प्रिंट’ची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत असतात; परंतु हे सर्व पूर्वनियोजन करून चलाखीने केले जाते.
५. विद्यार्थ्यांकडून वार्षिक परीक्षेऐवजी स्पर्धा परीक्षांना प्राधान्य
आजच्या युगात स्पर्धा परीक्षांचे (नीट, आयआयटी जेईई, सीईटी आदींचे) महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासावर भर देतात आणि १२ वीचा अभ्यास करणे टाळतात. त्यानंतरही त्यांना १२ वीत चांगले गुण मिळवण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते वरील अनधिकृत मार्ग अवलंबतात. असे विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या अधिकारी पदावर पोचले, तर आदर्श कारभार करतील का, हा खरा प्रश्न आहे. अशा घटनांमुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळून देशाची अतोनात हानी होत आहे.
६. बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
एका ठिकाणी काही प्राध्यापक नियम धाब्यावर बसून १२ वीच्या उत्तरपत्रिका पडताळत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. त्यात संबंधित शिक्षक सिगारेट आणि मद्यपान करत असल्याचे दिसत होते. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक यांनी संताप व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली. या घटनेमुळे बोर्ड परीक्षा मूल्यमापन प्रक्रियेत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. (याचा अर्थ पहा. परीक्षांचा काळाबाजार तर आहेच. याखेरीज उत्तरपत्रिका पडताळण्यातही भोंगळपणा आहेच. अशा शिक्षणव्यवस्थेतून भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी सिद्ध होईल का, याचा प्रत्येक नागरिकाने स्वत:ला प्रश्न केला पाहिजे, तसेच या विरोधात आपल्या पाल्यांना सुसंस्कारित करण्याची नितांत आवश्यकता आहे ! – संपादक)
(आता २१ जूनला ‘नीट’ पुनर्परीक्षा होत असून त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटता कामा नये, यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे या वेळी तरी अशा प्रकारे कोणताही अपप्रकार होणार नाही, अशी अपेक्षा करूया !)
– राष्ट्र-धर्मप्रेमी विद्यार्थी-विद्यार्थिनी
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार