प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !

श्री. आत्माराम जोशी

१. सौ. अर्चना संदेश बर्वे (श्री. आत्माराम जोशी यांची मोठी मुलगी), फोंडा, गोवा.

१ अ. ईश्वरप्राप्तीची तळमळ आणि गुरुदेवांवर नितांत श्रद्धा ठेवून साधनेसाठी स्वतःला गुरुकार्यात झोकून देणे : ‘वर्ष १९९० मध्ये आमचे काका श्री. प्रकाश जोशी यांच्यामुळे आमचे कुटुंब सनातन संस्थेच्या संपर्कात आले. आरंभी कुलदेवीचा नामजप, सत्संग, सेवा असे करता करता आमचे घर प्रचार आणि प्रसार यांचे मुख्य केंद्र बनले.

सौ. अर्चना संदेश बर्वे

लहानपणापासून आम्ही तिघी बहिणींनी आई सौ. शकुंतला जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७५ वर्षे) आणि बाबा यांना सर्व कौटुंबिक कर्तव्ये पार पाडत अतिशय निष्ठेने सेवा करतांना पाहिले आहे. माझी आई आणि माझे तीनही काका श्री. भास्कर जोशी (वय ६९ वर्षे), श्री. प्रकाश जोशी (वय ६६ वर्षे) आणि श्री. सदानंद जोशी (वय ६४ वर्षे) यांनी नोकरीचा त्याग करून सनातन संस्थेच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. यावरून त्यांची ईश्वरप्राप्तीची तळमळ आणि गुरुदेवांवरील नितांत श्रद्धा दिसून येते. अशा आध्यात्मिक वातावरणात आम्ही वाढलो, हे आमचे भाग्य ! साधनेतून मिळालेल्या दृष्टीकोनांमुळे आम्हाला आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती मिळाली. आमच्या घरात झालेले सनातन संस्थेचे कार्य, साधक आणि संत यांचे वास्तव्य यांमुळे आमच्या घराला मंदिरासारखे पावित्र्य प्राप्त झाले आहे.

१ आ. कष्टाळू, निश्चयी आणि प्रेमळ वडील अन् शांत, संयमी अन् काटकसरी आई : आमच्या बाबांचा स्वभाव अतिशय कष्टाळू आणि निश्चयी (जिद्दी) आहे. त्यांनी कठीण परिस्थितीतही उच्च शिक्षण (एम्.ए.बी.एड्.) घेऊन स्वतःचे घर बांधले आणि आपल्या भावंडांनाही उच्च शिक्षण घेण्यासाठी साहाय्य केले. बाबांच्या प्रेमळ स्वभावामुळे कुटुंबातही त्यांना आदराचे स्थान आहे. आमची आई सौ. शकुंतला जोशी हिने माझ्या बाबांना चांगली साथ दिली. आईचा स्वभाव शांत, संयमी आणि काटकसरी आहे. तिने कुटुंबातील सर्व नाती जपली आहेत.

२. सौ. आदिती पार्थ महाजन (श्री. आत्माराम जोशी यांची दुसरी मुलगी), फोंडा, गोवा.

सौ. आदिती पार्थ महाजन

‘बाबांची आध्यात्मिक प्रगती झाली असावी’, याची आम्हा सगळ्यांनाच पुष्कळ आधीपासून जाणीव होती.

२ अ. देवभक्तीत लीन : बाबा नेहमी देवभक्तीत लीन असतात. ते नित्य संध्या आणि पूजा करतात.

२ आ. स्वयंशिस्त : त्यांना कुठेही बाहेर जायचे असल्यास ते वेळेच्या आधी तयार असतात. एखादा कार्यक्रम असतांनाही ते त्यांच्या ठरलेल्या वेळी जेवतात आणि ठरलेल्या वेळी झोपतात. त्यांच्या दैनंदिन कृतींकडे पाहून ‘किती वाजले ?’, हे लक्षात यावे, एवढा त्यांचा दिनक्रम नियोजित असतो. बाबा नेहमी शिस्तबद्ध जीवन जगत आले आहेत आणि आम्हा तिघी बहिणींनाही त्यांनी तशीच शिस्त लावली आहे. त्यांचे कपड्यांचे कपाट असो वा वस्तूंचे, ते नेहमीच व्यवस्थित असते. ते त्यांच्या कपाटात ‘एखादी वस्तू कुठे ठेवली आहे’, हे सहजतेने सांगतात.

२ इ. काटकसरी : बाबा कोणतीही गोष्ट वाया घालवत नाहीत, तसेच ते आवश्यकतेपेक्षा अधिक व्ययही करत नाहीत.

२ ई. प्रेमभाव : ते अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ आहेत. बाबा एखाद्याला नोकरी मिळवून देणे किंवा एखाद्याचे लग्न जुळवणे अशा गोष्टी तळमळीने करतात. ते घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खाऊ देतात.

२ उ. इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणे : बाबा एखाद्या व्यक्तीचे काम करत असतांना त्यात बाबांचा कोणताही स्वार्थ नसतो. ‘त्यांनी कोणाला कसे साहाय्य केले’, हे त्यांच्या लक्षातही नसते. बाबांनी एखाद्या व्यक्तीला साहाय्य केल्यास ते त्याविषयी वाच्यता करत नाहीत.

२ ऊ. बाबा नेहमी वर्तमानकाळात जगतात.

२ ए. अल्प अहं : बाबांची आर्थिक स्थिती उत्तम आहे; मात्र त्याचा त्यांना अहं नाही. त्यांना अपार कष्टातून मिळालेल्या मानसन्मानाविषयी ते कधीच सांगत नाहीत.

२ ऐ. इतरांच्या आनंदात सहभागी होणे : बाबा नेहमी आनंदी असतात. इतरांच्या संदर्भात चांगली गोष्ट घडल्यास स्वतःच्याच संदर्भात चांगले घडले, अशाप्रकारे बाबांना आनंद होतो.

२ ओ. बाबांचा सहवास सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. बाबांशी बोलल्यावर मला हलकेपणा जाणवतो.

‘ईश्वर आई-बाबांना दीर्घ निरोगी आयुष्य देवो आणि त्यांची यापुढची आध्यात्मिक उन्नती अशीच करत राहो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

 ३. सौ. अनन्या (अंकिता) अनिश बोरकर (श्री. आत्माराम जोशी यांची लहान मुलगी), सांगली

सौ. अनन्या बोरकर

३ अ. प्रेमभाव : ‘बाबांच्या मनात एखाद्याविषयी नकारात्मक विचार आल्यास त्यांच्या मनात ते विचार फार काळ टिकत नाहीत. त्यांच्याशी कोणी वाईट वागले, तरीही ते सर्व विसरून जातात. बाबांना त्या व्यक्तीविषयी प्रेमच वाटत असते. एखादी व्यक्ती अडचणीत असतांना बाबा स्वतःचीच अडचण असल्याप्रमाणे समजून ती दूर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात.

३ आ. ईश्वराप्रतीचा भाव : बाबा सांगतात, ‘‘कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जातांना ईश्वराला प्रार्थना करूनच घराबाहेर पडावे आणि ते काम पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी.’’ त्यांनी आम्हाला लावलेल्या या सवयीमुळे माझ्या आयुष्यातील सर्वच महत्त्वाच्या टप्प्यांवर मला ईश्वराची साथ मिळाली आणि अनेक गोष्टी सुखकर झाल्या.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.४.२०२६)