दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !

४.६.२०२६ या दिवशी शिरोडा (फोंडा, गोवा) येथील सनातनचे साधक श्री. धर्मा नाईक (धर्माभाऊ) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. सविता नाईक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. धर्मा नाईक आणि सौ. सविता धर्मा नाईक

श्री. धर्मा नाईक यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. दैनिकाच्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि वेळेतच करणे

‘गोव्यात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यापासून आतापर्यंत माझे यजमान श्री. धर्मा नाईक (धर्माभाऊ) दैनिकाच्या वितरणाची सेवा अविरतपणे करत आहेत. पहाटे ५.३० वाजता गजर वाजण्याच्या आधी ते उठतात आणि नामजप करतात. त्यानंतर ते वितरणाच्या सेवेसाठी बाहेर पडतात आणि सकाळी ७ वाजण्यापूर्वी ती सेवा पूर्ण करतात.

२. कोणत्याही स्थितीत वितरणाच्या सेवेत खंड पडू न देणे

पूर्वी यजमान नौकेवर (बोटीवर) काम करत होते. तेव्हा त्यांना १५ दिवस काम असायचे आणि १५ दिवस सुटी असायची. सुटीत घरी आल्यावर ते सायकलवर दैनिकाचे वितरण करायचे. पुढे त्यांना मणक्याचा त्रास चालू झाला. त्यामुळे ते पायी चालत सेवा करू लागले; पण त्यांनी वितरणाच्या सेवेत कधीही खंड पडू दिला नाही.

३. नियोजनकौशल्य 

स्वतःच्या वैयक्तिक अडचणी असोत किंवा दैनिकाच्या वर्गणीच्या वसुलीच्या वेळी होत असलेला शारीरिक त्रास, यजमान इतर साधकांचे साहाय्य घेऊन वितरण आणि वसुली यांचे व्यवस्थित नियोजन करतात.

४. ‘वाचकांना वेळेत अंक मिळत आहे ना ?’, याची ते आवर्जून निश्चिती करतात.

५. वाचकांपर्यंत दैनिक वेळेत पोचवण्याची तळमळ

‘दैनिक ‘सनातन प्रभात’चा आजचा अंक वाचकांना आजच आणि सकाळीच मिळाला पाहिजे, तरच त्याला महत्त्व आहे. दैनिक दुपारी किंवा दुसर्‍या दिवशी देऊन उपयोग नाही’, असा त्यांचा भाव असतो. यातून त्यांची परात्पर गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) विचार वाचकांपर्यंत वेळेत पोचवण्याची तीव्र तळमळ दिसून येते.

औषधोपचारांच्या समवेत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय श्रद्धेने केल्यावर १५ दिवसांत डोळ्यांचा त्रास दूर होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘वर्ष २०२३ मध्ये यजमानांना डोळ्यांचा पुष्कळ त्रास झाला. आधुनिक वैद्यांच्या औषधोपचारांनी त्यांना काहीच लाभ झाला नाही. त्यानंतर त्यांनी आयुर्वेदीय उपचार चालू केले. वैद्यांनी त्यांना सांगितले, ‘‘त्रास दूर व्हायला ३ मास लागतील.’’ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांनी यजमानांना नामजपादी उपाय सांगितले. यजमानांनी गुरुदेवांवर अनन्य श्रद्धा ठेवून ते उपाय केले. नामजप आणि प्रार्थना यांच्या बळावर अवघ्या १५ दिवसांत त्यांच्या डोळ्यांचा त्रास दूर झाला. गुरुदेवांच्या कृपेने त्यांना ही अनुभूती आली.’

– सौ. सविता धर्मा नाईक (श्री. धर्मा नाईक यांची पत्नी, वय ६५ वर्षे), शिरोडा, फोंडा, गोवा. (२.६.२०२६)

६. शारीरिक त्रास होत असूनही शांत आणि स्थिर असणे

आता वयोमानानुसार त्यांना पाठदुखी आणि गुडघेदुखी यांचा त्रास चालू झाला आहे. हा त्रास होत असतांनाही ते चिडचिड करत नाहीत. ते शांत आणि स्थिर असतात.

७. कोरोना महामारीच्या काळातही यजमानांनी प.पू. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर सर्व नियमांचे पालन करून दैनिकाचे वितरण चालूच ठेवले.

‘गुरुदेवांनीच माझ्याकडून माझ्या यजमानांची गुणवैशिष्ट्ये लिहून घेतली’, याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सविता धर्मा नाईक (श्री. धर्मा नाईक यांची पत्नी, वय ६५ वर्षे), शिरोडा, फोंडा, गोवा. (२.६.२०२६)