संपादकीय : ने मजसी ने…!

प्रतीकात्मक छायाचित्र

एकेकाळी ज्या ब्रिटनमध्ये स्थायिक होण्यासाठी भारतियांमध्ये स्पर्धा असायची, आज त्याच ब्रिटनमधून स्वदेशी परतण्याची भारतियांमध्ये जणू स्पर्धा लागली आहे. यामागचे कारणही तसेच आहे. सध्या संपूर्ण जग, विशेषतः युरोपातील अनेक देश आज अनियंत्रित स्थलांतराच्या समस्येने त्रस्त आहेत. विशेषतः इस्लामी स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे सामाजिक तणाव, सांस्कृतिक संघर्ष, गुन्हेगारी आणि सुरक्षेचा प्रश्न यांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी सांस्कृतिक ओळख पुसली जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या स्थलांतरितांमुळे अनेक देशांच्या लोकसंख्येपासून अर्थव्यवस्थेपर्यंत सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होत आहेत. परिणामी फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड यांसारख्या देशांतील स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. युरोपातील राजकीय चर्चांमध्ये स्थलांतर हा सर्वांत महत्त्वाचा विषय बनला आहे. या अर्थाने ही सध्या एक जागतिक समस्या बनली आहे. ब्रिटनमध्ये तर स्थलांतरितांच्या लोंढ्यांमुळे लंडन ‘लंडनिस्तान’ (इस्लामीकरण) होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे तिथे रहाणार्‍या सुशिक्षित आणि शांतताप्रिय भारतियांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अन् हेच त्यांच्या भारतात परतण्यामागचे मुख्य कारण आहे.

काही दशकांपूर्वी भारतियांमध्ये ‘परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे’, अशी एक भ्रामक धारणा होती. विशेषतः इंग्लंड, अमेरिका, कॅनडा किंवा युरोपातील देश, म्हणजे यशाचे शिखर, असा मतप्रवाह होता. पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखसोयी या अस्थायी गोष्टी शाश्वत यशाच्या मापदंड बनल्या. या कथित आणि क्षणिक यशासाठी लाखो भारतियांनी मातृभूमीला ‘राम राम’ केला. ‘भारतात संधी नाहीत, व्यवस्था नाही, भविष्य नाही’, अशी टीका करत अनेकांनी परदेश गाठले.

इंग्लंडमधील भारतियांची संख्या गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात वाढली. इंग्लंड आणि वेल्स यांच्या वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार तेथे अनुमाने १८ लाख ६४ सहस्र भारतीय वास्तव्यास आहेत. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या अनुमाने ३.१ टक्के इतके आहे. भारतीय हा तेथील सर्वांत मोठा आशियाई समुदाय मानला जातो. तथापि अलीकडील काळात चित्र वेगाने पालटतांना दिसत आहे. वर्ष २०२४-२५ या कालावधीत अनुमाने ५८ सहस्र भारतियांनी इंग्लंड सोडले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह नोकरी-व्यवसाय करणार्‍यांचा  समावेश आहे. यात स्थलांरितांच्या समस्येसह सामाजिक असुरक्षितता, रोजगाराच्या अल्प संधी, स्थलांतरविषयक कठोर धोरणे आदी कारणांचा समावेश आहे. परिणामी ज्यांना एकेकाळी भारत सोडणे, हेच प्रगतीचे प्रतीक वाटत होते, त्यांच्याच मनात ‘गड्या आपला देश बरा’, ही भावना निर्माण झाली आहे. त्यांना आता हे कळून चुकले आहे की, पैसा सर्वस्व नसतो. तो जिवापेक्षा मोठा तर अजिबात नसतो. मातृभूमीची ऊब कोणत्याही भौतिक सुखात मिळू शकत नाही. त्यामुळेच आज ते ब्रिटनला सोडून भारतात परतत आहेत. काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मातृभूमीच्या ओढीने अस्वस्थ केले होते. त्यातून त्यांना ‘ने मजसी ने’, हे अजरामर गीत स्फुरले. अर्थात् त्यांची अस्वस्थाही किंवा परदेश त्यागण्याची भूमिका ही त्यांच्या भारताप्रती असलेल्या उच्च कोटीच्या प्रेमापोटी होती. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करायचे त्यांचे  जीवनध्येयच होते. आज भारतात परतणार्‍या भारतियांनी सावरकर यांच्याकडून बोध घेऊन भारतासमोरील संकटातून देशाला मुक्त करण्याचे जीवनध्येय घेतले पाहिजे, ही त्यांची मातृभूमीप्रती कृतज्ञताच ठरेल !