आखाती युद्धाच्या आंतरराष्ट्रीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधनबचत ही केवळ घरगुती नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यही आहे. स्वयंपाकघरातील साध्या; पण शिस्तबद्ध सवयी अवलंबल्यास ‘एल्.पी.जी.’ (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस – द्रवीकृत पेट्रोलियम वायू) सिलिंडर पूर्वीपेक्षा अनेक दिवस टिकू शकतो आणि महिन्याचा व्ययही लक्षणीयरित्या न्यून होऊ शकतो.

१. भारतात इंधन आणि ‘एल्.पी.जी.’ पुरवठा सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेवू नका !
सध्याच्या जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘भारतात इंधनटंचाई निर्माण होईल’, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशाला आश्वस्त केले आहे की, भारताकडे पुरेसा साठा असून पुरवठा साखळीही पूर्णपणे सुरक्षित आहे.
गॅस लवकर का संपतो ?
स्वयंपाकघरातील सवयी पालटल्यास सिलिंडर जास्त दिवस टिकवता येतो. भारतातील काही शहरांत ‘एल्.पी.जी.’चा तुटवडा जाणवतो. त्यामुळे घरगुती पातळीवर गॅसची बचत करणे महत्त्वाचे आहे. घरगुती स्वयंपाक, गिझर, सतत उकळणारे पाणी इत्यादी कारणांनी सिलिंडर लवकर संपतो; पण योग्य सवयींमुळे तो काही महिने टिकवता येऊ शकतो.
- भांड्यांवर झाकण न ठेवता स्वयंपाक केला जात असल्याने उष्णता बाहेर जाऊन वेळ आणि गॅस दोन्ही अधिक प्रमाणात लागतो.
- काही वेळा लहान भांडे मोठ्या बर्नरवर किंवा मोठे भांडे लहान बर्नरवर ठेवले जाते. न भिजवलेले कडधान्य, चणे, राजमा आदी पदार्थ थेट गॅसवर शिजवले जातात. यांत वेळ आणि गॅस दोन्ही दुपटीने लागतात.
- घाणेरडे किंवा अडथळे असलेले बर्नर वापरल्यास ज्वाळा तिरक्या होतात. उष्णता वाया जाते आणि गॅस अनुत्पादक जळतो.
- सर्व साहित्य सिद्ध होण्याआधीच म्हणजे भाज्या चिरतांना किंवा मसाले गोळा करतांना गॅस चालू ठेवल्यास तो विनाकारण चालू रहातो.
- नेहमी प्रखर आचेवर स्वयंपाक केल्याने अन्न जळण्याचा धोका वाढतो, तसेच गॅसचा वापरही अपेक्षेपेक्षा जास्त होतो.
गॅसबचतीसाठी उपयोगी सवयी – स्वयंपाकपूर्व सिद्धता
- चिरणे, धुणे, मसाले मोजणे पूर्ण झाल्यावरच गॅस चालू करा.
- कडधान्ये, चणे, राजमा, तांदूळ काही घंटे किंवा रात्रभर भिजत ठेवा. त्यामुळे ते लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते.
– ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)
२. ‘एल्.पी.जी.’च्या नोंदणीत वाढ; पण साठा पुरेसा !
युद्धजन्य परिस्थितीमुळे भयग्रस्त वातावरण निर्माण झाले. ‘एल्.पी.जी.’च्या नोंदीत मोठी वाढ झाली. युद्धापूर्वी प्रतिदिन सरासरी ५५ लाख ७ सहस्र सिलिंडरांची नोंद केली जात होती. आता तो आकडा ७५ लाख ७ सहस्रांपर्यंत पोचला आहे. प्रतिदिन अनुमाने २० लाख सिलिंडरांची वाढ ‘पॅनिक बुकिंग’मुळे (अफवेमुळे) झाली आहे.
देशातील २५ सहस्र वितरकांकडे सिलिंडरांचा पुरेसा साठा आहे. जरी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा जलमार्ग विस्कळीत झाला असला, तरी भारताने अमेरिका, कॅनडा आणि रशिया यांसारख्या देशांकडून आयात वाढवून पर्यायी मार्ग शोधले आहेत. नुकतीच ‘एल्.पी.जी.’च्या उत्पादनात २८ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती ‘पी.एन्.जी.’ (पाईप्ड नॅचरल गॅस – पाईपद्वारे पुरवण्यात येणारा नैसर्गिक वायू) आणि वाहनांसाठीचा ‘सी.एन्.जी.’ (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस – वाहनांसाठी वापरला जाणारा दाबाचा गॅस) पुरवठा कपातीविना चालू राहील.
भारताची तेलशुद्धीकरण (रिफायनरी) क्षमता २५८ दशलक्ष मेट्रिक टन असून सर्व रिफायनरीज १०० टक्के क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा अभाव नाही. औद्योगिक ग्राहकांसाठी ‘कोल इंडिया’ला अतिरिक्त कोळसा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
३. अफवा पसरवणार्यांना चेतावणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, काही लोक राजकीय स्वार्थासाठी किंवा नफेखोरीसाठी ‘एल्.पी.जी.’च्या उपलब्धतेची भीती पसरवत आहेत. अशांवर कठोर कारवाई केली जाईल. वर्ष २०१४ मध्ये देशात १४ कोटी गॅस जोडण्या होत्या. ती संख्या आता ३३ कोटींहून अधिक झाली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा भक्कम आहेत.
४. गॅस सिलिंडर नोंदणीतील अडचणी आणि उपाय

‘सिलिंडर नोंदणी’ची मुदत २१ दिवसांवरून २५ दिवस अशी केल्यामुळे आणि भ्रमणभाष यंत्रणा व्यस्त लागत असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यावर पुढील पर्याय काढा !
अ. विनाकारण सिलिंडर साठवून ठेवू नका.
आ. शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतरानेच नोंदणी स्वीकारली जाईल.
इ. समाजमाध्यमांवरील अपुर्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारी निवेदनांकडे लक्ष द्या.
५. स्वयंपाक करतांना घ्यावयाची काळजी
अ. शक्य तिथे शिजपात्राचा (कुकर) वापर करा. डाळ, चणे, राजमा, भात, तसेच काही भाज्या शिजपात्रात अल्प वेळेत शिजतात.
आ. भांड्यावर नेहमी झाकण ठेवा. त्यामुळे उष्णता आत रहाते. अन्न लवकर शिजते आणि सिलिंडर जास्त दिवस टिकतो.
इ. एखाद्या अन्नपदार्थाला उकळी आल्यावर त्याची आंच मध्यम किंवा मंद करा. मध्यम आचेवर अन्न चांगले अन् समान शिजते, तसेच गॅसचा खर्चही न्यून होतो.
ई. भांड्याच्या आकाराला साजेसा बर्नर वापरा. योग्य बर्नर निवडल्यास उष्णतेचा अपव्यय टाळता येतो.
६. स्वच्छता आणि देखभाल कशी करावी ?
अ. गॅसचा बर्नर, तसेच ज्वाळा येणारी छिद्रे नियमित स्वच्छ करा. त्यामुळे निळसर समसमान ज्वाळा मिळते आणि गॅसचा खर्च न्यून होतो.
आ. गॅस, तसेच स्टोव्हच्या भोवती तेलकट थर, तसेच अन्नकण राहू देऊ नका. स्वच्छ पृष्ठभागावर उष्णता अधिक कार्यक्षमतेने वापरली जाते.
इ. छोट्या छोट्या सवयींतून मोठा लाभ होतो. पाणी, दूध, चहा उकळतांना आवश्यक तेवढेच पाणी वापरा. जास्त पाणी उकळण्यासाठी अतिरिक्त गॅस लागतो.
ई. शक्य असेल तिथे ‘बॅच कुकिंग’ (एकाच वेळी अधिक प्रमाणात स्वयंपाक करून तो साठवून ठेवणे) करावे. त्यामुळे वारंवार गॅस पेटवण्याचा वेळ वाचतो.
उ. ‘एल्.पी.जी.’सह सौर कुकर, इंडक्शन प्लेट (विजेवर चालणारी शेगडी), ‘थर्मास फ्लास्क’ (उष्णतारोधक बाटली) वापरल्यास प्रतिदिनचा गॅसचा वापर न्यून होतो.
७. संकटकाळातील संयम, सहकार्य आणि राष्ट्र्रीय कर्तव्य
प्रत्येक संकट हे केवळ आव्हान नसते, तर ते समाजाला आरसा दाखवणारे निमित्त असते. संकटकाळात आपण कसे वागतो, यावरच परिस्थितीची दाहकता ठरते.
८. स्वार्थ कि परमार्थ ?
जेव्हा समाजावर एखादे सावट येते, तेव्हा काही घटक कृत्रिम टंचाई निर्माण करून स्वतःचा लाभ शोधतात. मागणी वाढली की, साठेबाजी करणे आणि पुरवठा न्यून असल्याचा आभास निर्माण करून सामान्यांची लूट करणे, हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. याला आपणही खतपाणी तर घालत नाही ना ? हे पडताळण्याची आवश्यकता आहे.
९. भय आणि दायित्व
टंचाईची नुसती बातमी पसरली, तरी ‘उद्या काय होईल ?’, या अनामिक भीतीने लोक आवश्यकतेपेक्षा अधिक सिलिंडर साठवतात. ‘आपल्या एका कृतीमुळे खरोखर आवश्यकता असलेल्या एखाद्या कुटुंबाची चूल विझू शकते’, याचा विचार आपण करायला हवा. जेव्हा आपण केवळ स्वतःचा विचार करतो, तेव्हा पुरेसा पुरवठा असूनही बाजारात टंचाईचे चित्र निर्माण होते. अशा वेळी चढ्या दराने वस्तू विकणार्यांना खंबीरपणे नकार देणे, हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे.
संगणकीय ज्ञानजाल आणि समाजमाध्यमे यांच्या युगात अफवांचा वणवा वेगाने पेटतो; पण अशा वेळी वार्यासारख्या पसरणार्या बातम्यांवर विश्वास न ठेवता संयम राखणे, हीच संस्कारांची खरी कसोटी असते. आपण केवळ ग्राहक नाही, तर देशाचे उत्तरदायी आधारस्तंभ आहोत. संकटकाळात एकमेकांचा हात धरणे आणि सामाजिक उत्तरदायित्व जपून प्रामाणिकपणे वागणे, यातच देशाचे हित सामावलेले आहे. जर प्रत्येक भारतियाने इंधन बचत आणि संयम यांचा मंत्र जपला, तर कोणतीही टंचाई आपले मनोबल खच्ची करू शकणार नाही. चला तर, अफवांना थारा न देता साठेबाजीला नकार देऊन ‘उत्तरदायी नागरिक’ म्हणून इंधन बचतीच्या लढाईत सहभागी होऊया. आपल्या सामूहिक प्रयत्नांतून देश या संकटावर नक्कीच मात करील !
– ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
‘सनातन क्रांती’ची नांदी !