स्वित्झर्लंडमधील रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीकडून चाकूद्वारे आतंकवादी आक्रमण : ३ जण घायाळ

बर्न (स्वित्झर्लंड) – स्वित्झर्लंडमधील विंटरथुर शहराच्या रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने ३ जणांवर चाकूने वार करून घायाळ केले. अधिकार्‍यांनी हे आक्रमण आतंकवादी घटना असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक केली आहे. आरोपीची ओळख ३१ वर्षीय स्विस आणि तुर्कीए असे दोन नागरिकत्व असलेल्या व्यक्तीच्या रूपात झाली आहे. तो विंटरथुरमध्येच रहातो.

पोलीस प्रमुख मारियस वेयेरमन यांनी सांगितले की, वर्ष २०१५ मध्ये इस्लामिक स्टेट ग्रुपचा प्रचार पसरवल्यामुळे तो अधिकार्‍यांच्या निदर्शनास आला होता. अलीकडच्या काळात पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करून विचित्र संभाषण केल्यामुळे त्याला एका मानसोपचार केंद्रात नेण्यात आले होते; परंतु ‘तो धोकादायक नाही’, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तो तिथून निघून गेला होता.