Netanyahu On Gaza : गाझाच्या ७० टक्के भागावर नियंत्रण मिळवा ! – नेतान्याहू यांचा सैन्याला आदेश

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीच्या ७० टक्के भागावर सैनिकी नियंत्रण मिळवण्याचा आदेश इस्रायली सैन्याला दिला. २८ मे या दिवशी वेस्ट बँक येथे एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, आम्ही सध्या हमासला दाबून टाकत आहोत. सध्या गाझा पट्टीच्या ६० टक्के भागावर आमचे नियंत्रण आहे. आधी ते ५० टक्के होते, नंतर ६० टक्क्यांवर पोचले. मी आदेश दिला आहे की, हे वाढवून…’ तेवढ्यात गर्दीतून कुणीतरी ओरडून म्हटले, ‘१०० टक्के !’ यावर नेतान्याहू म्हणाले, एकेक पाऊल पुढे टाकूया. आधी ७० टक्क्यांपर्यंत पोचूया.

इस्रायली सैन्याला दिलेला हा आदेश ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या युद्धविराम कराराच्या अटींच्या विरुद्ध मानला जात आहे. करारानुसार इस्रायली सैन्याला एका निश्चित ‘येलो लाईन’च्या मागे परतायचे होते. या रेषेनंतर गाझाचा अनुमाने ५३ टक्के भाग इस्रायलच्या नियंत्रणात होता. हमासचा आरोप आहे की, इस्रायल शांतपणे ही सीमा आणखी आत सरकवत आहे. अनेक अहवालांनुसार गाझाच्या अनुमाने ६० ते ६४ टक्के भागावर इस्रायलचे नियंत्रण आहे.

२२ लाख लोकांना गाझाच्या एक तृतीयांश भागात रहावे लागू शकते !

युद्ध, बाँबस्फोट आणि विस्थापन यांमुळे गाझाचे बहुतेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. जर इस्रायलने ७० टक्के भागावर नियंत्रण मिळवले, तर गाझामधील साधारण २२ लाख लोकांना एकूण भूमीच्या एक-तृतीयांशपेक्षा अल्प भागात रहाणे भाग पडेल. (जर इस्रायलने गाझापट्टीवर १०० टक्के नियंत्रण मिळवले, तर या २२ लाख मुसलमानांना समुद्रात उडी मारण्याखेरीज पर्याय उरणार नाही. हे लक्षात घेता हमासचा नायनाट हाच एकमेव मार्ग समोर रहातो ! – संपादक)

संपादकीय भूमिका

राष्ट्रहितार्थ विजीगिषू वृत्ती कशी असावी, याचा आजच्या काळातील आदर्श म्हणजे बेंजामिन नेतान्याहू ! भारतानेही या दिशेने प्रयत्न केले, तर पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवायला वेळ लागणार नाही. आवश्यकता आहे, ती इच्छाशक्ती दाखवण्याची.