इराणने माझी हत्या केली, तर इराणवर प्रचंड बाँबफेक करा ! – Donald Trump

डॉनल्ड ट्रम्प यांचा अमेरिकी सैन्याला आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणने माझी हत्या करण्यात यश मिळवले, तर त्या देशावर यापूर्वी कधीही झाला नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात बाँबफेक करण्याचा आदेश मी यापूर्वीच अमेरिकेच्या सैन्याला दिला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतःच ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

ट्रम्प पुढे म्हणाले की,

मी अनेक वर्षांपासून इराणच्या लक्ष्यावर आहे. त्याचा आम्ही सामना करत आहोत. मला लक्ष्य करण्याच्या इराणच्या कटाविषयी इस्रायलने माहिती दिली होती; मात्र सध्या माझ्या हत्येचा कोणताही ताजा कट उघडकीस आलेला नाही. मी बर्‍याच काळापासून इराणच्या सूचीत प्रथम क्रमांकावर आहे.

इराणचे वरिष्ठ सैन्य कमांडर कासिम सोलेमानी यांच्या मृत्यूनंतर वाढला तणाव

वर्ष २०२० मध्ये ट्रम्प यांच्या आदेशानुसार झालेल्या अमेरिकन ड्रोन आक्रमणात इराणचे वरिष्ठ सैन्य कमांडर कासिम सोलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणकडून ट्रम्प यांच्या विरोधात सूड उगवण्याची भूमिका अनेकदा व्यक्त करण्यात आल्याचे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने म्हटले आहे.