Temple Gold Theft : केरळम्‌च्या प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने गायब !

गुप्तचर अहवालात देण्यात आली माहिती !

थिरूवनंतपूरम् (केरळम्‌) – केरळम्‌च्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या संदर्भात गुप्तचर अहवाल समोर आला आहे. यात मंदिरातून मौल्यवान वस्तू गायब होणे, सोन्याचे दागिने गायब होणे, सुरक्षेत त्रुटी आणि भक्तांनी अर्पण केलेल्या दानाचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केरळम्‌च्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. या अहवालात मंदिरातील मौल्यवान वस्तूंचे व्यवस्थापन आणि सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

अहवालात मांडण्यात आलेली सूत्रे !

सोन्याची भेटवस्तू गायब ?

गेल्या काही महिन्यांत भक्तांनी मंदिराच्या देखभालीसाठी दान केलेले सुमारे ७८ ग्रॅम सोन्याचे बिस्किट आणि नाणी गायब झाली आहेत. देखभालीसाठी पूर्वी काढलेला एक सोन्याचा बहुस्तरीय (मल्टिलेयर्ड) दिवा आता मंदिर परिसरात नाही.केरळम्‌

देवाचे सोन्याचे दागिनेही गायब

मूळ सोन्याचा दिवा चांदीच्या दिव्याने पालटण्यात आला आहे. या पालटाची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. ‘वैरा नामा’ एक पारंपरिक दागिना आहे आणि तो सामान्यतः मंदिराच्या गर्भगृहाच्या आत ठेवला जातो. दुरुस्ती आणि देखभाल यांच्या कामाच्या नावाखाली तो काढल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्या मूळ ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही.

सुरक्षा तपासणीकडे दुर्लक्ष ?

मंदिरातील काही कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि त्रावणकोर राजघराण्याशी संबंधित काही लोक चेंबकाथुम्मूडू प्रवेशद्वारावर अनिवार्य सुरक्षा तपासणीकडे दुर्लक्ष करत होते. अहवालात अशा अनेक लोकांची नावे दिली आहेत, जे कोणत्याही सुरक्षा तपासणीविना वारंवार मंदिरात ये-जा करत होते.

‘स्ट्राँग रूम’मध्ये सोने-चांदी ठेवण्यास सांगितले

तपासाच्या निष्कर्षानंतर अधिकार्‍यांनी मंदिराची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत. यात सध्या तिजोरीबाहेर असलेले सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू “स्ट्राँग रूम’मध्ये (मौल्यवान वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे अत्यंत सुरक्षितपणे ठेवण्यासाठी बनवलेली भक्कम सुरक्षित खोली.) हलवण्यात याव्यात. तसेच भक्तांकडून मिळणार्‍या सर्व दानाचे योग्य दस्तऐवजीकरण करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पोलिसांच्या कडक देखरेखीची शिफारस

सर्व लॉकर आणि सामान ठेवण्याच्या ठिकाणांवर पोलिसांची कडक देखरेख असावी. सुरक्षा नियम मोडल्यास शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्यात यावे. प्रत्येक व्यक्तीला, मग तिचे पद किंवा ओळख काहीही असो, तिला मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी निश्चित सुरक्षा तपासणीतून जावे लागेल.

सर्वोच्च न्यायालयाची समिती करते मंदिराची देखरेख

पद्मनाभस्वामी मंदिर केरळम्‌ सरकारच्या नियंत्रणाखालील कोणत्याही ‘देवस्वम बोर्डा’च्या अंतर्गत येत नाही. या मंदिराचे व्यवस्थापन सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली एक कार्यकारी समिती करते, जी दैनंदिन प्रशासनासाठी उत्तरदायी आहे. जिल्हा न्यायाधीश कार्यकारी समितीचे प्रमुख म्हणून काम पहातात. या समितीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, तसेच भाजप नेते करमना जयन यांचाही समावेश आहे. या समितीमध्ये केरळम्‌ सरकारचे प्रतिनिधी अधिवक्ता वेलायुधन आहेत. आणखी एक सदस्य श्री मूलम थिरुनल राम वर्मा आहेत, जे त्रावणकोर राजघराण्याचे प्रमुख आहेत. आदित्य वर्मा हेही राजघराण्याच्या प्रमुखांचे नामनिर्देशित म्हणून या समितीचा भाग आहेत. कार्यकारी समितीत मंदिराचे मुख्य पुजारीसुद्धा आहेत.

संपादकीय भूमिका

आता हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात देण्याची वेळ आली आहे, हे या घटनेतून लक्षात येत असून भक्तांनी यासाठी देशपातळीवर संघटित होऊन सरकारांवर दबाव निर्माण केला पाहिजे !