भारतियांविरुद्ध वंशवादी टिपणी करणारे अमेरिकेचे प्रतिनिधी नाहीत, प्रत्येक देशात काही मूर्ख लोक असतात ! – US Secretary Marco Rubio

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचे विधान

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ

नवी देहली – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी अमेरिकेत भारतियांविरुद्ध वंशवादी टिपणी आणि भेदभाव यांविषयी पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले की, अशी विधाने संपूर्ण अमेरिकी समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. प्रत्येक देशात काही मूर्ख लोक असतात, जे ऑनलाईन किंवा सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गोष्टी बोलतात; पण यामुळे कोणत्याही देशाची खरी ओळख ठरत नाही.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

पाकमध्ये सक्रीय असलेल्या आतंकवादी संघटना भारताला लक्ष्य करत असल्याने पाकविषयी भारताची चिंता रास्त !

पाकिस्तानबद्दलच्या भारताच्या चिंता पूर्णपणे रास्त आहेत; कारण पाकिस्तानच्या भूमीवरून सक्रीय असलेल्या आतंकवादी संघटना दीर्घकाळापासून भारताला लक्ष्य करत आहेत, अशी स्वीकृती रुबियो यांनी दिली. ते पुढे असेही म्हणाले की, अमेरिका-इराण युद्धामध्ये पाकिस्तानची मध्यस्थी किंवा सहयोगी भूमिका याबद्दल भारताकडून कोणतीही हरकत किंवा तक्रार समोर आलेली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सूत्रे वेगळ्या स्वरूपाची आहेत अन् इराणशी संबंधित प्रकरणांमध्ये पाकिस्तानची भूमिका हा चर्चेचा भाग राहिलेला नाही.