१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी, मुंबई येथील नर्दुल्ला टँक मैदानात सनातन संस्थेच्या वतीने श्री राजमातंगी महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या यज्ञाला उपस्थित सर्व जिज्ञासू, भाविक आणि साधक यांनी आनंद अनुभवला. यामागे संतांनी साधकांकडून भावाच्या स्तरावर सेवा करवून घेतल्यामुळे या सेवेतून साधकांना आनंद मिळाला आणि दैवीतत्त्वही मोठ्या प्रमाणात कार्यरत झाले. ही सेवा संतांनी कशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर करून घेतली आणि यातून साधकांना कशा प्रकारे घडवले, याविषयीचे दैवी अनुभव या लेखाद्वारे पाहूया !

१. रामनाथी आश्रमासारखे वातावरण निर्माण करणे !
श्री राजमातंगी यज्ञाच्या सेवेसाठी दादर (पश्चिम) येथील एका शाळेतील ५ वर्ग सेवेसाठी मिळाले होते. या ठिकाणी सेवेला आलेल्या साधकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. वर्ग मिळाल्यावर सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी शाळेत गोवा येथील सनातनच्या आश्रमासारखे सात्त्विक वातावरण निर्माण केले. शाळा बंद असल्यामुळे तेथील भिंतीचे पोपडे निघाले होते. त्यामुळे शाळेच्या भिंतींवर संतांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेले फ्लेक्स, तसेच अध्यात्मप्रसार आणि धर्मशिक्षण असलेले हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचे अन् विविध देवतांची सात्त्विक चित्रे असलेले फ्लेक्स लावण्यास त्यांनी सांगितले. त्यामुळे येथे आश्रमासारखे वातावरण निर्माण झाले.
२. शहराच्या मुख्य ठिकाणी आणि यज्ञस्थळाजवळ वास्तू मिळणे, हे गुरुकृपेमुळेच शक्य !
उन्हाळा असूनही या ठिकाणचे वातावरण मात्र थंड होते; जणू येथे वातानुकूलीन यंत्र बसवल्याप्रमाणे वाटत होते. या वास्तूमध्ये मोठ्या खिडक्या होत्या आणि त्या दिवस-रात्र उघड्या असूनही तिथे एकही डास नव्हता. ही इमारत मुख्य रस्त्याच्या बाजूला असूनही गाड्यांच्या आवाजाचा अडथळा आला नाही. निवासाला मिळण्यापूर्वी ही शाळा बंद होती, तरीही येथे विजेचे दिवे आणि पंखे भरपूर होते अन् ते सर्व चालू स्थितीत होते. या वास्तूमध्ये हवाही खेळती होती. मुंबईतील दादरसारख्या मुख्य ठिकाणी, तसेच यज्ञस्थळाच्या अगदी जवळच साधकांच्या निवासाकरता ही वास्तू उपलब्ध होणे, हे केवळ गुरुकृपेमुळेच शक्य झाले. या निवासव्यवस्थेला ‘सिद्धिविनायक आश्रम’, असे नाव देण्यात आले.
३. ध्यानमंदिर निर्मिती !
साधकांना श्री राजमातंगी महायज्ञाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, यासाठी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सिद्धिविनायक आश्रमात ध्यानमंदिर सिद्ध केले. या ठिकाणी देवतांची रचना अत्यंत सात्त्विक पद्धतीने करण्यात आली होती. पाठीमागे गुरुदेवांचे चित्र असलेला भव्य फलक लावण्यात आला होता. या फलकाने अर्धी भिंत व्यापली होती. ध्यानमंदिरात दिवसातून २ वेळा आरती आणि ३ वेळा प्रत्येकी २ घंटे सामूहिक नामजप उपायांचे नियोजन करण्यात आले. यामुळे साधकांना आध्यात्मिक स्तरावर मोठा लाभ झाला.
मुंबई येथे झालेल्या श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सूत्रे !![]() १. ‘वातानुकूलित गाडीमध्ये यांत्रिक थंडावा असतो; परंतु सिद्धिविनायक आश्रमात (टीप) आध्यात्मिक गारवा आहे. टीप – सिद्धिविनायक आश्रम : श्री राजमातंगी महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवांसाठी दादर येथील एका विद्यालयाच्या परिसरात सेवाकेंद्र उभारण्यात आले होते. यज्ञाच्या सेवांमध्ये सहभागी असलेले साधक येथे राहून सेवा, साधना आणि नामजपादी उपाय करत होते. संतांनी या सेवाकेंद्राचे नामकरण ‘सिद्धिविनायक आश्रम’, असे केले. २. १७.५.२०२५ या दिवशी गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव झाला. मुंबईत झालेला श्री राजमातंगी महायज्ञ हाही सनातन राष्ट्र शंखनादाप्रमाणेच व्यापक आणि आध्यात्मिक स्तरावर झाला. ३. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम परिसरात श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. तेथे श्री गणेशाचे निर्गुण तत्त्व आहे, तर मुंबईत यज्ञस्थळी आपल्याला श्री सिद्धिविनायकाचे निर्गुण तत्त्व अनुभवता आले.’ संग्राहक : श्री. प्रीतम नाचणकर, दादर सेवाकेंद्र, मुंबई. (१७.५.२०२६) श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना साधकांना ब्रह्मांडाच्या पोकळीत निर्माण झालेला दैवी नाद ऐकू आल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना विचारले, ‘‘श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना तुम्ही काही वेगळे अनुभवले का ?’’ त्यावर साधकांनी सांगितले, ‘‘आम्हाला दैवी नाद, म्हणजे आकाशतत्त्वाचा नाद ऐकू आला.’’ तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘साधकांना ऐकू आलेला हा नाद ब्रह्मांडाच्या पोकळीत निर्माण झाला आहे.’’ – श्री. प्रीतम नाचणकर, दादर सेवाकेंद्र, मुंबई. (१७.५.२०२६) |
४. सेवेसाठी १५० साधक निवासाला येणे !

श्री गुरूंच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाची सेवा करण्यासाठी साधक दीड मासापासून सिद्धिविनायक आश्रमात सेवेनिमित्त रहाण्यासाठी आले होते. प्रारंभी साधकांची संख्या साधारण ३० होती. यज्ञाचा दिवस जवळ येत गेला, तशी सेवेसाठी आश्रमात निवासाला आलेल्या साधकांची संख्या १५० पर्यंत वाढली, तसेच येऊन-जाऊन सेवा करणारे साधक पकडून साधकांची एकूण संख्या २५० होती.
५. त्यागाचे महत्त्व सांगून संतांनी साधकांकडून त्याग करवून घेणे !
पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना साधनेत ‘त्यागाचे’ महत्त्व किती आहे आणि अशा विशेष कालावधीत त्याग केल्यास आध्यात्मिक लाभ कसा मिळतो, याचे महत्त्व सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रेरित होऊन जवळजवळ १०० हून अधिक साधक नोकरी-व्यवसाय यांतून सुटी काढून यज्ञाच्या सेवेसाठी आले.
६. संतांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व बिंबवून साधकांकडून करून घेणे !

सेवेसाठी येणार्या सर्व साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, यासाठी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व प्रत्येक साधकाच्या मनावर अंकित केले. ‘प्रत्येक साधकाकडून ही प्रक्रिया करून घेऊन त्याचा नियमित आढावा घेतला जाईल’, अशी उत्तम कार्यपद्धत त्यांनी घातली. यामुळे साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहू लागले. अल्पाहार आणि महाप्रसाद यांच्या वेळी सर्व साधकांपुढे चुका सांगून साधक क्षमायाचना करू लागले. गटसेवकांना नियमित आढावा देणे, मनाची प्रक्रिया सांगून चुकांचा अभ्यास करणे, हे सर्व साधकांनी मनापासून केले. त्यामुळे यज्ञाच्या समष्टी सेवेसह साधकांच्या व्यष्टी साधनेचीही घडी बसली. यामुळे साधकांना हलकेपणा जाणवायला लागला. त्यांचा सुचण्याचा भाग वाढला आणि त्यांची सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.
७. ‘सर्व साधक म्हणजे देवदूत आहेत’, असे अनुभवणे !

यज्ञाच्या सेवेसाठी विविध समित्यांचे नियोजन साधकांनी व्यवस्थित वाटून घेतले होते. सेवांचे लिखित स्वरूपातील चिंतन काढणे, त्यासाठी बैठका घेणे, सेवांचा आढावा घेणे, यांवर पू. (सौ.) संगीता जाधव स्वतः लक्ष देत होत्या. सर्व साधक सेवेत एवढे समरस (एकरूप) झाले होते की, ‘ते साधक नसून साक्षात् देवाचे दूत आहेत’, असे जाणवत होते. त्यामुळे आपण ‘जणूकाही भूलोकात नसून देवलोकात सेवा करत आहोत’, असे जाणवत होते.
८. साधकांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे !

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्व साधकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण झाली. आपण घरी नसून एका मोठ्या ‘सनातन कुटुंबामध्ये आहोत’, हा भाव प्रत्येक साधकाच्या मुखावर स्पष्ट जाणवत होता. त्यामुळे प्रत्येक साधक अत्यंत आनंदी दिसत होता.
९. सर्व समित्यांकडून लिखित स्वरूपात चिंतन करून घेणे !
सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू (सौ.) संगीता जाधव यांनी सर्व साधकांकडून प्रत्येक सेवेचे लिखित स्वरूपात चिंतन करून घेतले. लिखित स्वरूपात चिंतन झाल्यामुळे सेवेची व्याप्ती किती मोठी आहे, हे साधकांच्या सहज लक्षात आले. यामुळे सेवेतील बारीक-सारीक तपशील, सेवा कधीपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे, त्याची समयमर्यादा आणि सेवेत येणार्या अडचणींवर कशा प्रकारे उपाययोजना काढता येईल, या सर्वांचा सराव साधकांकडून आधीच करून घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष सेवा करतांना साधकांचा उत्साह द्विगुणित झाला. सेवा तणावमुक्त झाली आणि साधकांना सेवेतील खर्या आनंदाचा अनुभव घेता आला.
संकलक : श्री. बळवंत पाठक, मुंबई

सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !