गोवंशियांची तस्करी करणार्‍यांवर ‘मकोका’ लागणार !

  • महाराष्ट्र गृहविभागाचे पोलिसांना आदेश

  • अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याच्या सूचना !

मुंबई – वारंवार गोवंशियांची तस्करी करणार्‍या व्यक्ती, संघटना आणि टोळ्या यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासन यांना दिले आहेत. ‘बकरी ईद’च्या पार्श्‍वभूमीवर मुसलमान आमदारांनी मुख्य सचिवांच्या बैठकीत ‘गोतस्करांवर मकोका लावू नये’, अशी मागणी केली होती, तथापि सरकारने हा महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे. गृहविभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे.

परिपत्रकात म्हटले आहे की,

१. महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, तसेच ग्रामपंचायती यांनी अनधिकृत पशूवधगृह शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.

२. परिवहन आणि वाहतूक विभागाने अनधिकृत पशूंची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करावी. ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६’अंतर्गत प्राण्यांना निर्दयीपणे वागवल्यास कारवाई करावी.

३. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पशूसंवर्धन आयुक्त आणि परिवहन आयुक्त यांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत अन् त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, असे पत्रकात म्हटले आहे.

४. संबंधित विभागांनी भरारी पथके स्थापन करून अवैध पशूवधगृहे आणि अवैध पशू वाहतूक यांवर प्रतिबंध आणावेत.

५. ‘११२’ या क्रमांकावर संपर्क करून गोवंश जतन करण्यासंदर्भात आलेल्या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई करावी.

‘व्यापार्‍यांची वाहने पोलिसांविना अडवणारे कार्यकर्ते आणि संघटना यांवर कारवाई करावी’, अशी आग्रही मागणी काही आमदारांनी बैठकीत केली होती; मात्र याविषयी गृह विभागाने काढलेल्या पत्रकात काहीही उल्लेख नाही.

संपादकीय भूमिका

  • जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे गोवंशियांची तस्करी करणार्‍या १२ जणांवर ‘मकोका’ अंतर्गत पोलिसांनी प्रथमच गुन्हा नोंदवला होता. केवळ एकदाच नव्हे, तर सातत्याने होणार्‍या गोवंशियांच्या तस्करीच्या प्रकरणात अशी प्रभावी कार्यवाही व्हायला हवी !
  • दिलेल्या आदेशांचे पालन पोलीस करतात का, याचा आढावा गृहविभागाने घ्यायला हवा आणि आदेश न पाळणार्‍या पोलिसांवरही कठोर कारवाई करावी !