सासूबाईंच्या मेंदूच्या व्याधीवर केलेल्या उपचारांच्या कालावधीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !        

सौ. राधा साळोखे

१. सासूबाईंच्या आजारपणाचा घटनाक्रम !

१ अ. सासूबाईंचा डावा डोळा अकस्मात् तिरळा होणे आणि त्यांच्या मेंदूची ‘अँजिओग्राफी’ करण्यासाठी मुंबईला जाणे : ‘फेब्रुवारी २०२२ मध्ये माझ्या सासूबाई सौ. विजया पांडुरंग साळोखे (आई, वय ६६ वर्षे) यांचा डावा डोळा अकस्मात् तिरळा झाला. त्यासाठी पनवेलमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू केले; मात्र त्या रुग्णालयात मेंदूची ‘अँजिओग्राफी (टीप)’ करण्यासाठी आवश्यक यंत्रणा नव्हती. तेव्हा तेथील आधुनिक वैद्यांनी आम्हाला मुंबईच्या एका रुग्णालयातील एका प्रसिद्ध मेंदू शल्यविशारदांकडे जाण्यास सांगितले.

टीप  – मेंदूची ‘अँजिओग्राफी’: मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अडथळे, फुगवटे (एन्युरिझम) किंवा इतर अनियमितता शोधण्यासाठी करण्यात येणारी वैद्यकीय चाचणी

१ आ. सासूबाईंच्या मेंदूची ‘अँजिओग्राफी’ केल्यावर मेंदूच्या दोन्ही बाजूंच्या रक्तवाहिन्यांना फुगवटे असल्याने त्यांचे शस्त्रकर्म करण्यास आधुनिक वैद्यांनी सांगणे : आईंच्या मेंदूची ‘अँजिओग्राफी’ केल्यावर त्यांच्या मेंदूत उजव्या आणि डाव्या, अशा दोन्ही बाजूंच्या रक्तवाहिन्यांना फुगवटे आल्याचे आढळले. (या आजाराला Brain Aneurysm म्हणतात. यात मेंदूच्या रक्तवाहिन्या फुगून फुटू शकतात. त्यामुळे रुग्ण बेशुद्धावस्थेत जाऊ शकतो किंवा दगावू शकतो.) डाव्या बाजूचा फुगवटा मोठा होता आणि उजव्या बाजूचा लहान होता; मात्र हे दोन्ही फुगवटे घालवण्यासाठी शस्त्रकर्म करून मेंदूच्या फुगलेल्या नसेमध्ये ‘स्टेंट (नळी)’ घालून रक्त वहाण्याची दिशा पालटायची होती, जेणेकरून तो फुगवटा आपोआप न्यून होईल.

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. राधा साळोखे यांच्या सासूबाई सौ. विजया पांडुरंग साळोखे यांना मेंदूचा विकार झाल्याने त्यांचे शस्त्रकर्म करायचे ठरले; पण ते शस्त्रकर्म करण्यासाठी साळोखे कुटुंबियांकडे आर्थिक बळ नव्हते, तरीही त्यांनी हार न मानता गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवली आणि मुंबईतील अनेक धर्मादायी संस्थांकडे जाऊन त्यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळवले अन् शस्त्रकर्म करण्यासाठी मोठी रक्कम उभी केली. ‘आपत्काळात कितीही कठीण स्थिती आली, तरी गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर सकारात्मकतेने प्रयत्न केल्यास त्यावर मात करता येते’, याचा आदर्श साळोखे कुटुंबाने सर्व साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२६)

१ इ. शस्त्रकर्मासाठीचा मोठा व्यय करण्याची आर्थिक स्थिती नसणे आणि रुग्णालयातील अधिकार्‍यांनी धर्मादाय संस्थांची सूची देऊन आर्थिक साहाय्यासाठी त्यांना भेटण्यास सांगणे : रुग्णालयाने आईंच्या मेंदूच्या रक्तवाहिनीला आलेला एक फुगवटा घालवण्यासाठी करायच्या शस्त्रकर्मासाठी ५ लक्ष ५० सहस्र रुपये, इतका व्यय सांगितला. औषधे आणि अन्य व्यय वेगळा होता. एवढा व्यय करण्याची आमची आर्थिक स्थिती नव्हती. आम्ही तेथील आधुनिक वैद्यांना आमच्या आर्थिक स्थितीची कल्पना दिली. तेव्हा त्यांनी आम्हाला रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाशी जोडून दिले. त्या विभागात असलेल्या अधिकार्‍यांना आम्ही आमची स्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी आम्हाला त्या रुग्णालयाशी जोडलेल्या काही धर्मादाय संस्थांची सूची आणि रुग्णालयाचे पत्र दिले अन् त्या सर्व संस्थांना भेटून साहाय्य घेण्यास सांगितले.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१ ई. धर्मादाय संस्थांकडे पोचण्यात अडचणी येणे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी आश्वस्त करून गुरुदेवांवरील श्रद्धा दृढ करणे : त्या धर्मादाय संस्थांकडे पोचण्यात आम्हाला पुष्कळ अडचणी आल्या. याविषयी मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे) यांच्याशी बोलले. तेव्हा त्यांनी ‘आपण आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करूया. गुरुदेव सर्व पाहून घेतील’, असे सांगून आमची गुरुदेवांवरील श्रद्धा दृढ केली.

पू. (सौ.) अश्विनी पवार

१ उ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले नामजपादी उपाय सासूबाईंनी नियमितपणे करणे : प्रत्यक्षात आईंचे शस्त्रकर्म तातडीने करायचे होते; मात्र त्यासाठी लागणारी रक्कम गोळा करण्यासाठी विविध धर्मादाय संस्थांना भेटणे आवश्यक होते आणि त्यासाठी आम्हाला पुरेसा वेळही हवा होता. तेव्हा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे) यांनी आईंसाठी नामजपादी उपाय सांगितले. ३ घंटे ठराविक स्थानावर न्यास आणि मुद्रा करून नामजप करायचा होता. आईंनी तो नामजप नियमित केला.

१ ऊ. धर्मादाय संस्थांना भेटल्यावर गुरुकृपेने शस्त्रकर्मासाठी रक्कम गोळा होऊन एक मासात सासूबाईंचे शस्त्रकर्म होणे : आम्ही साधारण २० – २२ दिवस मुंबईतील २० ते २५ धर्मादाय संस्थांना भेटलो. त्यासाठी मुंबईतील साधकांनीसुद्धा आम्हाला साहाय्य केले. त्यामुळे आमच्याकडे २५ दिवसांत ५ लक्ष २५ सहस्र रुपये जमा झाले. आम्ही केलेले प्रयत्न पाहून तेथील समाजसेवक अधिकारी व्यक्तीने स्वतः एका संस्थेला संपर्क करून उर्वरित २५ सहस्र रुपये उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे केवळ एका मासात आईंचे शस्त्रकर्म झाले.

१ ए. ‘शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी नामजपादी उपाय सांगितले होते. ते उपाय माझे यजमान श्री. रवींद्र साळोखे आणि माझ्या जाऊबाई सौ. जया नितीन साळोखे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४४ वर्षे) करत असत.

१ ऐ. शस्त्रकर्मानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले उपाय सासूबाईंनी चिकाटीने करणे आणि ६ मासांनी तपासणी केल्यावर त्यांच्या मेंदूतील फुगवटे सामान्य झाल्याचे आढळणे : आईंचे शस्त्रकर्म झाल्यावरही सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईंसाठी नामजपादी उपाय सांगितले. आईंनी ते सर्व उपाय चिकाटीने पूर्ण केले. आईंचे शस्त्रकर्म झाल्यावर ६ मासांनी ‘त्यांच्या मेंदूच्या फुगवट्यात काही पालट झाला आहे का ?’, हे पहाण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या मेंदूची ‘अँजिओग्राफी’ केली. तेव्हा त्यात आईंच्या मेंदूच्या डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीचा फुगवटा उणावला असून उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीचा फुगवटा शस्त्रकर्माविनाच पूर्णपणे सामान्य झाला होता. याचे शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले.

१ ओ. त्यानंतर ६ मासांनी पुन्हा पडताळणी केल्यावर आईंचे सर्व अहवाल सर्वसाधारण आले आणि त्यांची औषधेही बंद झाली.

१ औ. नंतर या ४ वर्षांत साधारण २ – ३ वेळा पुन्हा आईंचा एक डोळा तिरळा (तिरका) झाला. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांना नामजपादी उपाय विचारून ते पूर्ण केल्यावर १५ दिवसांत आईंच्या डोळ्याची हालचाल पूर्ववत झाली.

२. या संपूर्ण कालावधीत अनुभवलेली असीम गुरुकृपा !

२ अ. वैद्यकीय पडताळणीपूर्वीच सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईंच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना त्रास असल्याचे सांगणे : आरंभी आईंचा डोळा तिरळा (तिरका) झाल्यावर आम्ही सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी आईंच्या डोक्याच्या उजव्या आणि डाव्या, अशा दोन्ही बाजूंना त्रास असल्याचे सांगितले. तोपर्यंत आरंभीच्या वैद्यकीय पडताळणीतून आईंच्या मेंदूला असलेल्या एका बाजूच्या त्रासाचे निदान झाले होते. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सूक्ष्मातून आधीच ‘आईंच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना त्रास आहे’, हे ओळखले होते. यावरून ‘अध्यात्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे !’ आणि ‘सद्गुरु राजेंद्रदादा यांच्यात सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता अफाट आहे’, हे माझ्या लक्षात आले.

२ आ. शस्त्रकर्मासाठीची रक्कम अल्पावधीत जमा झाल्याचे पाहिल्यावर समाजसेवक अधिकार्‍यांच्या मनात गुरुदेवांप्रती श्रद्धा निर्माण होणे आणि त्यांनी नामजप चालू करणे : त्या रुग्णालयातील समाजसेवक अधिकारी पुष्कळ अनुभवी होते. त्यांनी आधीच आम्हाला सांगितले होते, ‘‘इतके पैसे जमा होऊ शकणार नाहीत. तुम्हाला व्यवस्था करावी लागेल.’’ तेव्हा पू. (सौ.) अश्विनीताईंनी ‘गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) श्रद्धा ठेवून प्रयत्न करत रहा’, असे सांगितले. त्यामुळे अगदी अल्पावधीत सर्व रक्कम गोळा झाली. त्या वेळी ते समाजसेवक अधिकारी म्हणाले, ‘‘तुमच्या गुरुदेवांच्या कृपेमुळे हे होऊ शकले.’’ अन्यथा आमच्यासाठी रक्कम गोळा करणे अशक्य होते. या प्रसंगामुळे त्यांच्याही मनात गुरुदेवांप्रती श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप चालू केला.

२ इ. आईंचे शस्त्रकर्म तातडीने करायला सांगितले होते; मात्र ‘शस्त्रकर्मासाठी लागणारी रक्कम गोळा होईपर्यंत त्यांचा त्रास वाढू नये’, यादृष्टीने मिळालेल्या नामजपादी उपायांमुळे आम्ही निश्चिंतपणे धर्मादाय संस्थांना संपर्क करू शकलो.

२ ई. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी साधिकेला वेळोवेळी आधार दिल्याने तिचे मन निश्चिंत होणे : आरंभी ‘आईंच्या जिवाला धोका आहे’, असे आम्हाला कळले. तेव्हा आम्ही सर्व जण घाबरलो होतो; मात्र पू. (सौ.) अश्विनीताईंनी आम्हाला आधार दिला. त्यांनी आमची गुरुदेवांवरील श्रद्धा वाढवली. त्यामुळे आमचे मन निश्चिंत होते. पू. अश्विनीताई आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत होत्या, तसेच ‘या स्थितीकडे साधना म्हणून कसे पहायचे ?’, हे शिकवत होत्या. जेव्हा आम्ही दादर येथील सेवाकेंद्रात निवासाला होतो, त्या काळात आमचे विविध धर्मादाय संस्थांना भेटणे चालू होते. उरलेला वेळ आम्ही जपमाळा बनवण्याची सेवा करायचो. हे करण्यासाठी आम्हाला बळ देणार्‍या पू. अश्विनीताई होत्या. त्यामुळे आमच्या मनात कोणतीही नकारात्मकता नव्हती.

या सर्व कालावधीत ‘कोणत्याही परिस्थितीत साधना होऊ शकते’, हे आम्हा सर्वांना अनुभवता आले. ‘गुरुदेव केवळ एका साधकाचीच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात’, याची मला पुन्हा एकदा अनुभूती आली.

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या अपार कृपेमुळे आम्ही ही अनुभूती घेऊ शकलो अन् कठीण प्रसंगात सकारात्मक राहून गुरुकृपा अनुभवू शकलो’, याबद्दल मी या तिघांच्याही चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तुम्हा तिघांना अपेक्षित अशी साधना मला तळमळीने करता येऊ दे’, अशी मी तुमच्या चरणी आर्तभावाने प्रार्थना करते.’

– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.