‘संत सखा’ : ‘सखाराम महाराज संस्थान’च्या गादीपरंपरेची ओळख

पुरुषोत्तम मासानिमित्त ‘परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर’ यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने ‘अमळनेरकर महाराज सेवासंघ’, पुणे यांनी ‘नवकुंडी दत्त यागा’चे आयोजन केले आहे. २८ ते ३० मे २०२६ या कालावधीत महाराज यज्ञासाठी उपस्थित रहाणार आहेत. ‘सखाराम महाराज संस्थान’ हे अमळनेर तालुका (जिल्हा जळगाव) येथील आहेत. पुणे येथील श्री शिवसमर्थ हॉल, कोथरूड येथे होणार्‍या ‘दत्त यागा’च्या निमित्ताने ‘सखाराम महाराज संस्थान’च्या गादीची माहिती, त्यांची कार्यप्रणाली आणि देव-निष्ठा जनमानसात अधिक प्रमाणात पसरवण्यासाठी हा लेख प्रपंच होय !

प.पू. गुरुवर्य सखाराम महाराज अमळनेरकर गादीपरंपरा

  • प.पू. गुरुवर्य सखाराम महाराज (मूळपुरुष) (वर्ष १७८० ते १८१८)
  • पू. गोविंद महाराज (वर्ष १८१८ ते १८५१)
  • पू. बाळकृष्ण महाराज (वर्ष १८५१ ते १८६८)
  • पू. प्रल्हाद महाराज (वर्ष १८६८ ते १८८५)
  • पू. तुकाराम महाराज (वर्ष १८८५ ते १८९६)
  • पू. कृष्णा महाराज (वर्ष १८९६ ते १८९७)
  • पू. बाळकृष्ण महाराज (आंधळे) (वर्ष १८९७ ते १९३०)
  • पू. वासुदेव महाराज (वर्ष १९३० ते १९५२)
  • पू. पुरुषोत्तम महाराज (वर्ष १९५२ ते १९६४)
  • पू. ज्ञानेश्वर महाराज (वर्ष १९६४ ते १९८७)
  • प.पू. गुरुवर्य श्री प्रसाद महाराज (वर्ष १९८७ पासून)

१. प.पू. गुरुवर्य सखाराम महाराज (मूळपुरुष)

‘संत सखा’ ही उपाधी खरतर ‘पंढरपूरच्या विठ्ठलाची’; पण येथे संत सखाराम महाराज यांची ! हरिभजनात तल्लीन असलेल्या श्री. सखाराम यांचे पंतोजींकडे प्राथमिक, व्यावहारिक शिक्षण झाल्यावर श्री. श्रीधरमामा यांनी श्री. सखाराम यांस चोपडा येथे वैदिक शिक्षण देण्यासाठी नेले. संसाराला कंटाळलेल्या श्री. सखाराम यांनी पांडुरंगाच्या उपदेशाने वारीला जाण्याची इच्छा व्यक्त केली; पण वारीला जाणे शक्य न झाल्याने एरंडोल येथील अधिकारी पुरुष पू. रघुनाथस्वामी यांनी अडावतच्या पू. श्रीनिवास महाराजांचा उपदेश घेण्याचा सल्ला दिला. पू. श्रीनिवास महाराजांनी ‘मन स्थिर करून, भक्तीचा मार्ग धरून, रुक्मिणीवरास (पांडुरंगास) साध्य करावे आणि या जगाला धन्य करावे’, असा उपदेश केला. प.पू. गुरुवर्य सखाराम महाराज यांनी अखंड नामस्मरण, हरि-कीर्तन करत आणि लोटांगण घालत पंढरपूरची पायी वारी चालू केली. ही वारी सध्याच्या गादीपती प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्यापर्यंत चालू आहे.

२. पू. गोविंद महाराज (दुसरे गादीपती)

प.पू. सखाराम महाराज यांनी उत्तराधिकारी म्हणून जळगाव जामोद येथील गोविंद केसकर यांची निवड केली. पू. गोविंद महाराज यांनी चालू असलेली वाडीतील व्यवस्था, उत्सव व्यवस्था, फिरस्ती व्यवस्था, देवपूजा, व्रत-उपासना, संध्याकाळी आणि रात्री आरती, तसेच शेजारतीच्या वेळी वीणा घेऊन भजन पंचपदी आदी सर्व गोष्टी चालू ठेवल्या. काशी, प्रयाग, गया या त्रिस्थळी यात्रा केली. गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी गंगेत गुरूंच्या अस्थींचे विसर्जन केले. दानधर्म, अन्नदान करत, गुरु प.पू. सखाराम महाराज यांची समाधी अमळनेर येथे बांधली. पंढरपूरला ४ महिने रहावे लागते; म्हणून स्वतःच्या मालकीचा मठ बांधला. ३३ वर्षे अविरत सेवा करून वर्ष १८५१ मध्ये पू. गोविंद महाराज विठ्ठलचरणी लीन झाले.

३. पू. बाळकृष्ण महाराज (तिसरे गादीपती)

वर्‍हाडातील बाळकृष्ण देशपांडे यांनी सद्गुरूंनी दिलेली परंपरा उत्तम प्रकारे सांभाळली. एकदा पंढरपूरला ४ महिन्यांच्या वास्तव्यासाठी आले असतांना महाद्वार येथील मठात मठाच्या पावित्र्याला विसंगत कार्यक्रम झाल्याचे महाराजांच्या कानावर आले. घडलेली घटना योग्य वाटली नाही, त्यामुळे गोविंद तुकाराम बडवे यांच्या पूर्वजांना बोलावले आणि हातावर पाणी सोडून मठ दान केला. केवळ देवाची मूर्ती आणि वीणा घेऊन बाहेर पडले. त्यांचे गुरु गोविंद महाराज यांच्या समाधीचे बांधकाम पंढरपूर येथे चालू केले. पू. बाळकृष्ण महाराजांनी १७ वर्षांच्या कार्यकाळानंतर वर्ष १८६८ मध्ये देह ठेवला.


विविध ठिकाणी यज्ञ आणि आध्यात्मिक कार्यक्रम

भरतखंडात यज्ञ ही केवळ विधीची क्रिया नसून अंतःकरण शुद्धीचे आणि सत्त्वगुण वाढवण्याचे प्रतीकस्वरूप आहे. परमपूज्य महाराजांनी ‘पुरुषोत्तम मासा’त महाराष्ट्रात विविध ठिकाणी यज्ञ आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे’, अशी प्रेरणा अन् आशीर्वाद दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे –

१. गणेश याग (५ कुंडी) – जळगाव १९ मे ते २१ मे २०२६, (पार पडला),  २. शिवशक्ती याग (९ कुंडी) – धुळे २२ मे ते २४ मे २०२६, ३. श्रीराम याग (९ कुंडी) – चाळीसगाव २५ मे ते २७ मे २०२६, ४. दत्त याग (९ कुंडी) – पुणे २८ ते ३० मे २०२६, ५. दिव्य श्रीराम याग (२७ कुंडी) – नाशिक ३१ मे ते २ जून २०२६, ६. विष्णुयाग (९ कुंडी) – अहिल्यानगर ३ जून ते ५ जून २०२६, ७. अखंड नाम सप्ताह – संभाजीनगर ६ जून ते १३ जून २०२६.

४. पू. प्रल्हाद महाराज (चौथे गादीपती)

मराठवाड्यातील भूम परगण्यातील परांडे येथील गोपाळ पाठक यांचे द्वितीय चिरंजीव म्हणजे प्रल्हाद होय. गोपाळ पाठक हे ‘गोपाळ देव’ या नावाने प्रसिद्ध झाले. प्रल्हाद महाराज माघ वारीस पंढरपूरला जात. पू. बाळकृष्ण महाराज यांनी चालू केलेल्या पंढरपूर येथील समाधीचे काम पू. प्रल्हाद महाराज यांनी पूर्ण केले, तसेच अमळनेर प्रमाणेच पू. गोविंद महाराज यांच्या समाधीसमोर भजन-कीर्तन आणि माघ अमावास्येला पंढरपूरच्या मार्गावर पालखी सोहळा, मठात मोठा भंडारा आणि अन्नदान चालू केले. पंढरपूर येथील कुंभार घाटावर जो मठ आहे, त्याची जागा खरेदी करून घेतली, तसेच पू. बाळकृष्ण महाराज यांच्या समाधीचे बांधकाम केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पू. तुकाराम महाराज यांना गादीचे वारस नेमण्याची व्यवस्था केली. १७ वर्षे सेवा केल्यानंतर वैशाख शुक्ल ९, वर्ष १८०७ मध्ये महाराज अमळनेर येथे समाधिस्थ झाले.

५. पू. तुकाराम महाराज (पाचवे गादीपती)

मराठवाड्यातील खर्डी जवळ असलेल्या वरूड गावी तुकाराम महाराजांचा जन्म झाला. पू. प्रल्हाद महाराज यांच्या काळात ते दिंडीत आलेले होते. पू. प्रल्हाद महाराज यांनी त्यांना स्वत:चा उत्तराधिकारी नेमले. पू. तुकाराम महाराजांनी पंढरपूर येथे परमपूज्य गुरुवर्य बाळकृष्ण महाराज यांच्या समाधीचे अपूर्ण काम पूर्ण केले. या काळामध्ये त्यांनी प.पू. सखाराम महाराजांच्या गादीचे जनमानसातील स्थान उंचीवर नेण्याचे कार्य केले. पुढे जेथे भजन, पूजन आदी कार्यक्रम होत, तो मठाचा भाग पू. तुकाराम महाराज यांनी बांधला. वर्ष १८९५ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारी पायी करणे अशक्य झाले. त्यामुळे मेण्यातून वारीला गेले. चंद्रभागेच्या पुराचे पाणी ज्या दिवशी कुंभार घाटाच्या खाली गेले, त्याच दिवशी महाराजांनी देह ठेवला.

६. पू. कृष्णा महाराज (सहावे गादीपती)

पू. कृष्णा महाराज हे श्री प्रल्हाद महाराज यांचे सुपुत्र होते. देव घराण्यातील हे दुसरे महाराज ! पू. प्रल्हाद महाराज यांना दिलेल्या वचनानुसार स्वतःच्या मुलास तुकाराम महाराज यांनी उत्तराधिकारी नेमून वर्ष १८९६ मध्ये आषाढ कृष्ण १० या दिवशी वीणा आणि माळ पू. कृष्णा महाराज यांच्या गळ्यात घातली. पू. कृष्णा महाराज यांची कारकीर्द अगदी अल्प म्हणजे ११ महिने होती. पू. कृष्णा महाराज यांना ज्वर तीव्र प्रमाणात उद्भवल्याने पंढरपूर येथील सर्व कार्यक्रम रहित करून अमळनेर येथे नेले. चैत्र महिन्यात, शके १८१९ (वर्ष १८९७) मध्ये पू. कृष्णा महाराज निजधामास पावले.

अमळनेर (जळगाव) येथील सखाराम वाडीचे जुने

७. पू. बाळकृष्ण महाराज (सातवे गादीपती)

बाळकृष्ण झेंडे हा मुलगा पू. तुकाराम महाराज हे गादीपती असतांना दिंडीत सहभागी झाला होता. तो स्नान, संध्या, तसेच पूजा-आरती आणि कार्यक्रमांची व्यवस्था बाळकृष्ण झेंडे (कुलकर्णी) पहात होते. वर्ष १८९६ पासून पू. कृष्णा महाराज आजारी पडल्यावर त्यांनी प.पू. सखाराम महाराज यांची परंपरा चालू ठेवण्याचे दायित्व पू. बाळकृष्ण महाराज यांवर सोपवले. नेहमीच्या परंपरांसमवेतच चारधाम यात्रा, बद्रीनाथ येथील धर्मशाळा, अजमेर मंदिराजवळील पुष्कर तीर्थावर घाट बांधणे इत्यादी कार्ये त्यांनी पार पाडली. श्रीक्षेत्र द्वारका येथे द्वारकाधिश मंदिराच्या कळसावर ध्वज लावण्याची अपूर्व संधीही महाराजांना मिळाली. बद्रीनाथ यात्रेवरून परत आल्यानंतर त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाल्याने त्यांना ‘आंधळे महाराज’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दृष्टी गेली तरी व्यावहारिकपणा आणि चाणाक्ष बुद्धीमुळे पुढील २ तपांत त्यांनी संस्थेचा विकास केला. पंढरपूरच्या मठाचे अपूर्ण बांधकाम, पू. तुकाराम महाराज यांच्या समाधीचे बांधकाम, पू. निवृत्तीनाथांचा मठ, अमळनेर येथे वाडी मंदिराचे काम, मंदिराला लागून असलेल्या गंगामाई मंदिराची दुरुस्ती, धर्मशाळा ही कामे हे त्यांचे विशेष योगदान आहे. वाडी मंदिरातील देवतांना नित्य आणि नैमित्तिक कारणांसाठीचे अलंकार मुकुट, पगड्या आदी सुवर्ण धातूचे करण्यात आले. पू. बाळकृष्ण महाराज यांच्या ३३ वर्षांच्या सेवाकाळात ‘अमळनेर संस्थान’ची धार्मिक भरभराट झाली. त्यांच्या काळात संस्थानची संपन्नता आणि प्रभाव सर्वत्र वाढला. वर्ष १९३९ मध्ये आश्विन महिन्यात त्यांनी इहलोक सोडला.

८. पू. वासुदेव महाराज (आठवे गादीपती)

वासुदेव रामचंद्र चतुर उपाख्य पू. वासुदेव महाराज यांना वर्ष १९३० मध्ये अनुग्रह देऊन त्यांच्या गळ्यात वारसत्वाची माळ २१ व्या वर्षी घातली. पू. वासुदेव महाराज यांनी ४ महिने पांडुरंगाच्या मंदिरात हत्ती दरवाज्यासमोर होणार्‍या भजनात नामवंत मंडळी बोलावली. या भजनी आणि गायक वृत्तीने ते ‘नामवंत भजनी गायक’ म्हणून प्रसिद्धीस आले. भजन रंगू लागल्याने महाराज यांनी टाळकरी मंडळींना समाविष्ट केले. उंची, सावळा वर्ण, पाणीदार डोळे, विशिष्ट पोशाख यांमुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व खुलून दिसत असे. रझाकारांच्या अन्यायाला न जुमानता निर्मळ वृत्तीमुळे आणि शांततेमुळे त्यांनी देवकार्य चालू ठेवले. कूर्मोदर आजाराने पीडित झाल्यामुळे मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले.

९. पू. पुरुषोत्तम महाराज (नववे गादीपती)

देव घराण्यातील मूळ पुरुष वामनदेव यांचे वंशज पू. पुरुषोत्तम नारायण देव हे गादीवर बसण्यापूर्वी अमळनेर येथे मंदिर आणि फिरस्तीतील देवांचे पुजारी म्हणून कार्य करत असत. ‘भाऊदेव’ या टोपणनावाने ते ओळखले जात. ५८ व्या वर्षी ते गादीवर बसले. उतारवयातही त्यांनी संस्थेचे नियम आणि पायी वारी सांभाळली. त्यांच्या सरळ स्वभावाचा अपलाभ काही लोकांनी घेतल्याने संस्थान कर्जबाजारी झाले; परंतु नियमभंग न करता त्यांनी कर्जफेड केली. पायाचा त्रास वाढल्याने वर्ष १९६७ मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांना त्यांनी गुरुमंत्र, वीणा आणि माळ देऊन गादीवर बसवले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी निवृत्ती स्वीकारली.

१०. पू. ज्ञानेश्वर महाराज (१० वे गादीपती)

पू. पुरुषोत्तम महाराज यांना वृद्धत्वामुळे गादीचे दायित्व सांभाळणे कठीण जाऊ लागले; म्हणून त्यांनी मार्गशीर्ष कृष्ण ११, वर्ष १९६४ या दिवशी गादीची सूत्रे पू. ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे सोपवली. श्री ज्ञानेश्वर पांडुरंग देव हे देव घराण्यातील चौथे महाराज होत. अमळनेर येथे ‘आबा देव’ या नावाने सुपरिचित ज्ञानेश्वर यांनी लहानपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे पूजेचे दायित्व स्वीकारले. वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला. पू. ज्ञानेश्वर महाराज यांनी नित्य भजन, नामस्मरण आणि आलेली परंपरा अखंड ठेवून नवचैतन्य निर्माण केले. पू. ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदीला जाण्यापूर्वी पुणे येथे जाण्यास प्रारंभ केला. मार्च १९७३ मध्ये संस्थान सार्वजनिक झाले आणि नवीन घटना सिद्ध करण्यात आली. त्यास धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी संमती देऊन नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केले. पहिल्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख पू. ज्ञानेश्वर महाराज होते.

पू. प्रसाद महाराज (११ वे गादीपती)

पू. ज्ञानेश्वर महाराज यांनी केलेल्या वारसपत्रामुळे संस्थेच्या विश्वस्त मंडळाने महाराजांचे शिष्य आणि द्वितीय पुत्र (पूर्वाश्रमीचे) प्रसाद तथा भाऊ यांच्या गळ्यात माळ अन् वीणा घालून उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. प्रसाद ज्ञानेश्वर देव उपाख्य भाऊ हे ११ वे गादीपती म्हणून विराजमान झाले. वयाच्या २९ व्या वर्षी वर्ष १९८७ मध्ये पू. प्रसाद महाराज यांनी गादीची अत्यंत खडतर आचार असलेली धुरा अंगावर घेतली. तारुण्यात ब्रह्मचर्य पालन, संतवृत्तीचे जीवन असे निष्ठेने स्वीकारले. पू. प्रसाद महाराज यांचे लोभस व्यक्तीमत्त्व आणि राजबिंडे स्वरूप, संतवृत्ती हे केवळ असामान्य वैशिष्ट्य आहे. गादीवर बसून त्यांनी ३९ वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. पू. प्रसाद महाराज यांनी कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या दर्शनानिमित्त मिरज, सांगली येथे जाण्यास प्रारंभ केला. गंगापूर, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, मुंबई, ठाणे, कल्याण, संभाजीनगर आणि पैठण या क्षेत्रांत ‘सखाराम महाराज गादी’चा परिचय करून देत त्यांनी अध्यात्माचा प्रचार केला.

१. कार्य : पंढरपूर येथे होणार्‍या खर्चासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली. अमळनेर, पैठण, आळंदी येथील मठांचा जीर्णोद्धार करून अधिक सुखसोयींनी युक्त बांधकाम केले. चिकित्सालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर उपक्रम चालू करण्याचा संकल्प केला आहे. फिरस्तीच्या काळात शिष्यांच्या घरी पान-सुपारीद्वारे संस्थानचा आर्थिक ताळमेळ साधला जातो. परंपरेत कोणताही पालट न करता, नवीन उपक्रमांचा अंगीकार करणे, ही पू. प्रसाद महाराज यांची खरी ओळख आहे.

२. प्रतिदिन कार्यक्रम : प्रतिदिन ज्ञानेश्वरीचे वाचन आदी उपक्रम उत्साहाने आणि शिस्तबद्धरित्या चालू ठेवले जातात. वाडी मंदिर, अमळनेर येथे नित्य आणि नैमित्तिक पूजा, काकड आरती, मंगल आरती, देवपूजा, पोशाख, समाधी पूजा, नित्य आरती, एकादशी माहात्म्य, महाविष्णु-महादेव स्नान अभिषेक, महानैवेद्य, धूप आरती, नित्य अभंग, पंचपदी भजन, शेजारती, प्रवचन आणि शहर जागरण असे कार्यक्रम केले जातात.

३. इतर नैमित्तिक कार्यक्रम : रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी, भाऊबीज, प्रमुख देवतांचे पंचामृत अभिषेक, तुलसी विवाह, पू. ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत प्रत्येक महाराजांचे पुण्यतिथीचे कार्यक्रम, तसेच संस्थानामध्ये होणारे इतर महोत्सव म्हणजे पू. गोविंद महाराज पुण्यतिथी महोत्सव, सखाराम महाराज यात्रा उत्सव, रथोत्सव, पालखी सोहळा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्षभरातील साधारण ३५ दिवस महाराजांचा मुक्काम अमळनेर येथे असतो. कोणत्या तिथीला कुठे मुक्काम आणि कुठे यायचे ? याचे वेळापत्रक पूर्वापार चालत आले आहे. अपरिहार्यकारणांमुळे अडचण असल्यास त्यामध्ये पालट होतो; पण गाव बदलत नाही. फिरस्तीत महाराजांसमवेत पांडुरंगाची मूर्ती, तसेच महाविष्णु, राम-सीता, बाळकृष्ण यांच्या मूर्ती, पूर्वीच्या महाराजांच्या पादुका, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी असतात. मुक्कामाच्या गावात सकाळी देवपूजा त्यानंतर महाराज आणि सर्वजण श्रीविष्णुसहस्रनाम म्हणतात अन् नित्यनियमाने तुलसीपत्र अर्पण करतात. त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद वाटप आणि महाप्रसाद होतो. प्रत्येक द्वादशीला देवाचा काकडा असतो. मुक्कामाच्या आणि आजूबाजूच्या गावांतील भक्तजन महाराजांचे पाय आपल्या घरी लागावेत, या उद्देशाने निमंत्रण देतात. महाराज घरी आल्यावर घरातील व्यक्ती, तसेच अनेक लोक महाराजांसमोर दक्षिणा ठेवून प्रसाद घेतात. या कार्यक्रमाला ‘पान-सुपारी’, म्हटले जाते. संध्याकाळी देवाची धूप आरती, पान-सुपारीचा कार्यक्रम, नित्य नियमांचे अभंग, ज्ञानेश्वरी, गाथा, भजन, शेजारती आदी क्रमाने कार्यक्रम होतात. आश्विन महिन्यात वद्य दशमी, एकादशी, द्वादशी असे ३ दिवस पंढरपूर येथील मोठ्या सभामंडपात भजनी नामजपाचा कार्यक्रम होतो.

श्री सद्गुरु सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अमळनेर–पंढरपूर या कार्याचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळाच्या वतीने केले जाते. नियमांनुसार धमादाय आयुक्तांच्या मान्यतेने हे कार्य केले जाते.

४. प.पू. प्रसाद महाराज यांचे सामाजिक कार्य : मठांचे नूतनीकरण केल्यानंतर प.पू. प्रसाद महाराज यांनी समाजकार्य आणि विविध सार्वजनिक कामांचा प्रारंभ केला. सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन वेद पाठशाळा, तसेच वारकरी पाठशाळा चालू केली. धर्मार्थ दवाखाना (अमळनेर, पंढरपूर, पैठण), भक्तनिवास, दिव्यांग साहित्य वाटप, कोविड महामारीत अन्नधान्य वाटप आणि भोजन व्यवस्था असे उपक्रम राबवले. पंढरपूर येथे चातुर्मास अन्नछत्रात प्रतिदिन भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. अमळनेर येथे गोरगरिबांना शिधावाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्यही केले जाते.

५. सार्वजनिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम : द्विशताब्दी महोत्सवांचे आयोजन, विष्णु-दत्त यज्ञ (५, ९, ११, ५१ कुंडी), १००० भक्तांसाठी ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, १३ कोटी रामनामाचा जप, विक्रमी संख्येने दासबोध पारायण, अखंड नामस्मरण, प्रवचन आणि चर्चासत्र यांचे आयोजन केले जाते. यासमवेतच नेत्रतपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षलागवड आणि संवर्धन असे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. या सर्व माध्यमांतून महाराज सर्वांना आध्यात्मिक मार्गाकडे वळवण्याचे कार्य साधना आणि हिंदु धर्मप्रचार यांद्वारे करत आहेत. २५० वर्षांपेक्षा जास्त उज्ज्वल परंपरा असलेल्या ‘सद्गुरु सखाराम महाराज संस्थे’ची भव्य परंपरा आणि वारसा सध्याचे अधिपती परमपूज्य गुरुवर्य पू. प्रसाद महाराज अत्यंत जोमाने अन् निष्ठेने परमेश्वर चरणी अपर्ण करत आहेत. आतापर्यंत महाराजांच्या कारकीर्दीत प्रथमतः द्विशताब्दी सोहळा, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित केले. जनकल्याणार्थ १०८ कुंडी विष्णुपंचायतन महायज्ञ, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण, कीर्तन, संत संमेलन, विचारमंथनात्मक चर्चासत्र, पालखी सोहळा आदी कार्यक्रम पार पाडले. लाखो भाविकांनी या महोत्सवात भाग घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगानुसार ‘आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाने ।’ मी स्वतः या घटनांचा साक्षीदार असून त्याचा लेखाजोखा या लेखप्रपंचात मांडला आहे. माझ्या अल्पमतीने अर्पण केलेले हे शब्दरूपी पुष्प सद्गुरु पू. प्रसाद महाराज यांना समर्पित करतो.

लेखक : डॉ. सदानंद वि. देशपांडे, प्राध्यापक माजी प्राचार्य, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे.