ULPGM-V3 Missile : ड्रोनमधून डागल्या जाणार्‍या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी देहली – भारताने ड्रोनमधून डागल्या जाणार्‍या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण केली आहे. आंध्रप्रदेशातील कुर्नूल येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या चाचणी केंद्रात ही चाचणी करण्यात आली. ‘यू.एल.पी.जी.एम्.-व्ही ३’, असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. हे हवेतून हवेत आणि हवेतून भूमीवर अशा दोन्ही प्रकारच्या लक्ष्यांवर अचूक आक्रमण करू शकते. हे हवेत शत्रूचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर लक्ष्य यांना पाडू शकते. तसेच भूमीवर रणगाडे, सैनिकी वाहने आणि बंकर यांना लक्ष्य करू शकते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या क्षेपणास्त्राच्या निर्मितीतील यश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

५० सहस्र सैनिकांचा स्वतंत्र ‘ड्रोन दल’ असणार !

भारताने एक ‘ड्रोन फोर्स’ (ड्रोन दल) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दल कोणत्याही सैनिकी कारवाईत ‘फर्स्ट रिस्पाँडर’ (पहिली प्रत्युत्तर कारवाई) म्हणून तैनात केले जाईल. या दलासाठी सध्या ५० सहस्र सैनिकी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पुढील ३ वर्षांत १५ नवीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (उत्कृष्टता केंद्रे) उभारली जातील.