साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणार्‍या आणि स्वतःच्या आदर्श कृतींतून साधकांना घडवणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव !

‘वर्ष २०१५ ते २०२० या कालावधीत मी मुंबई येथे राहून प्रसारात सेवा करत होते. त्या वेळी मला सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत, वय ५६ वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु अनुराधा वाडेकर

१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी केवळ स्पर्शाने साधिकेला तिच्या चुकीची जाणीव करून देणे 

एक दिवस रात्री मी महाप्रसादाची पूर्वसिद्धता करत असतांना कोबी चिरत होते. माझ्याकडून भाजी चिरण्याच्या फळीवर (‘कटिंग बोर्ड’वर) सुरी आपटून ‘टक् टक्’, असा आवाज येत होता; परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करून ‘भाजी लवकरात लवकर कशी चिरून होईल ?’, याकडे लक्ष देत होते. त्या वेळी सद्गुरु अनुराधा वाडेकर तत्परतेने स्वयंपाकघरात आल्या आणि त्यांनी माझ्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. तेव्हा त्यांच्या या स्पर्शामुळे ‘मी चुकीच्या पद्धतीने भाजी चिरत आहे’, हे माझ्या लक्षात आले.

पू. (सौ.) संगीता जाधव

२. प्रत्येक कृती परिपूर्ण करण्यास शिकवणे

अ. एकदा सद्गुरु अनुताई आणि पू.जाधवकाकू डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी मी त्यांच्यासाठी आंबा कापत होते. ‘मी अयोग्य पद्धतीने आंबा कापत आहे’, हे सद्गुरु अनुताईंच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आंबा कसा कापायला हवा ?’, हे शिकवल्याचे मला प्रत्यक्ष कृती करून दाखवले. ‘आंब्याच्या फोडीला आंब्याचा गर अधिक राहून कोयीला (आंब्याच्या बिला) अत्यल्प गर रहायला हवा’, हे सद्गुरु अनुताईंनी मला शिकवले.

आ. एकदा रात्री मी सद्गुरु ताईंच्या समवेत बसले असतांना मला झोप येत होती; म्हणून मी तोंड धुऊन आले आणि माझ्या अंगावरील कुडत्याने तोंड पुसू लागले. तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि ही ‘पद्धत अयोग्य आहे’, असे सांगून ‘नॅपकिन’ला (तोंड पुसण्याच्या कापडाला) तोंड पुसून येण्यास सांगितले.

सौ. वैशाली कोथमिरे

३. साधिकेला तिच्यातील अहंची जाणीव करून देणे

आधुनिक वैद्यांनी सद्गुरु अनुताईंना आहारात बरीच पथ्ये सांगितली होती. त्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी पथ्याचा आहार बनवून देत असे; परंतु तसे करत असतांना ‘माझा अहं वाढत आहे’, याकडे माझे लक्ष नव्हते. ते सद्गुरु ताईंच्या लक्षात आले आणि त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली.

४. साधकांच्या कुटुंबियांची प्रेमाने विचारपूस करणे

काही वेळा सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू दोघींनाही तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रास होत असत, तरीही त्यांचा इतरांविषयीचा विचार अधिक असे. तेव्हाही त्या माझे कुटुंबीय आणि नातेवाईक यांची विचारपूस करत, तसेच ‘त्यांची साधना नीट चालू आहे ना ?’, असे त्या आवर्जून विचारत.

५. प्रसंगावधान राखून तत्परतेने कृती करून प्रथमोपचाराचे महत्त्व इतरांच्या लक्षात आणून देणे 

एकदा ठाणे सेवाकेंद्रात असतांना महाप्रसादाच्या वेळी मला ठसका लागला. माझ्या तोंडातील घास घशात अडकून राहिल्यामुळे मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या वेळी सद्गुरु ताईंनी प्रथमोपचार शिकलेल्या साधिकेला तत्परतेने संपर्क करून ‘काय करायचे ?’, ते विचारले. त्याप्रमाणे त्यांनी मला ओणवे (समोर वाकून) उभे रहायला सांगून माझ्या पाठीत ३ – ४ बुक्के मारले. तेव्हा क्षणात माझा घास घशाखाली उतरला आणि मला श्वास घेता येऊ लागला. त्या वेळी त्यांनी समयसूचकतेने आणि तत्परतेने केलेली कृती पाहून ‘अशा प्रसंगात घाबरून न जाता प्रथमोपचार कसे करायचे ?’, याचे महत्त्व आमच्या लक्षात आले.

६. नीटनेटके रहाण्याचे महत्त्व साधकांवर बिंबवणे

साधकांचा पोशाख असात्त्विक असल्यास किंवा एखाद्या साधिकेची केशरचना व्यवस्थित नसल्यास सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू संबंधितांच्या ते लक्षात आणून देत.

७. मतभेद झालेल्या दांपत्यात प्रेमाने पालट घडवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

एकदा एका दांपत्यात मतभेद निर्माण झाले होते. ते दोघे सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांना सेवाकेंद्रात येऊन भेटले. तेव्हा पू. काकूंनी स्वतः त्या साधिकेच्या पतीला पाणी दिले आणि चहा बनवून दिला. त्यांच्या या कृतीमुळे साधिकेच्या पतीच्या मनातील नकारात्मकता न्यून होऊन ते ऐकण्याच्या स्थितीत आले. नंतर त्यांनी त्यांच्या वागण्याबद्दल क्षमायाचना केली.

८. नियोजनकौशल्य 

आम्ही मुंबईत राहून प्रसारसेवेला जात असू. तेव्हा ‘सकाळी १० वाजेपर्यंत साधकांचा महाप्रसाद सिद्ध करून प्रसाराला जायचे’, असे नियोजन असे. ‘सकाळी घाई होऊ नये’, यासाठी सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू या रात्रीच महाप्रसादाच्या पूर्वसिद्धतेचे नियोजन करून द्यायच्या. ‘रात्री सेवा करत असतांना साधकांना भूक लागते’, हे लक्षात घेऊन त्या संबंधित साधकांना खाऊचे नियोजन करण्यास सांगत. बर्‍याच वेळा सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांना थकवा असायचा, तरीसुद्धा त्या साधकांच्या समवेत थांबून सेवेचे नियोजन करून देत.

९. प्रसारातील साधकांची आईच्या मायेने काळजी घेणे

दादरला रात्री उशिरापर्यंत सत्संग होत असत. मधल्या वेळात ‘सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू स्वतः साधकांची झोपण्याची व्यवस्था झाली आहे ना ? त्यांना काही अडचण नाही ना ?’, हे पहात असत. त्या ‘साधिकांना उशी देणे, त्यांच्या अंगावर पांघरूण घालणे’, असेही करत. साधकांनाही ‘अंथरुणे-पांघरुणे पुरेशी आहेत ना ?’, हे त्या पहात असत.

१०. साधकांना आनंद देण्यासाठी त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट पुन्हा तितक्याच उत्सुकतेने ऐकणे

प्रसारातील विविध उपक्रमांसाठी, उदा. गुरुपौर्णिमा, शिबिरे इत्यादींसाठी मैदान किंवा सभागृह विनामूल्य अथवा अल्प दरात मिळाल्यावर साधक उत्साहाने आणि आनंदाने त्याविषयी सद्गुरु अनुताई अन् पू. जाधवकाकू यांना सांगण्यासाठी येत. तेव्हा त्या दोघींना पुष्कळ आनंद होत असे आणि ‘छान झाले !’, असे म्हणून आनंद व्यक्त करून त्या साधकांचे कौतुकही करत असत. तेच सूत्र अन्य साधकांनीही सांगितल्यावर जणू ते ‘नव्यानेच ऐकत आहे’, अशा भावाने त्या दोघी ऐकत असत. तेव्हा त्या साधकांनाही आनंद होत असे.

११. साधकांना त्यांच्या चुकांची तत्परतेने जाणीव करून देणे

अ. सभांचा प्रसार किंवा अन्य कुठलेही नियोजन चालू असतांना ‘साधकांकडून गंभीर चुका आणि त्रुटी रहात आहेत’, हे लक्षात आल्यावर त्या त्वरित साधकांना त्यांच्या चुका लक्षात आणून देत. ‘व्यष्टी साधना चांगली झाल्यास समष्टी सेवेची परिणामकारकता आपोआप वाढणार आहे’,  हे त्या संबंधित साधकांच्या लक्षात आणून देत.

आ. ‘सेवेतून साधकांचा अहं वाढत आहे’, हे लक्षात आल्यावर ऐनवेळी त्या दोघी साधकांच्या सेवांमध्ये पालटही करत.

इ. प्रत्येक उपक्रमानंतर सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू साधकांचा सत्संग घेत अन् उपक्रमामध्ये झालेल्या चुकांचा अभ्यास करून घेत.

१२. प्रसारातील साधकांशी जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

अ. काही वेळा मी सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांच्या समवेत बाहेर साधकांकडे निवासाला असायचे. तेव्हा साधकांचा सत्संग घेण्याच्या समवेतच ‘निवासाच्या ठिकाणच्या साधकांच्या कुटुंबियांशी जवळीक करणे आणि त्यांना घरकामात साहाय्य करणे’, यांचे महत्त्व त्यांनी त्यांच्या कृतीतून आमच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे ‘साधकांशी जवळीक वाढायला साहाय्य होते’, हे मला शिकायला मिळाले.

आ. काही साधकांना त्यांच्या घरगुती अडचणींमुळे बाहेर प्रसारात सेवेला जाता येत नाही. त्या वेळी ‘आपण त्यांना घरी बसून करता येणारी कोणती सेवा देऊ शकतो ?’, असा विचार वाढवायला हवा’, असे त्या सांगत.

‘गुरुदेवांच्या कृपेने मला सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू यांच्या सहवासात रहाता आले अन् त्यांच्याकडून वरील सूत्रे शिकता आली’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. वैशाली कोथमिरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२६)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक