लाहोर (पाकिस्तान) येथील ९ सार्वजनिक ठिकाणांची इस्लामी नावे पालटून पुन्हा हिंदु नावे ठेवली !

इस्लामपुरा आता कृष्णनगर, बाबरी चौक पुन्हा जैन मंदिर चौक झाले !

लाहोर (इस्लामाबाद) – गेल्या २ महिन्यांच्या आत लाहोर येथील ९ जागांची इस्लामी नावे पालटून पुन्हा मूळ हिंदु किंवा ब्रिटीश वारसा यांवर आधारित ठेवण्यात आली आहेत. यात इस्लामपुरा आता जुन्या ‘कृष्णनगर’ आणि ‘बाबरी मशीद चौक’ आता जुन्या ‘जैन मंदिर चौक’ या नावाने अधिकृतपणे ओळखला जाईल. यांचे फलकही लावले आहेत. विशेष म्हणजे या पलटाच्या विरोधात तिथे कोणताही कट्टरतावादी गट समोर आला नाही.

नामकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पाकिस्तानच्या सिंध आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांतही मूळ नावांची घोषणा शक्य आहे. शहरात नावे पालटण्याची प्रक्रिया १९९० च्या दशकात बाबरी ढाचा पाडल्यानंतर झाली. तेव्हा केंद्रात नवाज शरीफ, नंतर बेनझीर आणि परवेझ मुशर्रफ यांची सरकारे राहिली. आता शरीफ सरकारने नावांत पालट करण्याचा निर्णय घेतला. याला कोणत्याही जिहादी संघटनांनी विरोध केला नाही.

१. जैन मंदिराजवळच्या अनारकली भागातील मौलाना वाजिद कादरी मानतात की, इस्लामला मंदिर किंवा गुरुद्वारा यांविषयी कोणतीही समस्या नाही. १९९० च्या दशकात जैन मंदिर चौकाचे नाव पालटून बाबरी मशीद चौक केले. हा राजकीय निर्णय होता. आम्ही याला कधीही ‘बाबरी मशीद चौक’ म्हटले नाही. आमच्या पूर्वजांनी ही हिंदु नावे ठेवली होती, तेदेखील मुसलमानच होते, हे समजून घ्यावे लागेल. यामुळे त्यांच्या इमानाला (निष्ठेला) धक्का लागला नव्हता.

२. लाहोरच्या बीकनहाऊस विद्यापिठाचे प्रा. साद मलिक म्हणाले की, हा खरेच सुखद पालट आहे. मी याला नेहमी लक्ष्मी चौकच म्हणत आलो; कारण माझे वडील याला याच नावाने संबोधित करायचे. महापालिकेने तिच्या कागदपत्रांमध्ये याचे नाव भलेही मौलाना जफर अली चौक केले असेल; पण माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी लक्ष्मी चौक त्या वारशाचा भाग आहे, ज्याचा जफर अली खान यांच्या नावाशी संबंध नाही. लक्ष्मी चौक हे पिढ्यान्‌पिढ्या जोडलेले नाव आहे.