सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश सनातन संस्थेला प्राप्त होण्यापर्यंतचा दिव्य प्रवास !

सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे दर्शन घेतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अ. प्रयाग महाकुंभ (जानेवारी २०२५)

श्री. सीतारामन्‌गुरुजी यांनी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु श्री श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे २० हून अधिक दिव्य अंशांवर त्रिवेणी संगमात अभिषेक करून जगाला त्याविषयी अवगत केले. कांची कामकोटी पीठाच्या आचार्यांच्या आज्ञेने त्यातील ११ दिव्य अंश श्री श्री रविशंकर यांच्याकडे सोपवले. श्री श्री रविशंकर यांनी सोमनाथ दिव्यदर्शन यात्रा संपूर्ण भारतात करायचे ठरवले.

आ. गोवा येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव (मे २०२५)

१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फर्मागुडी (गोवा) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी महोत्सवातील साधकांना दर्शनासाठी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे २ दिव्य अंश पाठवले होते. या वेळी ३० सहस्रांहून अधिक जणांनी त्यांचे दर्शन घेतले.

इ. तंजावर येथे सीतारामन्‌गुरुजी यांची पहिली भेट (ऑक्टोबर २०२५)

सोमनाथ ज्योतिर्लिंगासह डावीकडून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि वेदप्रचाररत्न वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन्

२६ ऑक्टोबर २०२५ या दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या स्वतः तंजावरला श्री. सीतारामन्‌गुरुजी यांच्या वेदपाठशाळेत गेल्या. या वेळी गुरुजींनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून रुद्रपारायणासहित सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या २ दिव्य अंशांचा अभिषेक करवून घेतला. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री. सीतारामन्‌गुरुजी यांची हिंदी भाषेतून मुलाखतही घेतली.

ई. देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव (डिसेंबर २०२५)

यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये देहली येथील भारत मंडपम् येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात तंजावरचे श्री. सीतारामन्‌गुरुजी यांचे आगमन झाले. या वेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाच्या २ अंशाचे सहस्रो लोकांना दर्शन घडवले. त्याविषयी त्यांनी उपस्थितांना व्यासपिठावरून सर्व माहिती सांगितली.

उ. श्रीरामनवमी (मार्च २०२६)

वर्ष २०२६ च्या श्रीरामनवमीला श्री. सीतारामन्‌गुरुजी यांना ईशप्रेरणा झाली, ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे धर्मसंस्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी अथक प्रयत्न करत असल्याने त्यांच्याकडे सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांपैकी ४ अंश कायमस्वरूपी द्यावे. असे केल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊन ते लवकर साकार होईल.’ याविषयी श्री. सीतारामन्‌गुरुजी यांनी लगेच भ्रमणभाष करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना कळवले. ही वार्ता कळताच दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी यांना आनंद होऊन त्यांचे मन भगवान शिवाच्या कृपेविषयी कृतार्थ झाले. त्यांनी हे सर्व गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितले. गुरुदेव म्हणाले, ‘‘साक्षात् शंकर आता आपल्याकडे रहायला येत आहे !’’ यानंतर तीनही मोक्षगुरूंनी श्री. सीतारामन्‌गुरुजी यांच्याकडून शिवलिंगाचे दिव्य अंश घेण्यासाठी ११ वा रुद्र हनुमंत जयंतीचा, म्हणजेच २ एप्रिल २०२६ हा दिवस निवडला !

– श्री. विनायक शानभाग, कांचीपूरम्, तमिळनाडू.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक