‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता ! तुझा धर्म ?’

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायावर टीका केल्याकारणाने त्यांना काळे फासण्यात आले. त्यावर भाष्य करणारा लेख

‘विचारांची लढाई विचारांनी लढावी !, नैतिकता सांभाळली पाहिजे, हे कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाहीला आणि राज्यघटनेला मान्यता आहे, यानुसार सर्वांनी चालायला हवे…’ वगैरे वगैरे असे अनेक साक्षात्कार अचानक अनेकांना होऊ लागले आहेत… पण गंमत अशी की, हे तेच लोक आहेत, ज्यांनी क्षणोक्षणी लोकशाहीची, राज्यघटनेची, कायद्याची, नीतीमत्तेची सगळी मूल्ये पायदळी तुडवून केवळ ठोकशाहीला प्राधान्य देऊन स्वतःचे प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. ज्यात हिंदु धर्मातील देवीदेवतांची खिल्ली उडवणे, ‘त्यांना देव मानू नका’, असे म्हणणे, साधूसंतांच्या पोशाखावरून टिंगलटवाळी करणे, एवढेच काय, अगदी एखाद्या व्यक्तीच्या जातीद्वेषापोटी त्याच्या मृत्यूनंतर साखर वाटणे, एखाद्या व्यक्तीला टीकाटिपणी केल्याकारणाने स्वतःच्या सत्तेचा वापर करून पोलिसांकरवी उचलून स्वतःच्या बंगल्यावर नेऊन प्रचंड मारहाण करणे, उठसूट कुणाला काळे फासणे, तोडफोड करणे आणि त्याला आमच्या ‘स्टाईलने’ (पद्धतीने) असे घोषित करणे, हे प्रकार सर्रासपणे केलेले आहेत.

विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

१. कथित पुरोगामी अन् निधर्मीवादी यांच्याकडून कांगावा

काही काळ ही बेबंदशाही सत्तेतील जाणत्या नेत्यांनी राजकीय पाठबळ दिल्याने चाललीही. यात अनेक चांगल्या व्यक्तींना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्या वेळी हेच लोक आणि या लोकांपायी बुद्धी गहाण ठेवलेले समाजातील बुद्धीप्रामाण्यवादी लोक विकृत पद्धतीने हसत हसत या सगळ्या कृती कशा योग्य आहेत, याचे वारंवार समर्थन करत होते; मात्र आज जो चुकीचा…हो ‘पायंडा’ त्यांना गोड वाटत होता; म्हणून त्यांनी पाडला. तो आज उजव्या विचारसरणीच्या लोकांनी थोडासाच वापरला काय, तो लगेच ‘अवघ्या विश्वातील विचारवंत, लोकशाही, कायदा आणि नीतीमूल्ये धोक्यात आली आहेत’, असा ‘आरगा’ यांनी चालू केला आहे. हे पाहून माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या प्राचीन इतिहासातील महाभारतातील कर्णवधाच्या वेळी घडलेला प्रसंग आठवतो. तो कवी मोरोपंतांनी त्यांच्या अतिशय समर्पक आणि अजरामर अशा आर्यांमधून मांडला आहे. (पुढे दिलेला संवाद ‘रथचक्र उद्धरू दे – कृष्ण कर्ण संवाद – मोरोपंतांची आर्या’ या काव्य संग्रहातील आहे.)

ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

२. स्वतःच्या सोयीनुसार इतिहास आणि संतवाङ्मय यांचे अर्थ जोडणार्‍यांसाठी संवाद

महाभारताच्या समरांगणात कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाचे कर्णाला उद्देशून उद्गार होते, ‘तेव्हां गेला होता कोठें राधासुता (कर्ण) ! तुझा धर्म ?’ (इतिहास पूर्ण वाचणे, एखाद्या विषयाची एकांगी बाजू न बघता त्याचा पूर्ण अभ्यास करणे, या गोष्टीचा आणि या विशिष्ट वर्गाचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. असला, तर स्वतःच्या सोयीनुसार इतिहास आणि संतवाङ्मय यांचे अर्थ जोडणे एवढाच संकुचित संबंध असतो. त्यांनी किमान या संभाषणातील क्रमांक ८ ते १२ एवढी सूत्रे तरी वाचावीत, म्हणजे थोडे आरशात पाहिल्यासारखे वाटेल आणि लक्षात येईल की, स्वतःचे नेमके काय चुकले आहे.)

अर्जुन कर्णाला बाण मारण्यास सज्ज होत असतांना कर्णाने त्याला धर्माची करून दिलेली आठवण

स्वतःच्या रथाचे चाक भूमीत रुतल्यानंतर ते काढण्यासाठी उतरल्यावर जेव्हा अर्जुन कर्णाला बाण मारण्यास सज्ज होत आहे, तेव्हा आयुष्यभर कौरवांच्या चुकीच्या गोष्टींचे उघडपणे समर्थन करत त्यात सहभागी होणार्‍या कर्णाला स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर दिसतो. त्या वेळी अत्यंत भयग्रस्त अवस्थेत युद्धाचे नियम आणि क्षत्रियांनी पाळायचे धर्म यांविषयीचे तत्त्वज्ञान आठवते अन् तो अर्जुनाला म्हणतो,

‘बळ तुझे अनंत रहा स्वस्थ मुहूर्तभरि, रण-श्रद्धा पुरवील, गा, अनंतर हा. ॥ १ ॥’

अर्थ : स्वतःच्या (कर्णाच्या) वधाला सज्ज झालेल्या अर्जुनाला बघून कर्ण (उपहासाने) म्हणाला, ‘भले अर्जुना तुझे बळ / सामर्थ्य असीमित होवो; पण आता तू जरा अवकाश घे, या युद्धात तुला लढण्याच्या अनंत संधी लाभणार आहेत. त्यामुळे जरा धीराने घे.’

रथचक्र उद्धरूं दे श्रुति-शास्त्रज्ञा, महा-रथा कुल-जा, साधु न हाणिति अरिला, पाहति अ-धृतायुध व्यथाकुल ज्या. ॥ २ ॥

अर्थ : माझ्या रथाचे (रुतलेले) चाक बाहेर येऊ दे. हे श्रुति आणि शास्त्र पारंगत, तसेच उत्तम कुलोत्पन्न अर्जुना, साधू (सज्जन, मर्यादितपुरुष) शत्रूला असाहाय्य किंवा कुठल्या समस्येने ग्रस्त पाहून त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. (त्यामुळे हा धर्म तू पाळ.)

तूं स्वरथी, क्षितिवरि मी, तूं सायुध, मी अशस्त्रकवच रणीं; न वधावें मज, जो मी गुंतुनि गेला असें रथोद्धरणीं. ॥ ३ ॥

अर्थ : या रणात, तू तुझ्या रथावर आहेस आणि मी भूमीवर, तू सायुध (आयुधांनी युक्त, सशस्त्र) आहेस, तर मी निःशस्त्र अन् कवचहीन (असुरक्षित) ! माझा (अशा प्रकारे) मी रथचक्र बाहेर काढत असतांना वध करू नकोस.

भ्यालों न तुज हरीसहि; जो न तुला विमुख, काय कातर तो? किथतों यास्तव कीं जन धर्में भवसिंधु, नायका, तरतो. ॥ ४ ॥

अर्थ : हरि (कृष्ण) जरी तुझ्यासह असला, तरीही मी तुला घाबरलेलो नाही ! जो कधीही तुझी संगत सोडणार नाही (का विमुख होईल ?) मी हेही जाणतो की, कृष्ण जनमानसात धर्माचा भवसिंधु (सज्जनांचा प्रतिपालक आणि संरक्षक) एक नायक म्हणून वास करतो.

रक्षावा धर्म बुधें, कुशळाचा धर्म हा निधी, राहें स्थिर, जें करिसि निरायुधमथन करिल धर्महानि, धीरा, हें ॥ ५ ॥

अर्थ : त्यामुळे हे धर्म जाणणार्‍या (अर्जुना) तुझ्या धर्माचे रक्षण कर; कारण योग्य आणि सज्जन माणसासाठी त्याचा धर्म हीच त्याची संपत्ती आहे. तू जर कोण्या निरायुध (शस्त्रहीन) माणसाची हत्या करशील, तर त्याने तुझ्याच धर्माची हानी होणार आहे. त्यामुळे धीर धर, थोडा थांब.

– ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

३. श्रीकृष्णाने कर्णाला धर्मकर्तव्यांची आठवण करून देणे

कृष्ण म्हणे, राधेया, भला बरा स्मरसि आजि धर्मातें नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवास, न स्वकर्मातें. ॥६॥

अर्थ : श्रीकृष्ण म्हणाला, ‘राधेया (कर्ण) आज बरी तुला धर्माची आठवण येत आहे ! नीच आणि व्यसनी माणसे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर नेहमीच स्वतःच्या नशिबाला दोष देतात; पण स्वकर्माला कधीही दोष देत नाहीत. (वाईट माणसे कायम आपल्या अपयशाचे, दुर्भाग्याचे खापर दुसर्‍यांवर फोडतात; पण कधीही स्वतःच्या कर्मावर दोष धरत नाहीत.)

जेव्हा तूं दुर्योधन, दुःशासन, शकुनि एक-मति झालां, कैसे कपट-द्यूतीं चित्तींहि न धर्म लंघितां भ्याला ? ॥ ७ ॥

अर्थ : जेव्हा तू, दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी एकत्र आला आणि जेव्हा तुम्ही कपट करून द्युत मांडला, तेव्हा तुला धर्मोल्लंघनाची भीती वाटली नाही का ?

जेव्हां सभेसी नेली पांचाळी, मानिलें मनी न शर्म! तेव्हां गेला होता कोठे, राधासुता तुझा धर्म ? ॥ ८ ॥

अर्थ : जेव्हा पांचालीला (द्रौपदी) भर सभेत नेले, तिचा अपमान केला गेला, तेव्हा तुझ्या मनाला शरम नाही वाटली का ? तेव्हा तुझा हा ‘धर्म’ कुठे गेला होता हे राधासुता ?

फेडी वस्त्र सतीचें जेव्हां उघडे करावया आंग, गेला होता कोठें धर्म तुझा तेधवां ? वृषा, सांग ॥ ९ ॥

अर्थ : एका सतीचे वस्त्र फेडून तिला निर्वस्त्र केले जात होते, तेव्हा हे वृषा (कर्ण) तुझा हा ‘धर्म’ कुठे गेला होता सांग ?

चारुनि विषान्न भीमा सर्प डसविले, असें नृपें खोटें कर्म करवितां, कर्णा, होता तव धर्म तेधवां कोठें? ॥ १० ॥

अर्थ : भीमाला जेव्हा कपटाने विष खायला लावून विषारी सर्पच दंश दिले, असे पापकर्म राजे (राजकुमार दुर्योधन आणि दुःशासन) करत होते, तेव्हा तुझा ‘धर्म’ कुठे गेला होता ?

केले दग्ध जतु-गृहीं त्वां पांडव वारणावतीं जेव्हां, गेला होता कोठें धर्म तुझा, सूत-नंदना, तेव्हां ? ॥ ११ ॥

अर्थ : (लाक्षागृह) जाळून जेव्हा वारणावत गावी पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा हे सूत नंदन (सूतपुत्र) तुझा ‘धर्म’ कुठे गेला होता ?

अभिमन्यु बाळ बहुतीं वधितां, त्वां वारिलें न तें कर्म; तेव्हा गेला होता कोठें, राधासुता, तुझा धर्म ? ॥ १२ ॥

अर्थ : अभिमन्यू हा बालक होता. त्याला युद्धात अनेक जणांनी मिळून मारले. त्यांना तू थोपवण्याचा प्रयत्न करणे तर दूरच तू स्वतःही त्या हत्येत भाग घेतला, तेव्हा राधासुता तुझा ‘धर्म’ कुठे गेला होता ?

पूर्वीं धर्म न रुचला, त्यजिला निपटूनि जो जसा कुचला; आतांचि बरा सुचला! काळगृहा सर्व व्हा परासु चला. ॥ १३ ॥

अर्थ : पूर्वी धर्म रुचला नाही, पटला नाही, त्या धर्माचा तू त्याग केला, त्या धर्माला पायाखाली तुडवले आणि आता जेव्हा मृत्यू समोर दिसू लागताच पुन्हा हा ‘धर्म’ तुला आठवला का ? (आता मरायला सिद्ध हो !)

मागेंचि धर्म करितां, जरि देतां राज्य, धर्म वांचविता; न जगें, जो दुर्भिक्ष-व्यसनांपूर्वी न धान्य सांचविता. ॥ १५ ॥

अर्थ : जर तू आधीच धर्माने वागला असता, भले त्या धर्मरक्षणासाठी तुला राज्य (अंग देश) त्यागावे लागले असते. जो मनुष्य दुर्भिक्ष (पूर, दुष्काळ) किंवा व्यसनाधीन होण्याआधी धान्य संचय करत नाही, तो फार काळ जगत नाही.

आतां रक्षील कसा धर्म? तुम्हीं वित्त-मद्य-मत्तांनीं जो लोटिला दहादां, स्वहितहि मानूनि अहित, लत्तानीं. ॥ १६ ॥

अर्थ : आता तुला हा ‘धर्म’ का वाचवेल ? तुम्ही पैसा, मद्य (व्यसने) आणि अहंकाराने भरलेल्या तुम्ही लोकांनी याचा धर्माला १० वेळा (अनेकदा) लोटले आहे (त्याचा खून केला आहे). या दोषांमुळे अंध होऊन तुम्ही स्वहितालाही अहित मानून तुम्ही धर्माला लाथाडले.

रक्षावा धर्म असा करिशी उपदेश, तरि असे मान्य; रक्षितसों धर्माते; आम्हांला धर्म ठाउका नान्य. ॥ १७ ॥

अर्थ : तरीही ‘धर्माचे रक्षण’ कसे करावे, याबद्दल तू उपदेश करणे हे मला मान्य आहे; पण आम्ही या ‘धर्माचे रक्षण’ रक्षण करतो. आम्हाला केवळ ‘धर्म’ काय आहे, तेच ठाऊक आहे (बाकी कशालाही आम्ही मानत नाही).

४. बेकायदेशीर कृत्ये करणार्‍यांनी कायद्याने वागण्याविषयी सांगणे, हे हास्यास्पद !

जे देव, देश आणि धर्म यांच्यावर श्रद्धा ठेवूनही लोकशाही अन् राज्यघटना यांच्या चौकटीतच स्वतःची कर्तव्ये पार पाडण्याचा प्रयत्न करतात; पण ज्यांना विद्रोह करायचा म्हटले की, संत तुकाराम महाराज आठवतात आणि देव मानायचा कि नाही ? असे म्हटले की, चार्वाक आठवतो. ‘अशा वैचारिक दलबदलू, अधर्मी, विद्वेषी आणि बेकायदेशीर कृत्यात रात्रंदिवस सहभागी असणार्‍यांनी कायद्याने वागावे, विचारांनीच लढाई लढायची असते, असा आग्रह धरणे’, हे या क्षणी हास्यास्पद आहे. बाकी तुम्हाला आता असे वागणे आवश्यक आहे. पटले असेल, तर स्वागत आहे. कायदा-सुव्यवस्था, लोकशाही मूल्ये, राज्यघटनेच्या चौकटीतच आपण सर्वांनी काम केले पाहिजे. यासाठी आता आपण पुढाकार घ्यावा. सर्व जणांसाठी सकल राष्ट्रासाठी हे हितकारक आहे. वैचारिक मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे; पण खालच्या पातळीवर जाणे, हे आपल्या थोरामोठ्यांच्या इतिहासाला धरून नाही. एवढे तरी लक्षात ठेवून आपल्याकडे विचारांची देवाणघेवाण ही एकमेकांचे वैचारिक खंडण-मंडण या प्रकाराने नेहमीच स्वागतार्ह आहे. सामोपचाराने आतातरी पुढील काळात मार्गक्रमण केल्यास नक्कीच निकोप लोकशाहीचा आनंद आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना अनुभवता येईल !

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४

अर्थ : की खलांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा आणि त्या खलांची सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी अन् प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्भवेत् ।।

अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.

– श्रीगुरुचरणपदाश्रीत ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, श्रीक्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (१०.५.२०२६)