तेलंगाणा राज्यातील मंदिरांच्या रक्षणासाठी दिलेला कायदेशीर लढा !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. आतंकवाद्यांकडून नामराम रेड्डी यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न

मी वर्ष १९८० पासून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विश्व हिंदु परिषद यांचे कार्य केले आहे. हे कार्य करत असतांना मी अयोध्येतील रामजन्मभूमीच्या आंदोलनातही सहभाग घेतला आहे. वर्ष १९९२ मध्ये आतंकवाद्यांनी मला २ वेळा षड्यंत्र रचून पकडण्याचा प्रयत्न केला; पण मी त्यांना सापडलो नाही. त्यामुळे चिडून त्यांनी एका औषधाच्या दुकानात बसलेल्या माझ्या मित्राला मारले आणि निघून गेले. हा मित्र संघाचे कार्य करत असे. एक महिन्यानंतर मला मारण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रयत्न केला; पण तोही अयशस्वी झाला. त्यामुळे भाग्यनगरच्या पोलीस आयुक्तांनी माझ्यासाठी घरी सुरक्षाव्यवस्था देण्याची सिद्धता दाखवली. मी म्हटले, ‘मी घरी सुरक्षा घेऊन काय करणार ? सुरक्षा अधिकार्‍याला घेऊन कुठे कुठे फिरणार ?’ मी नाही म्हटल्यावर पोलीस आयुक्तांनी मला जवळ शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला आणि शस्त्रही मिळाले. मी विद्यासागरला आल्यावर कर्नाटक सरकारकडे ते परत केले.

श्री. नामराम रेड्डी यांचा परिचय

श्री. नामराम रेड्डी

भाग्यनगर, तेलंगाणा येथील श्री. नामराम रेड्डी हे ‘तेलंगाणा वानर सेना’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या विविध समस्यांवर कायदेशीर लढा देतात. त्यांनी मंदिरांच्या सहस्रो एकर भूमीचे रक्षण केले आहे.

तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथील १२ मोठ्या मंदिरांच्या संदर्भात ते कायदेशीर लढा देत आहेत. त्यांपैकी ४ मोठ्या मंदिरांच्या कायदेशीर लढ्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. भाग्यनगरमधील मुसलमानबहुल भागातील कालीमाता मंदिराची ३२ एकर भूमी त्यांनी कायदेशीर लढा देऊन मुक्त केली आहे.

२. मंदिराच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी ‘तेलंगाणा वानर सेने’ची स्थापना

श्रीशैलम् येथील देवथलागुट्टा हे मंदिर माझ्या घरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. श्रीशैलम् येथे जातांना छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात थांबले होते. त्या मंदिराची भूमी एक धर्मांध कह्यात घेण्याच्या बेतात होता. तेथील अंजनेय स्वामी मंदिर तोडून तेथे ‘रिसॉर्ट’ बनवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न होता. याविषयी माहिती मिळाल्यावर मी माहिती अधिकाराखाली मंदिराची कागदपत्रे मिळवली आणि त्याच्यावर खटला भरला. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या मंदिराच्या ३३ एकर भूमीचे रक्षण होण्यासाठी मी ‘तेलंगाणा वानर सेने’ची स्थापना केली. आतापर्यंत आम्ही ३ सहस्र एकर भूमी सरकारच्या कह्यातून मुक्त केली. आज आमच्या संघटनेच्या तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये शाखा आहेत. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश येथील उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेला भद्राचलम्च्या ९१७ एकर भूमीचा खटलाही आम्ही जिंकला. या कार्यासाठीच ईश्वराने मला २ वेळा आतंकवाद्यांच्या सापळ्यातून वाचवले होते, असे लक्षात आले.

३. सीतारामपूर येथील ७४८ एकर भूमीचा लढा

भाग्यनगरच्या लगत असलेले सीतारामपूर येथे ७४८ एकर भूमी आहे. तेथे १ एकर भूमीचा भाव ५ ते ६ कोटी रुपये आहे. याठिकाणी तेलंगाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलाने ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’ उभारण्यासाठी भूमी अधिग्रहित केली. त्यातील काही शेतभूमी मंदिराची आहे. ही भूमी मंदिराने सरकारला दिलेली नाही. मंदिराने ती काही लोकांना भाडेतत्त्वावर चालवायला दिली होती. त्या मोबदल्यात भूमीचे भाडे म्हणून ते लोक मंदिराला प्रती एकर २-३ सहस्र रुपये वर्षाला देत होते. हे शहर वसवणार्‍यांना माहिती नव्हते. त्यांनी ती भूमी कसणार्‍यांना प्रति एकर ११ लाख रुपये दिले. अर्थात् याचा मंदिराला १ रुपयाही मिळाला नाही. हे प्रकरण आम्ही उचलून धरले. सरकारने तडजोड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही ही भूमी त्यांना देण्यास स्पष्ट नकार दिला.

४. कोणत्याही राज्यातील मंदिराची भूमी वाचवण्यासाठी सिद्ध !

आम्ही माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून माहिती गोळा करतो. याखेरीज जनहित याचिका आणि संयुक्त प्रकरणही प्रविष्ट करतो. एकदा याचिका प्रविष्ट केली की, प्रकरण माझ्या हातात रहात नाही. मी तडजोड करत नाही. पारदर्शकता टिकून रहावी; म्हणून याचिका करतो. आतापर्यंत एकही खटला पराभूत झालो नाही. सध्या सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येणे आवश्यक आहे. जर एकत्र येणे शक्य नसेल, तर जेवढे आपल्याकडून होते, तेवढे कार्य प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. मंदिराच्या भूमीची कागदपत्रे सिद्ध असतील, तर आम्ही कोणत्याही राज्यातील काम करण्यास सिद्ध आहोत. मंदिर आणि मंदिराची भूमी वाचवण्यासाठी माझ्यासह माझे सहकारी बालसुब्रह्मण्यम्, अधिवक्ता पी. नरेंद्र हे सर्वाेच्च न्यायालयातही विनामूल्य लढण्यास सिद्ध आहेत.