भारताचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा नेहमी कर्तव्यकठोर आणि गंभीर असतो; पण ३ दिवसांपूर्वी बंगालच्या नवनिर्वाचित आमदारांसमोर बोलण्यासाठी ते उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे स्मितहास्य होते. संपूर्ण भाषणाच्या कालावधीतही अनेकदा ते उत्स्फूर्तपणे हसले. त्यांनी बोलूनही दाखवले की, त्यांचे शरीर, मन आणि आत्मा यांतून आनंदाची लहर दौडत आहे. नेहमी रोखठोक, तर्कशुद्ध, तथ्याधारित मांडणी करणार्या, भावनांचे प्रदर्शन टाळणार्या अमित शहांकडून असे काही ऐकायला मिळेल, असे कधी वाटलेच नव्हते; पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नव्हते; कारण निवडणुकांमधील प्रचंड विजय त्यांच्यासाठी नवीन नसले, तरी बंगालचा विजय अनेक कारणांनी वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण (स्पेशल) होता.

१. वैचारिक आणि संघटनात्मक पितृत्व असलेल्या बंगालमध्ये भाजपचा विजय महत्त्वाचा !
भाजपच्या विचारधारेचा गाभा असलेल्या ‘हिंदुत्व’ आणि ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या सिद्धांतांचा उगमच बंगालमध्ये झाला. हिंदुत्वाची एक राजकीय विचार म्हणून मांडणी सर्वप्रथम चंद्रनाथ बसू यांनी बंगालमध्ये केली, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाचा सिद्धांत उदयाला आला तो बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद या ऋषितुल्य विद्वानांच्या विचारातून. भाजपचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाची स्थापना केली ती श्यामाप्रसाद मुखर्जींनी ! अशा प्रकारे जनसंघ / भाजप यांचे वैचारिक आणि संघटनात्मक पितृत्व ज्या बंगालकडे जाते, तिथे प्रथमच झालेला भाजपचा विजय इतर कुठल्याही विजयापेक्षा वेगळा अन् महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच ९ मे या दिवशी शुभेंदु अधिकारी यांच्या देवदुर्लभ शपथग्रहण सोहळ्याच्या प्रसंगी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी काम केलेले माखनलाल सरकार यांचा सन्मान करतांना नरेंद्र मोदीही भावूक झालेले दिसले.
२. साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामुळे बंगालची सर्व स्तरांवर झालेली पीछेहाट

दुसरे महत्त्वाचे कारण, म्हणजे गेली ५० वर्षे बंगालवर असलेला साम्यवाद्यांचा आणि त्यांची प्रतिकृती भासणार्या तृणमूल काँग्रेसचा प्रभाव. या ५० वर्षांत बंगालची सांस्कृतिक, वैचारिक आणि बौद्धिक ओळख पूर्णपणे पुसण्यात आली अन् साम्यवादी विचारांचा गाभा असलेल्या कलह, अराजक, हिंसा आणि विध्वंस यांच्या गर्तेत बंगालला ढकलून दिले गेले. आर्थिक समृद्धी ही जणू काही बंगाली संस्कृतीच्या विरुद्ध आहे, असा विकृत समज पसरवण्यात आला. समृद्धी आणि संपन्नता यांचा दुःस्वास करणे, ही बंगाली अस्मिता ठरवली गेली. यामुळे औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेला बंगाल गरिबी, बेरोजगारी आणि मागासलेपणा यांच्या गर्तेत अडकला. याखेरीज ही परिस्थिती खेदजनक नव्हे, तर अभिमानास्पद असल्याचे मानणे, हीच बंगालची ओळख ठरल्यामुळे या गर्तेतून बाहेर पडण्याचे मार्गही बंद झाले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रासारख्या उथळ आणि दिखाऊ महिलेने नुकतेच ‘बंगाल हे कधीच मोठ्या उद्योगांचे केंद्र नव्हते आणि कधी होणारही नाही’, असे बिनडोक अन् हास्यास्पद विधान केले. वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींनी सांगितले होते, ‘‘भारताच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये झपाट्याने प्रगती करत असतांना पूर्वेकडील राज्ये मात्र मागे पडली आहेत. बिहार, आसाम, बंगाल, ओडिशा ही राज्येही झपाट्याने प्रगती करू लागतील, तेव्हाच भारत खर्या अर्थाने आर्थिक महासत्ता बनू शकेल.’’ हे ‘व्हिजन’ (दूरदृष्टी) बंगालच्या विजयाखेरीज पूर्ण होणे शक्य नव्हते. म्हणूनही हा विजय ‘स्पेशल’ ठरतो.
३. बंगालचा विजय विशेष महत्त्वाचा का ?
गेल्या ५० वर्षांत बंगालचे ‘लंपनायझेशन’ झाले, म्हणजेच कोपर्या-कोपर्यावर कॅरम खेळत बसलेले बेरोजगार तरुण, त्यांना हाताशी धरून दहशत माजवणारे सत्ताधारी आणि या युतीच्या हिंसेसमोर असाहाय्य झालेली जनता ही बंगालची ओळख ठरली. काल अमित शहा यांनी या परिस्थितीचे वर्णन ‘प्रशासन का राजनीतीकरण और राजनीती का अपराधीकरण’ (प्रशासनाचे राजकीयीकरण आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण), या नेमक्या शब्दांत केले. कायदा, सुव्यवस्था, सन्मानाने जगण्याच्या संधी… हे सगळेच घसरत गेल्यामुळे साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान आणि विद्वत्ता या क्षेत्रातील बंगालचे सर्वोच्च स्थान बघता बघता रसातळाला गेले. हे स्थान परत मिळवण्याची यंदाच्या निवडणुका ही शेवटची संधी होती. म्हणूनही बंगालचा विजय विशेष महत्त्वाचा होता.
४. बंगालच्या जनतेने धारण केलेले रौद्ररूप
साम्यवाद्यांनी आणि विशेषतः तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी क्षणिक राजकीय स्वार्थासाठी बांगलादेशाच्या सीमेवर कुंपण घालण्याची योजना अडवून धरली अन् अनिर्बंध स्थलांतराकडे डोळेझाकच केली नाही, तर त्याला प्रोत्साहन दिले. यामुळे लोकसंख्येचा समतोल झपाट्याने बिघडू लागला. बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या धोकादायक पातळीवर पोचली. याचे चटके बंगालने ‘डायरेक्ट ॲक्शन डे’ (थेट कारवाई करणे) आणि फाळणीच्या वेळी भोगले होते. त्या आठवणी जाग्या झाल्या. देशाची अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी, बंगालची सनातन शाक्त परंपरा जपण्यासाठी; सुभाषचंद्र बोस, बाघा जतीन, रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल यांसारख्या असंख्य क्रांतीकारकांनी बंगालच्या भूमीत रुजवलेल्या राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बंगालच्या जनतेने कालीमातेचे रौद्र रूप धारण करून देशविरोधी शक्तींना गाडले. म्हणून ही नेहमीसारखी सर्व साधारण निवडणूक नव्हती, तर हे होते भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा मुकुटमणी असलेल्या बंगालची त्याच्या मूळ जागी प्रतिष्ठापना करण्याचे पवित्र कार्य. म्हणूनच मोदी, शहा, शुभेंदु अधिकारी आणि इतर भाजप नेत्यांच्या शब्दांना मंत्रांचे सामथ्य प्राप्त झाले. बंगालच्या जनतेने नोंदवलेले एक-एक मत हे यज्ञातील समिधेसारखे प्रभावी ठरले.
५. बंगालची निवडणूक महिलांवर झालेल्या नृशंस अत्याचाराचा प्रतिशोध घेणारी !
हा विजय असाधारण होता, याचे आणखी एक आणि सर्वाधिक महत्त्वाचे कारण, म्हणजे यासाठी मोजावी लागलेली किंमत. साम्यवादी आणि तृणमूल यांच्या हिंसेत ३२१ भाजप कार्यकरतींनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी रक्ताचे शिंपण करून भाजपच्या विजयासाठी बंगालची भूमी सिद्ध केली. म्हणूनच आज शुभेंदु अधिकारी यांच्या शपथविधीच्या जागी या ३२१ हुतात्म्यांच्या नावांचा फलक उभारून त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यात आला. संदेशखाली, आर्.जी. कर आणि बंगालमधील इतर अनेक ठिकाणी महिलांवर झालेल्या नृशंस अत्याचाराचा प्रतिशोध घेणारी ही निवडणूक होती. बंगालच्या जनतेने मतांच्या झंझावाताने भीती आणि दहशत यांचे मळभ पार उडवून लावले अन् संस्कृती, सभ्यता, सुरक्षा, सन्मान, तसेच समृद्धी यांची पहाट अखेर बंगालमध्ये उगवली. भारतीय जनता पक्षापेक्षा ही निवडणूक बंगालच्या जनतेनेच लढवली, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. भाजपचा विजय संपूर्ण बंगालने ज्या ऊर्जेने, उत्साहाने आणि एखाद्या राज्यव्यापी उत्सवासारखा साजरा केला, त्याचा कळस आज शुभेंदु अधिकारी यांच्या ऐतिहासिक शपथग्रहण समारंभाच्या वेळी झाला.
६. भीतीमुक्त समाजाचे स्वप्न साकार होण्याचा प्रारंभ…
बंगालचे लाडके सुपुत्र आणि कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पाहिलेले भीतीमुक्त समाजाचे स्वप्न साकार होण्याचा प्रारंभ बंगालमध्ये झाला आहे, याची खात्री आज बंगालच्या जनमानसाचे जे विराट दर्शन शपथविधीच्या वेळी घडले त्यामुळे पटली…
चित्त जिथे भीतीशून्य उंच जिथे माथा ।
ज्ञान जिथे मुक्त तिथे जागृत करि नाथा ।।
(ही कविता म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ मधील प्रसिद्ध कवितेचा मंगेश पाडगावकर यांनी केलेला अनुवाद आहे.)
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (९.५.२०२६)
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?