विविध दिव्य दर्शने आणि महान शक्तींच्या साहाय्याने आलेले दिव्य अनुभव !

११.५.२०२६ या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1038703.html

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

२ ई. महान शक्तींच्या साहाय्याने काळ्या जादूचा प्रयोग दूर करण्यात मिळालेले यश

२ ई १. रोबीन (१५ वर्षांची मुलगी)

२ ई १ अ. रोबीन या १५ वर्षांच्या देखण्या मुलीवर काळ्या जादूचा प्रयोग होणे आणि त्यामुळे कुटुंबियांचे मनःस्वास्थ्य बिघडणे : मिस रोबीन ही १५ वर्षांची अतिशय देखणी मुलगी होती. हिच्यावर एका मित्राचे प्रेम होते; पण ते महाविद्यालयामधील प्रेम अशी तिची समजूत होती. नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्याची किंवा तसे संबंध जोडण्याची तिला सक्ती केली; पण तिने या प्रकारास न जुमानता त्याचे संबंध तोडून टाकले. पुढे दोन मासांनी तिला या गोष्टीचा विसर पडला. मग या प्रेमविराने तिच्या‍वर ‘ग्रूफ ब्लॅक मॅजिकां’कडून प्रयोग करवला. तेव्हापासून आठ मास दिवसातून १० ते १२ वेळा तरी ‘व्हेरी हीट, व्हेरी हीट’ इत्यादी म्हणत अंगावरील संपूर्ण कपडे काढून नग्न होऊन वाटेल, तिथे ती फिरत होती. त्यामुळे तिच्यामागे सतत नोकरीण असल्याविना बाहेर कोठे नेण्याची सोय नव्हती. या प्रकारामुळे आई-वडिलांची मनःस्थिती बिघडत चालली.

२ ई १ आ. आत्मबल वापरून उपाय केल्याने चार दिवसांत तिच्यावरील आसुरी शक्तीचा पगडा नष्ट होऊन ती पूर्णपणे बरी होणे : या जाज्‍वल्ययुक्त शक्तीशी मुकाबला करून, पूर्ण नामोहरम होण्यासाठी तिकडील सर्व गूढ शक्तीचा वापर करणार्‍या जादुगाराची (व्हाईट मॅजिशियनाची) शक्ती असमर्थ ठरली. नाना प्रकारचे वैद्यकीय उपचार झाले; पण सर्व व्यर्थ ठरले. प.पू. सर्व श्रेष्ठी (हिमालय निवासी) यांच्या कृपाप्रसादाचे तिच्यावर विशिष्ट प्रकारचे इलाज केले आणि स्वतःचे आत्मबल व्यय करून ९, १०, ११, १२ या चार दिवसांची, म्हणजे शुक्रवार दि. १२ या दिवशी दुपारी हिला पूर्ववत स्थिती प्राप्त करून दिली. आसुरी शक्तीचा पगडा नष्ट होतांना व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी; म्हणून तिने शरणागती घेतली. तेव्हापासून व्यवस्थित कपडे घालून ती फिरू लागली. शनिवारी दुपारी २४ घंटे झाल्यावर सर्वांना पूर्ण निश्चिती झाली.

२ ई १ इ. रोबीनाने पाय धरणे आणि सजवलेल्या हत्तीवरून सर्वांनी मिरवणूक काढणे : घरी आणल्यावर माझा कमालीचा जयजयकार केला. त्याचे सर्व वर्णन केल्यास अतिशयोक्ती वाटेल. सबब थोडक्यात म्हणजे, एक मोठा हत्ती सजवला. त्यावर फुलांचे गुच्छ, टेपरेकॉर्डर, जलतरंग, टेलिव्हिजन, कॅमेरे, कापड, हिरे इत्यादी वस्तू नीटनेटक्या लावल्या. सर्वांनी पुष्कळ विनंती केल्यामुळे मी त्यावर बसलो. हत्ती चालू असतांना काहींनी छायाचित्रक (कॅमेरे) पुढे सरसावले. तेव्हा आम्ही नो, नो, थँक यू, प्लीज ग्रँट माय रिक्वेस्ट इत्यादी अर्थाचे शब्द बोललो. मग सर्वांनी हात जोडून क्षमा मागितली. नंतर वातावरण शांत होऊन कु. रोबीनाने माझे पाय घट्ट धरून, मस्तक टेकून अश्रू सांडले. माझ्या प्रतिकाराला जुमानले नाही.

२ ई २. एडवर्ड (१० वर्षांचा मुलगा)

२ ई २ अ. एडवर्ड या १० वर्षांच्या मुलावर आफ्रिकन जादुगाराकडून करणी होणे आणि तो रस्त्यावर टाकलेले पदार्थ खाणे अन् नातेवाइकांनी पुष्कळ उपाय करूनही फरक न पडल्याने ते हताश होणे : शुक्रवारी रात्री तेथेच असलेल्या कु. एडवर्डवर प्रभावित उपाययोजना चालू केली. हा १० वर्षांचा मुलगा अत्यंत हुशार होता. तो वडिलांच्या समवेत एका समारंभाला गेला असता त्याच्या वडिलांनी त्याला तेथे दिलेल्या खाद्यपदार्थांपैकी जरासुद्धा खाऊ दिले नाही. याउलट बोलले की, या माझ्या मुलावर दुसरीकडील अन्न संस्कार करून घ्यायचे नाहीत. अशा अर्थाची भाषा ऐकून आपल्या भावाचा (समारंभ प्रमुखाचा) अपमान झाला, असे धाकट्या बंधूस वाटले. (दुसरी मंडळीही असेच काही तरी पुटपुटत होती.) साधारण २० ते २५ दिवसांनी सदरहू निष्पाप मुलावर एका आफ्रिकन जादुगाराकडून या बंधूंनी अनिष्ट घटना घडवली. तेव्हापासून हा एडवर्ड घरातून कोठेही बाहेर गेला, तर प्रथम रस्त्यावर टाकलेले पदार्थ मन मानेल, तसे खाऊन पुढे चालायचा. घरी अल्प जेवायचा. त्यामुळे त्याला एकट्याला बाहेर सोडणे अवघड झाले. समवेत कोणी गेले, तरी तो डोळा चुकवून पटकन रस्त्यावरील पदार्थ खायचा. या प्रकारामुळे नातेवाईक रडकुंडीला आले. त्याची प्रकृती बिघडली. चारी बाजूंनी उपाययोजना केली; पण काहीच फरक न पडता त्रासात वाढ होऊ लागली.

२ ई २ आ. एडवर्डवर जाज्वल्य उपाय केल्यावर त्याचा त्रास पूर्णपणे नाहीसा होणे आणि सर्वांना आश्चर्य वाटणे : शुक्रवारपासून सोमवार दिनांक १५ पर्यंत या मुलावर पाच प्रकार आणि नागराज पूजा, असे जाज्वल्य उपाय केले. तेव्हा सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पूर्ण बरा होऊन तो हात जोडू लागला. त्याला एकट्याला बाहेर फिरून येण्यास सांगितले. काही मंडळीही त्याच्या मागे गेली होती; परंतु काहीही अनुचित प्रकार घडला नाही. उलट ‘हा पूर्वी वेडा होता का ?’, अशी शंका येऊ लागली. त्यामुळे बाजारातील मंडळीही आश्चर्यचकीत होऊन सर्वांनी मला घेराव घातला.

२ ई २ इ. कौतुकासाठी कल्पनातीत सोहळा पार पडणे आणि एडवर्ड अन् कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त करणे : माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करून, एका सभागृहात नेऊन कल्पनातीत सत्कार सोहळा पार पाडला. बर्‍याच जणांनी निरनिराळ्या सूचना केल्या; परंतु बंधनामुळे प्रसिद्धीबद्दल नम्रतेने मी विरोध दर्शवला. छोटी भाषणे झाली. एडवर्ड आणि त्याच्या मंडळींनी मला घट्ट मिठी मारून आलिंगन दिले. आजन्म ऋणी असल्याची दोन्ही पीडित मंडळींनी मला पुनःपुन्हा जाणीव करून दिली. भावनापूर्ण होऊन अनेक वस्तू प्रेमाची भेट म्हणून स्वीकारण्याबद्दल मला आवर्जून विनंती केली. एडवर्ड मला ‘थँक यू’ म्हणाला.

२ ई २ ई. महान शक्ती उभी राहिल्याने विविध दिव्ये अनुभवणे : पुढे दोघांच्या घरी गेलो. त्यांनी मला उघड्या मोटारीतून बरेच फिरवले. पूर्वीप्रमाणे प्रेक्षणीय ठिकाणे दाखवली. घरी येऊन फलाहार आणि अपरकीय अन्न घेणे भाग पडले. या सर्व सत्य घटना लिहितांना मी भारावून गेलो आहे. स्वप्नसृष्टीतही आपण पाहिली नाही, एवढी महान शक्ती आपल्या मागे कशी उभी रहाते इत्यादी नाना विचार येतात. ‘आत्मस्तुतीचा दोष लागेल का ?’, याची भीती निर्माण होते. तसेच आवश्यक ती बंधने पाळावी लागतात.

२ ई २ उ. सर्वांनी केलेले कौतुक आणि आग्रह

१. सर्वांनी हत्तीवर सजवलेल्या वस्तूंपैकी मोठ्या वस्तू आठवण म्हणून नेण्याचा आग्रह करणे : सोमवार दिनांक १५ या दिवशी रात्री मेरी महालमध्ये पूर्ण विश्रांती घेऊन, मंगळवारी सकाळचे कार्यक्रम आटोपून सर्वांचे आभार मानून निरोप घेतला. त्या सर्व मंडळींनी माझ्या चौपट प्रतिक्रिया व्यक्त करून ‘पुन्हा विश्रांतीसाठी या’, असे आग्रहाने सांगितले. आमच्या तीव्र इच्छा, म्हणून ‘या वेळी हत्तीवर सजवलेल्या वस्तूंपैकी मोठ्या वस्तू आठवण म्हणून तरी न्या’, अशी विनंती केली. तेव्हा ‘तो माझा अधिकार नाही आणि इच्छाही होत नाही’, असे मी सांगितले. तेव्हा जॉननी ‘पू. श्रेष्ठीकडे काहीतरी तडजोड करतो’, अशी सर्वांची समजूत घातली आणि मग पुन्हा निरोप घेऊन विमानाने आश्रमाच्या पायथ्याशी आलो. दुय्यम पू. सहकारी यांच्या आश्रमात जाऊन गाठभेट घेऊन सर्वांना वृत्तात सांगितला. अर्थात् त्यांनी तो पाहिलाच होता.

२. ‘कोणत्याही दोन उपयोगी वस्तू नेऊन २ – ३ वर्षांनी परत कराव्यात किंवा तिकडच्या चलनाने खरेदी कराव्यात’, अशी तडजोड मान्य करण्यास श्रेष्ठींनी सांगणे : जॉनने दुय्यमना पीडित संबंधित व्यक्तींतर्फे खास प्रार्थना करून सांगितले. निदान माझ्याकडे पाहून त्या निष्पाप दोन्ही जिवांच्याही भावना दुखवू नकोस. काही तडजोड तरी मान्य करावी. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘दादासो (दादासाहेब), केवळ कुठल्याही दोन वस्तू उपयोग होतील, अशा २ ते ३ वर्षे वापरण्यासाठी नेऊन परत कराव्या किंवा हे सोयीचे होत नसल्यास तिकडे तुमच्या चलनाने खरेदी कराव्या. मुदत संपल्यावर मालकी हक्कावर तुम्ही परत घ्याव्यात.

३. परतीचा देहली ते मुंबई प्रवास करून कल्याण येथे येणे : तेव्हा मि. जॉननी सर्वांतर्फे समाधान व्यक्त करून आभार मानले. मग खाली उतरून विमानाने देहलीस आलो. मि. जॉन यास पालम विमानतळावर निरोप दिला. दोघांची अंतःकरणे जड झाली. मग टॅक्सीने हिंदु सभेच्या इमारतीमध्ये आलो. सुपर बाजार, चांदणी चौक, लाल किल्ला, जंतरमंतर इत्यादी ठिकाणे पाहून गोल मार्केटात उडपीकडे जेवून झोपलो. देहलीहून गुरुवारी दि. १८ या दिवशी सकाळी ७.३५ ला बोईंग विमानाने मुंबईस येऊन कल्याणला निघालो. या १५ दिवसांत पुष्कळ धावपळ आणि शारीरिक अन् मानसिक झीज झाली. याची कल्पना अनुभवाशिवाय येणे शक्य नाही.’

(समाप्त)

– प.पू. श्रीपादजी वैशंपायन स्मृती

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.