विविध दिव्य दर्शने आणि महान शक्तींच्या साहाय्याने आलेले दिव्य अनुभव !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

१. हिमालय आश्रम परिसरात घडलेल्या घटना               

१ अ. दोन पुण्यात्म्यांच्या समाधी घेण्याच्या विधीचे हृदयस्पर्शी दर्शन : ‘६.१०.१९७३ (विजयादशमी) या दिवशी आम्ही देहलीहून सकाळी ९.३० वाजता ‘हेलीकॉप्टर’ने निघून ऋषीकेश येथील पहाडाच्या पायथ्याशी पावणे अकरा वाजता पोचलो. श्री. चिंतामणी वामन स्वामींच्या समवेत सेक्रेटरी होते. पायथ्यापासून पाऊलवाटेने चालत संध्याकाळी ७ वाजता प.पू. नरेंद्रस्वामींच्या आश्रमापासून ६ मैलांवरील परिसरात समाधीस्थानकावर जाऊन पोचलो. तेथील वातावरण अत्यंत निसर्गरम्य होते; परंतु ३ घंट्यांनंतर घडणार्‍या घटनेमुळे उदासीनतेची छाया पडलेली होती. या ठिकाणी ७२ साधूपुरुष ४० घंट्यांपासून अखंड मंत्रघोष करत उभे होते. पूर्व बाजूस शांतीयज्ञ विधी चालू होते. त्या होमकुंडापासून १२१ फुटांवर दोन गोलाकृती ६ फूट व्यासाचे, १५ फूट खोलीचे खड्डे व्यवस्थित केले होते. त्यामध्ये गुलाबांची फुले, कडुलिंबाचा पाला आणि दुर्वा यांपासून पाच फुटी आसन बनवले होते. पटांगण आम्रपल्लवांनी शृंगारलेले होते. चंदनाचा सुगंध दरवळत होता; परंतु प्रत्यक्षात धूप, उदबत्त्या इत्यादी काहीच लावलेले नव्हते. यज्ञावरील होमासाठी अग्नी, समिधा आणि इतर साहित्य एकत्र केले होते.

पूज्य विश्वनाथजी आणि पूज्य गोविंदस्वामी हे दोघे दुय्यम सहकारी त्यांच्या समाधीस्थानाच्या लगत ध्यानमग्न स्थितीत बसलेले होते. रात्री १० वाजता प.पू. बालयोगींच्या समवेत सात सत्पुरुषांचे आगमन झाले. त्यांनी दृष्टीक्षेप टाकताच दोघांची समाधी उतरली. मग त्यांना अमृतरस देण्यात आला. नंतर सिद्धमंत्र म्हणत जमलेल्या निवडक १२० साधकांना हसतमुखाने वंदन करून, खड्ड्यातील आसनावर पद्मासन घालून ते बसले आणि त्यांनी नेत्र मिटले. लगेच परम पूज्य बालयोगी श्रेष्ठींनी बिल्वपत्र, कडुनिंब आणि तुळशी इत्यादींची पाने देह झाकेपर्यंत वाहिली. तोच एकाएकी आतून आणि बाहेरून आठही दिशांतून, ‘ॐ नमः शिवाय ।’ आणि ‘ॐ सत्यमेव जयतु ।’, असा ध्वनीनाद सतत चालू राहिला. क्षणार्धात सर्व परिसर दुमदुमून गेला. प्रत्येकाला आपापल्या देहाचा विसर पडला आणि सर्व जण ब्रह्मांडात एकरूप झाले. नंतर साधारणपणे ३० ते ३५ मिनिटांनी ‘ॐ शांती, ॐ शांती’, असा जयघोष आपोआप चारी बाजूंनी चालू झाला आणि दहा मिनिटांनी बंद होऊन एकदम स्तब्धता झाली. नंतर सर्वांनी त्या पुण्यात्म्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी आपला अत्यंत तेजःपुंज देह ठेवला आणि तो आत्मा विलीन झाला, अशी आम्हाला निश्चिती झाली. मग पुढील आवश्यक ते विधी होऊन सर्व मंडळी परतली. आम्ही दुय्यम आणि साहाय्यक मंडळींनी खालील छोट्या आश्रमात जाऊन या हृदयस्पर्शी प्रसंगाची चर्चा करत निद्रा घेतली.

२. महान शक्ती पाठीशी उभ्या राहून त्यांनी महान कार्ये करून घेणे

२ अ. श्रेष्ठींनी आत्म्याच्या शरिरात प्रवेश करून देणे आणि पुढील कार्याविषयी सूचना देणे : रविवारी सकाळी प्रातर्विधी आणि साधना आटोपून अमृतरस घेऊन चालत परम पूज्य नरेंद्रस्वामींच्या आश्रमात त्यांच्या दर्शनासाठी गेलो. तेथे चार घंटे दोन्ही श्रेष्ठी आणि पू. बालयोगी यांच्या जवळ वेगवेगळी विशेष महत्त्वाची बोलणी केली अन् प्रभावी मार्गदर्शन करवून घेतले. पुढे एका बाजूस कुटीत विश्वास नावाच्या आत्म्याचा परिचय दुय्यम श्रेष्ठींनी करून देऊन माझ्या देहात त्याचा प्रवेश करवला. गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे तात्काळ सर्व तडजोड होऊन सर्व घटना कार्यक्षम होणार असल्याची पूर्ण निश्चिती झाली. मग त्यांनी जॉन यांच्या समवेत जाण्याचा आदेश दिला. त्यांना आवश्यक त्या सूचना आगाऊच देण्यात आलेल्या होत्या. पुढे रात्री चालत चालत नवीन शक्तीचे वाटेत अनुभव घेत घेत दुय्यम आश्रमात पहाटे पाच वाजता गेलो आणि लगेच झोपलो. नंतर सकाळी ७ ते १२ पर्यंत प्रातर्विधी केले. लागणारे सर्व संरक्षक साहित्य प्रभावीत करण्याचा उद्योग चौघांनी चालू केला होता. ती संपूर्ण सिद्धता रात्री ९ ला पूर्ण झाली. नंतर झोपून पहाटे ३ वाजता उठून सर्वांनी नित्य विधी उरकले आणि सर्व श्रेष्ठी मंडळींचे भावसमाधीतून दर्शन अन् शुभेच्छा घेतल्या. पायी दमछाक करत खाली उतरलो. तेथे व्यंकटेश ‘हेलिकॉप्टर’सह उपस्थित होते. हे जलद वाहन एका उद्योगपतीचे होते.

२ आ. विमानाने परदेशात जाणे आणि तिथे स्वागत होणे : या गतीमान साधनाने देहलीला येऊन आवश्यक ती तांत्रिक सिद्धता केली. दोन वुलन सूट, पांढरा नाईट ड्रेस इत्यादी वस्तू सचिवाने मागणीनुसार माझ्यासाठी घेतल्या. मग फळांचा रस घेऊन रॉबीन यांच्या समवेत पालम विमानतळावरून विमानाने रात्री १० वाजता रोमला पोचलो. तत्पूर्वी जॉर्ज तेथे पोचून २२ निवडक मंडळींसह स्वागतासाठी उपस्थित होते. सर्वांनी फुलांचे मोठे गुच्छ देऊन आनंद व्यक्त केला. काही अनोळखी व्यक्तींना माझा परिचय म्हणजे ‘ग्रेट सिद्ध मांत्रिक’, अशा अर्थाने इंग्रजीत अभिमानाने सांगत होते. त्याच वेळी माझ्या शरिरात प्रवेश केलेल्या मार्गदर्शकाने माझ्या तोंडून इंग्रजीत सांगितले की, मी एक सामान्य माणूस असून तुमचा देश बघण्यासाठी पुन्हा आलो आहे. तेव्हा ‘ओ’, ‘नो’, करत सर्व जण हात वर करत हसले. मग मिसेस जॉन इंग्रजीत अशा प्रकारे बोलल्या की, दोन व्यक्तींना पुनर्जीवन देण्याकरता तुम्हाला इकडे येण्याचा त्रास दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.

२ इ. तेथील प्रमुख जॉन आणि जॉकी यांच्या कुटीत प्रवेश करणे : छोट्या शृंगारलेल्या गाडीतून फिरत फिरत रात्री ११ वाजता निर्विकार बंगल्यात उतरलो. थोडे कार्यक्रम करून चौघांच्या समवेत त्या प्रचंड बंगल्यात झोपलो. सकाळी प्रातर्विधी आटपून गाडीने आणि नंतर विजेरी पाळण्याने आतमध्ये मिस्टर जॉन आणि जॉकी यांच्या कुटीत प्रवेश केला. मंगळवार ९ या दिवशी संध्याकाळपर्यंत अत्यावश्यक त्या गोष्टी केल्या. मग ७ वाजता इटलीमधील दोन्ही पीडित आणि त्यांच्या समवेत असलेले ४० जण यांना एका स्वतंत्र कुटीत बसवले. जलतरंग आणि सनई सारखी वाद्ये मंद सुरात चालू केली.

(क्रमशः)

– प.पू. श्रीपादजी वैशंपायन स्मृती

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1038997.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक