संत मुक्ताबाई यांची विविध युगांतील साधना आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

१२ मे २०२६ या दिवशी असलेल्या संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ...

‘संत मुक्ताबाई यांचे जीवन अत्यंत दिव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण होते. अशा या संत मुक्ताबाईंचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव या गावी पिता विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्या पोटी वर्ष १२७९ मध्ये झाला. अशा या थोर संतांची गाथा आपण या लेखाद्वारे संक्षिप्त स्वरूपात पाहूया.

संत मुक्ताबाई

१. संत मुक्ताबाई या साक्षात् योगमायेचाच अवतार असणे 

‘योगमाया’ ही प्रत्येक अवताराच्या वेळी प्रगट होऊन अवताराला अवतारी लीला करण्यासाठी साहाय्यक असते. त्यामुळे योगमायेचे कार्य प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या रूपाने कार्यरत असते.

२. संत मुक्ताबाईंचा विविध जन्मांतील प्रवास

३. संत मुक्ताबाईंना विविध जन्मांतील साधनेमुळे प्राप्त झालेले दैवी बळ

४. संत मुक्ताबाईंची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

सुश्री (कु.) मधुरा भोसले

अ. संत मुक्ताबाई या जन्मतःच संत होत्या. त्या जीवनमुक्त (जन्म आणि मृत्यू यांच्या फेर्‍यांतून मुक्त असणे) आणि मोहमायेपासून मुक्त होत्या. त्यामुळे त्यांना मिळालेले ‘मुक्ताबाई’ हे नाव खर्‍या अर्थाने सार्थक झाले.

आ. लहान वयातच तिचे मन मानस सरोवराप्रमाणे निर्मळ होते. त्यामुळे त्या बाल्यावस्थेतील तपस्विनी असून अत्यंत तेजस्वी होत्या.

इ. ‘विनम्र स्वभाव आणि मृदु वाणीसह प्रसंगी कठोर अन् परखडपणे बोलणे, तसेच सत्यनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठा जोपासणे’ हे गुण त्यांच्यात होते, तसेच त्यांच्यात श्री विठ्ठलाप्रती निस्सीम भाव होता. त्या आदर्श कन्या, आदर्श भगिनी, आदर्श शिष्य आणि आदर्श गुरु होत्या.

ई. गुरुरूपी संत निवृत्तीनाथांनी संत मुक्ताबाईंवर केलेल्या गुरुकृपेमुळे त्यांना बालपणातच आत्मज्ञान आणि नंतर ब्रह्मज्ञान यांची प्राप्ती झाली होती. त्या संत कवयित्री होत्या.

उ. त्यांची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आणि प्रगल्भ होती. त्यामुळे त्यांना शास्त्रार्धात कुणीही पराभूत करू शकत नव्हते.

ऊ. चिमुकल्या संत मुक्ताबाई यांनी महायोगी, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध असणार्‍या योगी चांगदेवांचा अहंकार नष्ट करून त्यांना आत्मज्ञान दिले.

ए. संत मुक्ताबाई अत्यंत करुणामयी आणि ज्ञानी होत्या. त्यांनी ‘ताटीचे अभंग’ या ग्रंथाची रचना केली.

ऐ. ‘संत मुक्ताबाई यांनी त्यांच्या शिष्यांना ‘सोऽहम्’ मंत्राची शिकवण दिली आहे’, असे त्यांच्या उपदेशपर अभंगांतून स्पष्ट होते. ‘सोऽहम्’ म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’, याची दैवी अनुभूती सतत घेणे.

ओ. संत मुक्ताबाई यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदी संतांच्या समवेत संपूर्ण भारतभर भ्रमण करून सर्वत्र भागवत धर्माचा (हिंदु धर्माचा) आणि विठ्ठल भक्तीचा प्रसार केला. त्या ‘एक थोर धर्म आणि भक्ती प्रचारक संत’ म्हणून विख्यात आहेत.

औ. ‘भक्तश्रेष्ठ’ म्हणून सुविख्यात असणार्‍या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईंमुळे नामदेवांना विसोबा खेचर हे गुरु म्हणून लाभले.

अं. नाथ संप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या मुक्ताबाई या कलियुगातील पहिल्याच स्त्री सद्गुरु होत्या. त्यांच्या सत्संगात शिष्यांना ज्ञानासह श्री विठ्ठलाच्या भक्तीरसाचीही अवीट गोडी चाखण्यास मिळत होती आणि परमानंदाची अनुभूती येत होती.

अर्पिते ही काव्यसुमनांजली !

थोर आणि धर्मपरायण माता अन् पिता ।
त्यांच्या पोटी आली मुक्ता ।। १ ।।

भगवंताच्या कृपेने प्राप्त झाले तिला भक्ती अन् ज्ञान ।
तिला म्हणती ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ ।। २ ।।

चिमुकल्या मुक्ताबाईने मौलिक उपदेश केला ।
योगी चांगदेवाचा अहंकार नष्ट झाला ।। ३ ।।

साक्षात् योगमायेचा ती अवतार ।
तिने अनेक जणांचा केला उद्धार ।। ४ ।।

तिच्यावर श्री गुरूंची कृपा असे अपार ।
ती भवसागर करूनी गेली पार ।। ५ ।।

– सुश्री मधुरा भोसले

५. संत मुक्ताबाईंचा देहत्याग 

संत मुक्ताबाईंचा कार्यकाळ अल्प होता. गुरु निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतली. त्यानंतर मुक्ताबाईंनी महत् नगर तापीतीर मेहूण (जिल्हा जळगाव) येथे वर्ष १२९७ मध्ये महानिर्वाण केले. त्या वेळी त्यांच्या देहातून दिव्य शलाका (वीज) बाहेर पडली आणि ती वीज आकाशात विलीन झाली. संत मुक्ताबाई या योगमायेचा अवतार असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे निर्गुण अवस्थेत राहून महानिर्वाण केले. हे महानिर्वाण अत्यंत दिव्य आणि अलौकिक होते.

कृतज्ञता 

‘श्री गुरुकृपेने महान संत मुक्ताबाई यांची आध्यात्मिक जीवनगाथा उमजली आणि साधना करण्याची नवचेतना जागृत झाली’, त्याबद्दल मी मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी भक्तीभावाने वंदन करते.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ४.५.२०२६, वेळ : सकाळी १० ते १०.२०, कालावधी : २० मिनिटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.