सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘सनातन संस्थेच्या कार्याच्या निमित्ताने माझा विविध पक्षांतील अनेक राजकारणी व्यक्तींशी वेळोवेळी संपर्क येत असतो. श्री. प्रकाश गंगाधरे हे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील मुलुंड (पूर्व) येथील नगरसेवक असून गेली अनेक वर्षे माझे त्यांच्याकडे जाणे होत आहे. इतर अनेक राजकारण्यांच्या तुलनेत त्यांच्यात लक्षणीय असा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो.

श्री. प्रकाश गंगाधरे

१. नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे 

मुलुंड परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी श्री. प्रकाश गंगाधरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ‘परिसर स्वच्छ, सुशोभित आणि सुरक्षित व्हावा’, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी श्री. गंगाधरे सातत्याने प्रयत्नशील असतात. ‘कोकण महोत्सव’सारख्या (टीप) भव्य कार्यक्रमाचे आयोजन ते गेली अनेक वर्षे करत आहेत.

टीप – कोकण महोत्सव : हा कोकणाची समृद्ध कला, संस्कृती, पर्यटन आणि पारंपरिक खाद्यपदार्थ जागतिक स्तरावर पोचवणारा एक भव्य महोत्सव आहे.

२. समाजातील विविध स्तरांतील लोकांशी जवळीक असणे 

त्यांचा जनसंपर्क अत्यंत उत्तम असल्याचा अनुभव मला अनेक प्रसंगी आला आहे. ते नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सनातन संस्थेच्या सेवेनिमित्त एक दिवस मी दिवसभर त्यांच्या समवेत होतो. त्या दिवशी आम्ही मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय, महानगरपालिका, अशा विविध ठिकाणी गेलो. त्या वेळी विविध स्तरांतील अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी येत होते आणि निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत होते. तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीशी त्यांची असलेली जवळीक स्पष्टपणे जाणवत होती. या कालावधीत आम्ही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अश्विनी भिडे यांच्या मंत्रालयातील दालनातही गेलो होतो. त्यांनीही गंगाधरेसाहेबांचे मनापासून कौतुक केले.

धर्मकार्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे मुंबईतील मुलुंड (पूर्व) येथील नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे !

पू. शिवाजी वटकर

‘वर्ष २०१५ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात ‘मूर्तीदान करणे आणि कृत्रिम हौदामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करणे’, या कृतींना विरोध केला जात होता; कारण त्या अशास्त्रीय अन् गणेशमूर्तीची विटंबना करणार्‍या कृती होत्या. असे असतांना मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम हौद तयार करणे आणि गणेशमूर्तीचे दान करणे यांसाठी नियोजन केले होते. त्या वेळी मी हिंदु जनजागृती समितीचा समन्वयक होतो. मी आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे पत्रकार श्री. मारुति मोरे, आम्ही दोघे श्री. प्रकाश गंगाधरेसाहेब यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. आम्ही त्यांना निवेदन दिले. नंतर ते आम्हाला मुंबईचे महापौर आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी आम्हाला सर्वतोपरी साहाय्य केले होते. अशा रितीने आम्ही त्यांना जेव्हा संपर्क करत असू, तेव्हा ते धर्मकार्यासाठी साहाय्य करत असत.’

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.२.२०२६)

३. सनातन संस्थेला मनापासून सहकार्य करणे

३ अ. सनातन संस्थेच्या महत्त्वाच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देऊन त्यासाठी प्रयत्न करणे : मुंबई उच्च न्यायालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अभियंते श्री. गंगाधरे यांच्या सत्कारासाठी २ – ३ घंटे प्रतीक्षा करत होते. प्रत्यक्षात सनातनच्या सेवेमध्ये व्यस्त असल्याने त्यांना त्या कार्यक्रमाला उशीर होत होता, तरीही त्यांनी सनातन संस्थेच्या महत्त्वाच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य दिले. ते स्वतः आम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे घेऊन गेले आणि एका कार्यक्रमाच्या संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी ५ – ६ घंटे मनापासून प्रयत्न केले. शेवटी आम्ही उच्च न्यायालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात पोचलो. तेव्हा तेथील अभियंते साहेबांची आतुरतेने वाट पहात होते. त्यांनी सांगितले, ‘‘साहेबांशी आमचा सुमारे २० वर्षांचा जिव्हाळ्याचा संपर्क आहे.’’

३ आ. सनातन संस्थेवर विविध संकटे आली. त्या काळात त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रतिमेचा विचार न करता वेळोवेळी मनापासून सहकार्य केले.

श्री. अभय वर्तक

४. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘महाधन्वन्तरि यागा’चे यजमान म्हणून भावपूर्ण सहभाग घेणे 

मे २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये ‘सर्व साधकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि सनातन राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी’, यांसाठी ‘महाधन्वन्तरि याग’ करण्यात आला. गंगाधरेसाहेब या यागाचे एक यजमान होते. यागातील प्रत्येक कृती त्यांनी अत्यंत भावपूर्ण रितीने केली. ते केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर श्रद्धेने यज्ञात सहभागी झाल्याचे स्पष्ट जाणवत होते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

यागानंतर सायंकाळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांशी संवाद साधत असतांना प्रकाश गंगाधरेसाहेब तेथे आले. त्यांनी गुरुदेवांकडे ज्या भावपूर्ण दृष्टीने पाहिले, तिच्यातून त्यांच्या मनातील श्रद्धा स्पष्ट जाणवत होती. गुरुदेवांनीही त्यांचे कौतुक केले. गुरुदेवांच्या त्या क्षणिक भेटीमुळे साहेबांना झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता.

या सर्व घटनांमधून त्यांचे वेगळेपण आणि सेवाभाव ठळकपणे दिसून येतो.’

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था. (१२.२.२०२६)