Farrukhabad Liquor : फरुखाबाद (उत्तरप्रदेश) येथे दारूच्या दुकानाच्या विरोधात ग्रामस्थांचे हिंसक आंदोलन

गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक

फरुखाबाद (उत्तरप्रदेश) – येथील चाचूपूर जटपुरा गावात एका तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बळजोरीने नेल्याच्या कारणावरून ९ मे या दिवशी हिंसाचार झाला. संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक करत पोलीस ठाण्याच्या प्रमुखाची गाडी खड्ड्यात उलथवून टाकली. पोलीस आणि महसूल विभागांच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या हिंसाचारात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांसह ९ जण घायाळ झाले.

चाचूपूर जटपुरा येथील ब्रजेश (वय २५ वर्षे) हा तरुण ८ मे रात्री बेपत्ता होता. ९ मे च्या सकाळी त्याचा मृतदेह गावातील दारूच्या दुकानाजवळ असलेल्या पुलाखालील पाण्यात आढळून आला. ब्रजेशची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह दारूच्या दुकानासमोर ठेवून दुकान हटवण्याची मागणी करत आंदोलन चालू केले. या वेळी पोलिसांनी आंदोलक महिलांना बाजूला करून मृतदेह बळजोरीने कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आणि हिंसाचार चालू झाला.

दारूच्या दुकानामुळे तरुण व्यसनाधीन !

गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार गेल्या २० वर्षांपासून गावात देशी दारूचे दुकान आहे आणि २ वर्षांपूर्वी इंग्रजी दारूचे दुकानही उघडले आहे. यामुळे गावातील तरुण आणि पुरुष व्यसनाधीन झाले असून आर्थिक अन् कौटुंबिक स्थिती खालावली आहे. २ वर्षांपूर्वी महिलांनी हे दुकान हटवण्यासाठी रस्ता बंद केला होता; मात्र प्रशासनाने केवळ आश्वासन देऊन बोळवण केली. ब्रजेशचा मृत्यूही याच वादातून झाल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे.

अबकारी निरीक्षक रीतू वर्मा यांनी सांगितले की, दारूचे दुकान एका दिवसात हटवता येत नाही. ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिल्यास त्यावर विचार केला जाईल.

संपादकीय भूमिका

दारूचे दुकाने हटवण्यासाठी जनतेला हिंसक आंदोलन करावे लागते, हे लज्जास्पद !