दैनिक ‘सनातन प्रभात’ची कार्यालयीन घडी बसवण्यासाठी साहाय्य करणारे आणि आपत्काळाविषयी द्रष्टेपणाने सांगणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

वर्ष २००२ ते २००६ या कालावधीत मी सेवाकेंद्राचे दायित्व सांभाळत असतांना साधनेच्या अनुषंगाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असे. वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे संपादकीय लेख, दैनिकाची कार्यालयीन घडी बसवणे, आपत्कालीन स्थिती यांविषयीची काही सूत्रे सांगितली. ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे. 

श्री. भूषण कुलकर्णी यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

(टीप : या लेखात ‘प.पू. डॉक्टर’ असा करण्यात आलेला उल्लेख सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचा आहे. – संकलक)

१. दैनिकाचे लेख अर्ध्या घंट्यात होणे अपेक्षित असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे 

दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांच्या सत्संगाला मी एकदा उपस्थित होतो. त्या वेळी उपसंपादक स्तरातील साधक लेख लिहिण्यास शिकत असतांना त्यांना अभ्यास करून तो लिहिण्यासाठी अनुमाने ३ ते ४ घंटे लागत असल्याचे समजले. त्या वेळी एवढा वेळ लागणे अपेक्षित नसल्याचे मी त्यांना सांगितले. ही गोष्ट मी प.पू. डॉक्टरांना सांगितली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘डॉ. दुर्गेश सामंत संपादक असतांना ते संपादकीय लिहायचे. त्यासाठी त्यांना ३० मिनिटे लागायची. त्यामुळे लेख लिहिण्यास शिकणार्‍या साधकांचे तो आदर्श ठेवून प्रयत्न व्हायला हवेत, ३ घंटे लागायला नकोत.’’ त्यानंतर पुढे त्या साधकांनी ४५ मिनिटे ते १ घंट्यामध्ये लेख लिहिण्याचे प्रयत्न आरंभले.

२. दैनिकाची पाने वेळेत जाऊन त्या कार्यालयातील साधकांची साधना होण्यासाठी कठोर प्रायश्चित्ताचाही अवलंब करण्यास सुचवणारे प.पू. डॉक्टर ! 

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या केंद्रीय स्तरावरील आणि अन्य सर्व आवृत्त्यांची पाने प्रतिदिन छपाईला ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा ते एक घंटा विलंबाने जात. त्यामुळे दैनिकाची छपाई विलंबाने होऊन पुढे प्रसारातील साधकांना सकाळी दैनिक वितरणासाठी विलंबाने मिळत असे. यामुळे एकूणच सर्वच स्तरांवर हानी होत असे. या चुकीविषयी दैनिक कार्यालयातील साधकांना जाणीव करून देऊनही त्यांच्यात अपेक्षित पालट होत नव्हता. या प्रसंगाच्या अनुषंगाने साधकांच्या साधनेविषयी प.पू. डॉक्टरांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘देवाची प्रत्येक गोष्ट अचूक आणि योग्य वेळी होत असते, तर मग आपण त्या प्रयत्नात कुठे न्यून पडतो अन् वेळ न पाळल्याने होणार्‍या साधनेची हानी किती मोठी आहे, हे मनावर बिंबवायला हवे. आपण त्यांच्या मनावर बिंबवण्यात न्यून पडत असल्यामुळे दैनिक कार्यालयातील साधकांच्या साधनेची मोठी हानी होत आहे. ती हानी टाळण्यासाठी कठोर प्रायश्चित्त घ्यायला हवे, जेणेकरून प्रायश्चित्ताच्या भीतीने पाने वेळेवर जातील. संपूर्ण जग शिक्षेच्या भीतीमुळेच ठीकपणे चालू असते. त्यामुळे एक दिवस जरी दैनिकाचे पान १ मिनिट जरी उशिरा गेले, तर त्यांनी त्यांना योग्य वाटेल, असे कठोर प्रायश्चित्त घ्यायला हवे. प्रायश्चित्त घेऊन तरी साधकांमध्ये पालट होईल.’’

दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांना वरीलप्रमाणे प्रायश्चित्ताचा भाग सांगितल्यावर त्यांनी त्याची कार्यवाही चालू केली. प्रारंभीचे २ दिवस दैनिकाचे पान ५ मिनिटे विलंबाने गेले आणि त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे लागले. त्यानंतर पुढे पाने वेळेत जायला लागली.

प.पू. डॉक्टरांची देवतांप्रती कृतज्ञता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एकदा गणेशोत्सवाच्या कालावधीतील श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी ‘दैनिकाच्या पृष्ठ १ वर श्री गणेशाचे चित्र घेऊया’, असा दैनिकात सेवा करणार्‍या साधकांचा विचार झाला होता. त्याविषयी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपल्यावर देवतांची कृपा आणि आशीर्वाद आहे. त्यामुळे आपण केवळ पृ. १ वर चित्र न घेता गणेशोत्सवाचे १० दिवस प्रतिदिन श्री गणेशाचे चित्र घेऊन त्या खाली श्री गणेशाविषयीची छोटी माहिती देऊ शकतो. असाच भाग नवरात्रीमध्येही श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री महासरस्वती अथवा नवदुर्गा अशी चित्रे घेऊन त्यांच्याविषयीचे लिखाण प्रसिद्ध करूया, तसेच ज्या देवतांचे उत्सव असतील, त्या दिवशी दैनिकात पृष्ठ १ वर त्यांचे चित्र प्रसिद्ध करूया.’’ (त्यानंतर आजपर्यंत दैनिकात देवतांच्या सण-उत्सवाच्या निमित्ताने असा भाग दैनिकात प्रसिद्ध केला जातो. – संकलक)

– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा.

३. ‘एकाच ठिकाणी सेवा करून कंटाळा येणे, हे शिकण्याची वृत्ती न्यून झाल्याचे द्योतक आहे’, असे सांगणारे प.पू. डॉक्टर !

काही साधकांना एकाच ठिकाणी एकाच प्रकारची अथवा त्या ठिकाणची विविध सेवा करून कंटाळा येत असे किंवा ‘स्वतःला आणखी काही वेगळे शिकायचे आहे’, असे ते सांगत असत. एकदा प.पू. डॉक्टरांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘एकाच ठिकाणी तीच तीच सेवा करून कंटाळा कसा येऊ शकतो ? मीही अनेक वर्षे सातत्याने ग्रंथ संकलनाची सेवा करतो आहे; पण मला कधीही ती सेवा करून कंटाळा आलेला नाही. ईश्वरही त्याच्या अनेक सेवा स्वतःच आणि अब्जावधी वर्षे करत आहे. त्याला कधी कंटाळा आल्याचे आपण ऐकले आहे का ? याचाच अर्थ ‘स्वतःची शिकण्याची वृत्ती न्यून झाली आहे का ?’ हे बघायला हवे. ‘त्या सेवेतून देव आपल्याला सातत्याने काय शिकवत आहे ? त्यातून स्वतःची साधना होत आहे ना ? सेवा आणि देव यांच्याशी एकरूप होत आहोत का ? स्वतःचा सेवा आणि देव यांच्याप्रती भाव न्यून पडतो का ?’, हे बघायला हवे, तसेच प्रत्येक सेवा या अनंताचे (ईश्वराचे) ज्ञान देणार्‍या आहेत. त्यामुळे त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘संपादक’ या नात्याने दैनिक प्रकाशनाच्या पूर्वसिद्धतेविषयी माहिती देतांना  डॉ. दुर्गेश सामंत आणि समवेत इतर साधक (वर्ष १९९९)

४. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या गुरुपौर्णिमा विशेषांकात प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र मोठे घेतल्याची चूक दाखवून देण्यासह त्यातून त्यांनी स्वतःचे शिष्यत्व दाखवणे 

एकदा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या गुरुपौर्णिमा विशेषांकात प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आणि प.पू. डॉक्टरांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज (उत्तराधिकारी) यांच्यापेक्षा मोठे घेतले होते. त्या वेळी अध्यात्मातील ‘सिमेट्री’ (प्रमाणबद्धता) सांगतांना ते म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांचे प.पू. रामानंद महाराज हे शिष्य आणि उत्तराधिकारी आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुढे त्यांचे छायाचित्र थोडे छोटे हवे. त्या दोघांच्या छायाचित्रासमोर माझे छायाचित्र आणखी थोडे छोटे हवे; कारण मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे आणि प.पू. रामानंद महाराज हे प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे अध्यात्मातील ‘सिमेट्री’नुसार माझे छायाचित्र छोटे हवे.’’ यातून प.पू. डॉक्टरांनी त्यांचे शिष्यत्व दाखवून दिले.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची व्यवस्था नकाशा पाहून समजून घेतांना प.पू. डॉ. आठवले. डावीकडून श्री. अशोक मराठे, डॉ. दुर्गेश सामंत आणि श्री. प्रकाश जोशी (वर्ष १९९९)

५. प.पू. डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रतीची कृतज्ञता म्हणून त्यांचे छायाचित्र आणि त्यांची शिकवण प्रतिदिन दैनिकात घेण्यास सांगणे 

वरील प्रसंगानंतर प.पू. डॉक्टर प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी म्हणाले, ‘‘आपले जे कार्य वाढत आहे, त्यामागे माझ्या गुरूंचा, म्हणजेच प.पू. भक्तराज महाराज यांचा आशीर्वाद आहे. आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिदिन दैिनकात त्यांचे छायाचित्र आणि त्यांची शिकवण चौकट रूपात घेऊया, तसेच प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला पुस्तक रूपातील स्मरणिका निघते, त्यामध्येही विज्ञापनांमध्ये अधिकाधिक त्यांची सुवचने घेऊया.’’ (त्यानंतर आजपर्यंत दैनिकात ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’ हे सदर चालू आहे. – संकलक)

६. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढावेत, तसेच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिदिन दीड मास आधीपासून चौकट लावण्यास सांगणारे प.पू. डॉक्टर ! 

श्री. भूषण कुलकर्णी

एकदा संस्था स्तरावरील गुरुपौर्णिमेच्या सिद्धतेविषयी प.पू. डॉक्टरांना माहिती सांगितली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘गुरुपौर्णिमेच्या कालावधीत साधकांचे साधनेचे आणि भावाचे प्रयत्न वाढायला हवेत, तसेच श्री गुरूंप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून आपण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधारण दीड मास आधीपासून प्रतिदिन चौकट देऊया. त्या चौकटीत श्री गुरूंचे महत्त्व दर्शवणारे लिखाण प्रसिद्ध करूया, जेणेकरून साधनेचे प्रयत्न वाढण्यास प्रोत्साहन मिळेल. त्या चौकटीत ‘गुरुपौर्णिमेसाठी … इतके दिवस शेष’ असा भागही देऊया, जेणेकरून साधनेची गती आणि ध्येय वाढण्यास प्रोत्साहन मिळेल.’’ (त्यानंतर आजपर्यंत दैनिकात प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या कालावधीत अशी चौकट प्रसिद्ध केली जात आहे. – संकलक)

७. गणेशोत्सवाच्या काळात साधकसंख्या न्यून असल्यावर  दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि स्वयंपाकघर सेवा प्राधान्याने चालू ठेवण्यास सांगणे 

फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ सेवाकेंद्रात असतांना गणेशोत्सवाच्या काळात अनेक साधक त्यांच्या घरी जात असल्याने आश्रमात साधकसंख्या न्यून असे. त्या वेळी एकूणच आश्रमसेवा आणि विविध सेवा यांचे नियोजन कसे करायचे ?, यांविषयी माझ्या मनात प्रश्न होता. त्याविषयी प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले असता त्यांनी सांगितले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि स्वयंपाकघर या २ सेवा आपत्कालीन स्थितीत प्राधान्याने चालू रहायला हव्यात. जे साधक रहातील, त्यांचे या २ सेवांसाठी नियोजन करू शकतो. दैनिक हे नियमित न चुकता प्रकाशित व्हायला हवे. त्यासाठी ग्रंथनिर्मितीतील उपलब्ध साधकांना आणि वेळप्रसंगी मला (प.पू. डॉक्टरांना) बातम्या वा लेख वाचनासाठी, तर ग्रंथ अन् कला क्षेत्रातील संबंधित रचनाकार साधकांना दैनिकाच्या संरचनेसाठी घेऊ शकतो. अन्य साधकांना स्वयंपाकघरात सेवा करण्यास सांगूया; कारण साधकांना खाणे-पिणेही आवश्यक आहे. ते असेल, तर साधक सेवा करू शकतील.’’

८. प.पू. डॉक्टरांनी ‘दोन्ही हातात ध्वज धरलेल्या साधकाचे चित्र घेण्यास सांगून त्यातून सर्वस्व अर्पण केल्याचे दिसत आहे’, असे सांगणे 

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका विशेषांकात साधक हातात ध्वज घेऊन मार्गक्रमण करत असल्याचे चित्र घेतले होते. प.पू. डॉक्टरांनी ते चित्र बघितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘पुढे नेतृत्व करत असलेल्या साधकाच्या एका हातात ध्वज आणि दुसरा हात मोकळा असल्याचे दिसते. यापेक्षा दोन्ही हाताने ध्वज धरलेल्या साधकाचे चित्र घेऊया; कारण दोन्ही हाताने ध्वज धरलेल्या साधकाने त्याचे सर्वस्व अर्पण केल्याचे जाणवते. एका हातात ध्वज धरलेला आणि दुसरा हात मोकळा, म्हणजे ‘त्याने गुरूंना / ईश्वराला अर्पण द्यायचे किंवा काहीतरी देणे शेष आहे’, असे जाणवते.’’ त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी दोन्ही हातांनी ध्वज धरलेल्या साधकाच्या चित्राचा प्रयोग ‘सुखसागर’ सेवाकेंद्रात प्रत्येक बुधवारी होणार्‍या सत्संगात साधकांकडून करवून घेतला होता.

९. आपत्काळात भ्रमणभाषऐवजी विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याद्वारेच संदेश देवाण-घेवाण करावी लागणार असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे 

एकदा सेवाकेंद्र आणि सेवाकेंद्राच्या परिसरात भ्रमणभाषच्या तरंगलहरी (रेंज) येत नसल्याने एक संपूर्ण दिवस अडचण निर्माण झाली होती. याविषयी प.पू. डॉक्टरांना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘आताच संपतकाळात अशी स्थिती आहे, पुढे आपत्काळात कसे होणार ? आपत्काळ चालू झाल्यावर भ्रमणभाष सेवा, विद्युत्प्रवाह आणि अन्य सोयीसुविधा नसतील. त्या वेळी भ्रमणभाष नसल्याने संपर्क करण्यातही अडचण येणार. अशा वेळी साधकांनी एकमेकांना निरोप देण्यासाठी विश्वमन आणि विश्वबुद्धी यांचेच साहाय्य घ्यावे लागेल. दुसरीकडच्या साधकांना निरोप देण्यासाठी साधकाने ध्यान लावून संबंधित साधकांना निरोप द्यावा लागेल आणि ज्या साधकाला निरोप घ्यायचा आहे, त्याला देव निरोप पोचवेल. यालाच ‘टेलिपॅथी’ म्हणतात. यासाठी साधकांची साधना वाढणे आवश्यक आहे आणि त्यांची किमान ५० टक्के आध्यात्मिक पातळी होणे आवश्यक आहे.’’

१०. ‘आपत्काळ संपून ईश्वरी राज्य येईपर्यंत किमान साधना करत आश्रमात राहिले, तरी साधकाची आध्यात्मिक पातळी वाढू शकते’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

एकदा आपत्काळाच्या तीव्रतेविषयी प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते, ‘‘आपत्काळाची तीव्रता पुष्कळ भीषण असेल. अशा परिस्थितीत ईश्वरी राज्य (हिंदु राष्ट्र) येईपर्यंत किमान साधना करत आश्रमात राहिले, तरी साधकाची आध्यात्मिक पातळी वाढून ती ५० टक्के होऊ शकते.’’

११. ‘साधकांनी साधना करून आनंदी रहाणे आणि मुक्ती मिळवणे, हीच खरी कृतज्ञता होईल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे 

रामनाथी (गोवा) येथील आश्रमाचे बांधकाम चालू होते. त्या वेळी आश्रमातील एक खोली निवासाच्या दृष्टीने सिद्ध झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ती पाहिली आणि ती खोली साधकांना रहाण्यासाठी देण्यास सांगितले. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणालो, ‘‘प.पू. साधकांना आपण अनेक सोयीसुविधा देतो, त्याचे आम्ही ऋण कसे फेडणार ?’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘साधक घरदार, पैसा यांचा त्याग करून आश्रमात साधना करण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांना साधनेत कोणत्याही दृष्टीने अडचण न येण्यासाठी तशा सोयीसुविधा द्यायला हव्यात. साधकांनी साधना करून आनंदी रहाणे आणि मुक्ती मिळवणे, हीच खरी कृतज्ञता होईल.’’

१२. ‘माझी शारीरिक स्थिती ईश्वरी राज्य आल्यावर सुधारेल’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे 

प.पू. डॉक्टरांची काही वेळा शारीरिक स्थिती चांगली नसायची. त्यांची प्राणशक्ती न्यून व्हायची, तसेच ते आजारी व्हायचे, याचसमवेत त्यांना विविध प्रकारच्या आजारांवर अनेक औषधेही चालू असायची. (आताही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्राणशक्ती न्यून असल्याने झोपूनच असतात. – संकलक) ते पाहून मी एकदा प.पू. डॉक्टरांना विचारले होते, ‘‘तुमची शारीरिक स्थिती चांगली करण्यासाठी काही उपाय नाही का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘माझी शारीरिक स्थिती ईश्वरी राज्य (हिंदु राष्ट्र) आल्यावरच सुधारेल. तेच सर्वांचे मूळ आहे. राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती सुधारली की, माझी शारीरिक स्थिती सुधारेल.’’ यावरून प.पू. डॉक्टरांची राष्ट्र-धर्म यांविषयीची एकरूपताच जाणवली.

१३. प.पू. डॉक्टरांनी ‘आपण ईश्वरी राज्य आणले, तरी आपले नाव कुठेही नसेल आणि जरी नाव असले, तरी ते शेवटी असेल’, असे सांगणे, यातून प.पू. डॉक्टरांनी स्वतःला आणि संस्थेला अहं नसल्याचे दर्शवणे 

हिंदु जनजागृती समिती विविध संघटनांना घेऊन राष्ट्र आणि धर्म हानी रोखण्यासाठी कार्यरत आहे. अशाच एका घटनेत समिती आणि सनातन संस्था यांना यश मिळाले होते. त्या यशाची बातमी वाचतांना त्यात समिती आणि संस्था यांचे नाव प्रथम लिहिले होते. ते वाचून प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘बातमीमध्ये समिती आणि संस्था यांचे नाव प्रथम न लिहिता सर्वांत शेवटी हवे; कारण आपण केलेल्या ईश्वरी कार्याचा आपल्याला अहं नाही. पुढेही आपण ईश्वरी राज्य (हिंदु राष्ट्र) आणल्यावर आपले नाव कुठेही नसेल आणि जरी आले तरी ते सर्वांत शेवटी असेल.’’ यातून प.पू. डॉक्टरांनी स्वतःला आणि संस्थेला कुठल्याही प्रकारचा अहं नसल्याचे दाखवून दिले.

– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२८.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक