गावातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आदी विनाप्रक्रिया सोडले जाते नदीत
शुद्धीकरणासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता
श्री. अजय केळकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात
कोल्हापूर – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे शक्तीपीठ असलेल्या शहरातील पंचगंगा नदी, वारकर्यांसाठी पवित्र असलेली पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी, पुण्यातील मुळा-मुठा नदी, लवकरच आता जिथे कुंभमेळा होणार आहे त्या नाशिकमधील गोदावरी यांसह राज्यातील तीर्थक्षेत्रांशेजारील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. इतकेच नव्हे, तर राज्यातील ५३ नद्या या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. प्रक्रिया न करता शहरे आणि गावांमधील सांडपाणी थेट नदीत सोडणे, कारखान्यांमधील पाणी शुद्धीकरण न करता औद्योगिक सांडपाणी थेट नदीत सोडणे यांसह उघड्या डोळ्यांनी दिसणार्या गोष्टींवर प्रदूषण मंडळ अन् स्थानिक प्रशासन यांनी केवळ तोंडदेखली कारवाई केल्याने नद्या प्रदूषित झाल्या आहेत.
Rivers at Maharashtra’s major pilgrimage sites are drowning in pollution
Untreated village sewage, industrial waste, and contaminated water are being discharged directly into rivers. Immediate and strict river purification measures are essential.
The… pic.twitter.com/x5lywfeRXF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 9, 2026
वर्ष २०२५ च्या आकडेवाडीनुसार महाराष्ट्रात साधारणत: ९० कोटी लिटर सांडपाणी निर्माण होते. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक पाणी प्रकिया न करता थेट नदीत सोडले जाते. आळंदी येथील इंद्रायणी इतकी प्रदूषित झाली आहे की, वारीच्या काळात वारकर्यांनी ‘या पाण्याने स्नान करू नये, त्यामुळे त्वचारोग होऊ शकतात’, असे फलक नगरपालिका प्रशासन लावते. यापेक्षा नामुष्कीची गोष्ट कोणती असेल !
आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची नदी असूनही पंचगंगा शुद्धीकरणासाठी प्रयत्न नाहीत !

कोल्हापूर शहरासाठी वरदायिनी असलेल्या आणि ५ नद्यांनी मिळून होणार्या पंचगंगा नदीत शहरातीलच प्रमुख नाले थेट नदीत मिसळतात. एका अहवालानुसार कोल्हापूर शहरात प्रतिदिन ११०० लाख लिटर प्रक्रिया न केलेले पाणी सिद्ध होते. यापैकी १७० लाख लिटरहून अधिक पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळते. शहरात असलेल्या विविध नाल्यांच्या शुद्धीकरणाची कोणतीच प्रक्रिया नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीत मिसळल्याने केवळ नागरिकांच्या आरोग्यावर नव्हे, तर जलचरांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. प्रतिवर्षी तेरवाड येथील बंधार्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मासे मृत्यूमुखी पडतात; मात्र याचे कोणतेही सुवेरसुतक प्रदूषण मंडळाला नसते. ते नेहमीप्रमाणे ‘दूषित’ पाण्याचे नमुने घेतात; कागदी घोडे नाचवतात आणि निघून जातात. या नदीच्या प्रदूषणाचे खापर महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ नेहमीच श्री गणेशमूर्ती विसर्जनावर फोडतात.
वारकर्यांच्या श्रद्धेशी खेळ !
आळंदी येथील इंद्रायणी नदी तर बहुतांश महिने जलपर्णीने वेढलेली असते, सातत्याने येणार्या पांढर्या फेसासह आजूबाजूच्या अनेक कारखान्यांमधून प्रक्रिया न करता मिसळणारे सांडपाणी तर आता नित्याचेच झाले आहे ! इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी अनेक बैठका झाल्या, घोषणा झाल्या; मात्र हे सगळे कागदावरच राहिले. वर्ष २०१७ मध्ये ‘नमामि चंद्रभागा’ची घोषणा झाली. अनुमाने ११० किलोमीटरचा परिसर त्यात समाविष्ट करण्यात आला. पुणे, सातारा, सोलापूर या संयुक्त जिल्ह्यांनी काम करायचे ठरले; मात्र इच्छाशक्तीच्या अभावामुळे पुढे काहीच घडले नाही. पंढरपूरच्या नदीच्या काठावर आता अतिक्रमणासह अवैध वाळूउपसा मोठ्या प्रमाणात होतो. याकडेही सातत्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
पुण्यातील मुळा-मुठा नदीची इतकी वाईट अवस्था झाली आहे की, नदीचे पाणी काळेकुट्ट असून त्यात पाय बुडवण्यासही सर्वसामान्य माणूस धजावणार नाही. या सर्वांवर आता शासन आणि प्रशासन अशा दोन्ही स्तरांवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असून प्रत्यक्ष कृती केली, तरच या नद्या प्रदूषणातून मुक्त होतील.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार