Oath Ceremony Suvendu Adhikari : शुभेंदु अधिकारी बनले बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री

दिलीप घोष, अग्नीमित्रा पॉल, निशित प्रमाणिक, अशोक कीर्तनिया आणि खुदीराम टुडू बनले मंत्री !

शुभेंदु अधिकारी शपथ घेताना

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी ९ मे या रवींद्रनाथ टागोर यांच्या १६५ व्या जयंतीच्या दिवशी शपथ घेतली. बंगालचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी त्यांना शपथ दिली. शुभेंदु अधिकारी यांच्यासमवेत समवेत दिलीप घोष, अग्नीमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशित प्रमाणिक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराज चौहान, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आदी भाजपशासित राज्यांचे २० मुख्यमंत्री, अभिनेते मिथुन चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी भाजप समर्थक आणि कार्यकर्ते यांना दंडवत प्रणाम केला.

९८ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा सन्मान

पंतप्रधान मोदी माखनलाल सरकार यांचा सन्मान करताना

पंतप्रधान मोदी यांच्याकडून भाजपचे ९८ वर्षीय कार्यकर्ते माखनलाल सरकार यांचा सन्मान करण्यात आला. पंतप्रधान मोदी मंचावर त्याच्याजवळ गेले आणि त्यांना शाल पांघरली. तसेच त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. वर्ष १९५२ मध्ये काश्मीर आंदोलनाच्या वेळी माखनलाल सरकार श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी तिथे गेले होते, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. माखनलाल सरकार स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रवादी चळवळीशी संबंधित असलेल्या प्रारंभीच्या तळागाळातील नेत्यांपैकी एक आहेत.