मुलांना इंग्रजी बालगीते अर्थात् ‘नर्सरी राइम्स’ना सध्या ‘नॉन्सेन्स राइम्स’ म्हणजेच ‘विक्षिप्त निरर्थिका’ असे म्हटले जाते. तसे का म्हणू नये ? त्यांत तर्कसंगत वा रूपकात्मक विवरण नसतेच ! सद्यःस्थितीत पुढारलेपण स्वतःत आणण्यासाठी ‘जॉनी जॉनी’ बोलता बोलता कल्पनाशक्ती वाढवणारा ‘चांदोबा’ आता हरवला आहे. त्यामुळेच अलीकडच्या मुलांमध्ये ना बालपणीचा निखळ आनंद दिसतो, ना संवेदनशीलता ! दिसते ते भकासपण आणि यांत्रिकपणा ! आजच्या मुलांमधील याच भकासपणाची जाणीव उत्तरप्रदेशाचे उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी करून दिली आहे. ‘जॉनी जॉनी येस पापा’ ही इंग्रजीतील सर्वांच्या परिचयाची कविता मुलांना खोटे बोलायला शिकवते. पाश्चात्त्य संस्कृतीचा छाप असलेल्या इंग्रजी कविता या आजच्या पिढीला अत्यंत आवश्यक असलेले संस्कार देऊ शकत नाहीत’, असे सांगून त्यांनी ज्या कविता ऐकून आधीच्या पिढ्या मोठ्या झाल्या, अशा उत्तम जीवनमूल्ये असलेल्या काही हिंदी कवितांची उदाहरणेही दिली, तसेच शिक्षकांना गुरु होण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.

नाद, ठेका, अनुप्रास, सुटसुटीत आणि मजेशीर शब्दांच्या रचनेतून अर्थपूर्ण अन् बोधामृत देणारी पारंपरिक बालगीतांचा ठेवा आता हरवल्यातच जमा आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांची पहिली कविता आता आजीच्या ओव्या किंवा अंगणातील बडबडगीतांमधून नव्हे, तर यू ट्यूबवरील व्हिडिओमधून शिकवली जाते. ‘जॉनी जॉनी येस पापा’, ‘रेन रेन गो अवे’ यांसारख्या इंग्रजी ‘नर्सरी राइम्स’ भारतातील घराघरांत पोचूनही २५ वर्षांहून मोठा काळ उलटला आहे. इंग्रजी ‘नर्सरी राइम्स’ भाषा शिकण्यासाठी उपयोगात आल्या खर्या; पण मुलांच्या मनावर त्यांनी कोणते संस्कार केले ? याकडे डोळसपणे पहाणे महत्त्वाचे आहे. पूर्वी आजी-आई मुलांना खेळवतांना, झोपवतांना गाणी म्हणत असत. ‘ससा रे ससा, दिसतो कसा ?’ यातून प्राण्यांची ओळख करून दिली जात असे, तर ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’सारख्या गीतातून देवाप्रती भक्ती आणि निसर्गाप्रती प्रेमाची शिकवण दिली जात असे. ‘झुक झुक आगीनगाडी’ हे गीत मुलांना प्रवासाचे वर्णन आणि ताल शिकवते. अशा पारंपरिक गीतांमधून भाषा, लय, ताल, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती विकसित होण्यासह निसर्ग, प्राणी, कुटुंब यांविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असे संस्कार होत असत. याउलट इंग्रजी ‘नर्सरी राइम्स’ म्हणजे अर्थाला महत्त्व न देता निव्वळ लयबद्ध शब्दध्वनींवर भर देऊन रचलेले गीत. त्या दृष्टीने त्याला ‘नॉन्सेन्स व्हर्स’ म्हटले जाते.
भारतीय संस्कृतीचा वसा
बडबडगीते अथवा बालगीते ही भारतीय लोकसंस्कृतीतून सहस्रो वर्षांत नैसर्गिकरित्या विकसित झालेली मौखिक परंपरा आहे. वैदिक काळातील मंत्रांमध्येही लय, पुनरुक्ती आणि ध्वनीसौंदर्य दिसते. संस्कृत सुभाषिते, श्लोक आणि लोकगीते ही बालसंस्कारांची साधने होती. ग्रामीण भागांत आई मुलांशी बोलतांना तालबद्ध वाक्ये वापरत असे; त्यातून बडबडगीतांचा जन्म झाला. आई, आजी, कुटुंब आणि समाज यांच्या माध्यमातून बालगीतांची मौखिक परंपरा पिढ्यान्पिढ्या पुढे आली. संतकाळातील अभंग, ओव्या आणि स्त्रियांची कामे करतांना म्हणायची गीते यांचा बालगीतांवर प्रभाव दिसतो. बालगीते ही शोधली गेली नाहीत, तर ती भारतीय जीवनपद्धतीतून आणि मातृत्वातून नैसर्गिकपणे जन्माला आली. १९ व्या –२० व्या शतकात बालसाहित्य चळवळ वाढल्यानंतर ही गीते पुस्तकांत छापली जाऊ लागली. इंग्रजी ‘नर्सरी राइम्स’ १७ व्या ते १९ व्या शतकात युरोपमध्ये लिखित स्वरूपात लोकप्रिय झाल्या. भारतात मात्र बालगीते त्याही आधीपासून लोकपरंपरेत अस्तित्वात होती. भेद एवढाच की, भारतीय गीते मौखिक होती, तर पाश्चात्त्य राइम्स लवकर लिखित स्वरूपात आल्या.
भारतीय बालगीतांचा मुख्य उद्देश भाषा आणि उच्चार शिकवणे, स्मरणशक्ती वाढवणे, ताल अन् लय समजावणे आणि सामाजिक मूल्ये देणे, आई-मुले यांच्यातील भावनिक नाते दृढ करणे हा होता. पंचतंत्र आणि हितोपदेश यांसारख्या भारतीय कथांमधून सत्य, बुद्धीमत्ता, दया आणि नैतिकता सहजपणे शिकवली जात असे. त्यातूनच संवेदनशीलता, सहानुभूती, संवेदना विकसित होऊन आयुष्य जगले जात असे आणि आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारांतही जिवंतपणा अनुभवता येत असे. जेव्हा या बालगीतांची जागा ‘राइम्स’ने घेतली, तेव्हापासून हळूहळू भारतीय समाज स्वतःच्या सांस्कृतिक मुळांपासून दूर होत गेला आणि त्यामुळेच आताची मुले सजीव असूनही त्यांच्यात जिवंतपणा न आढळता भावनिक कोरडेपणा आढळतो. त्यांच्या वागण्यातील विक्षिप्तपणा आणि त्यांना जगण्यात वाटणारी निरर्थकता यांचे मूळ इंग्रजीतील ‘नॉन्सेन्स राइम्स’मध्येच आहे.
पायाभरणी संस्कारपूर्णच हवी !
बालगीते ही केवळ शब्द, लय आणि उच्चार शिकवणारी साधने नसतात. ती मुलांच्या विचारविश्वाची पायाभरणी करतात. ‘जॉनी जॉनी येस पापा’ या गाण्यात मुलगा खोटे बोलतो आणि त्याचे खोटे पकडले गेल्यावर तो ते हसण्यावारी नेतो. हे दृश्य विनोदी स्वरूपात दाखवले गेले असले, तरी येथे नकळत ‘खोटे बोलणे, ही सामान्य गोष्ट आहे’, हे बिंबवले जाते. त्याचप्रमाणे ‘रेन रेन गो अवे’ या गाण्यात पावसाला अडथळा मानून स्वतःच्या सोय आणि वैयक्तिक इच्छा यांसाठी त्याला ‘निघून जा’ म्हणणे म्हणजे निसर्गाला टाळण्याची आणि ‘हवामानातील पालट हा अडथळा आहे’, अशी भावना निर्माण होते. याउलट मराठीतील ‘ये रे ये रे पावसा’ या गीतात आनंदाने आणि उत्साहाने पावसाचे स्वागत केले जाते. निसर्ग हा पूजनीय असून त्याचा स्वीकार आणि त्याच्या प्रतीची कृतज्ञता यांचा संस्कार मनावर होतो; कारण भारतीय संस्कृतीत पाऊस म्हणजे अन्न, शेती, जीवन आणि समृद्धी यांना पूरक घटक ! शेतीप्रधान संस्कृतीत वाढलेल्या समाजासाठी पाऊस हा केवळ हवामानाचा भाग नव्हता, तर जीवनदाता होता; म्हणूनच भारतीय गीतांत चंद्र, पक्षी, झाडे, पाऊस, नदी यांच्याशी संवाद आढळतो. यातून दोन संस्कृतींतील जीवनदृष्टी स्पष्ट दिसते.
इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव, भ्रमणभाषमधील विदेशी साहित्य आणि आधुनिक जीवनशैली यांमुळे भारतीय जीवनमूल्ये मागे पडत आहेत. अनेक पालकांनाही आता स्वतःच्या बालपणीची गीते आठवत नाहीत. हा केवळ भाषेचा पालट नाही, तर सांस्कृतिक नाळ तुटल्याचे लक्षण आहे. आजच्या शिक्षणपद्धतीत संस्कारांपेक्षा केवळ भाषिक दिखाऊपणाला अधिक महत्त्व दिले जात आहे. मुलांना अशा निरर्थक कविता गेली अनेक दशके शिकवल्या जात आहेत; मात्र अद्याप कुणीही त्या पाठ्यपुस्तकातून हटवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. आता पालकांनाच त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शाळांमध्ये विदेशी नव्हे, तर भारतीय बालगीतांचा समावेश करावा लागेल. अन्यथा ‘राइम्स’च्या आहारी गेलेली पिढी लौकिकदृष्ट्या पुढारलेली दिसेल; पण संस्कार, संवेदना आणि सांस्कृतिक जिवंतपणा यांपासून मात्र दूर गेलेली असेल !



संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
शाळा-महाविद्यालयात भगवे वस्त्र वाटण्यास पोलिसांकडून श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मनाई
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
शिक्षकी पेशाचे अधःपतन !
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस