भारताची शिक्षणव्यवस्था आणि इतिहास यांच्यावर ब्रिटीश अन् साम्यवादी यांचा प्रहार !

भारताची शक्तीस्थाने असलेली शिक्षणव्यवस्था आणि इतिहास उद्ध्वस्त करण्याचे ब्रिटिशांचे कारस्थान

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. भारतियांची मूळ ओळख हिरावून घेण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न

‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला. त्यांच्याहूनही मोठे अत्याचार आपल्यावर ब्रिटीश साम्राज्याने केले. सर्वांत मोठा अत्याचार, म्हणजे त्यांनी आपली मूळ ओळखच आपल्यापासून हिरावून घेतली. जेव्हा एखादे राष्ट्र आणि समाज यांची ओळख त्यांच्यापासून हिरावून घेतली जाते, तेव्हा त्यांच्या पाठीचा कणाच मोडला जातो अन् त्यांना परत ताठ उभे रहाता येत नाही. हाच परिणाम आपल्या देशावर झाला. त्यानंतर आत्मविश्वास आणि आत्मसन्मान हरवलेला एक समाज म्हणून आपल्याला वाटचाल करावी लागली. ही अत्यंत मानहानीकारक परिस्थिती आपल्या हिंदूंवर आली.

धर्मावर आधारित एक संस्कृती जी आध्यात्मिक मूल्यांना महत्त्व देणारी होती, हीच आपली खरी ओळख होती. या उच्च मूल्यांमुळेच त्या काळी जगातील सर्वाधिक ज्ञानी आणि सर्वांत अधिक समृद्ध राष्ट्र म्हणून भारत ओळखला जात होता. आपली ही एवढी चांगली ओळख ब्रिटिशांना आपल्यापासून हिरावून का घ्यावी लागली ? जेव्हा ब्रिटीश प्रथमच भारतात आले, तेव्हा भारतीय संस्कृतीची प्राचीनता आणि वैभव पाहून ते अक्षरशः थक्क झाले होते. त्यांना हे लक्षात आले की, भारतियांची मूळ भाषा संस्कृत आहे. सर्व युरोपियन भाषा या संस्कृत भाषेशी पुष्कळ मिळत्या जुळत्या आहेत. त्या एवढ्या जुळल्या जात होत्या की, त्यांना मान्य करावेच लागले की, त्यांच्या सर्व भाषा या मूळ संस्कृतपासूनच विकसित झाल्या आहेत.

श्री. अभिजित जोग यांचा परिचय

श्री. अभिजित जोग

श्री. अभिजित जोग हे प्रसिद्ध अधिकोष सल्लागार (बँक कन्सलटंट) आहेत. यासमवेतच ते ‘मार्केटिंग (विपणन)’, ‘ब्रँडिंग’ (विपणनाचे एक साधन) आणि विज्ञापन क्षेत्रात अनुमाने ४० वर्षांचा अनुभव असलेले प्रख्यात लेखक अन् विचारवंत आहेत. त्यांनी लिहिलेले ‘असत्यमेव जयते’, ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’, आणि ‘ब्रँडनामा’ ही पुस्तके विशेष लोकप्रिय ठरली आहेत. भारताचा इतिहास, संस्कृती आणि वारसा हे विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे, हा त्यांचा उद्देश आहे.

२. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी आर्य, आदिवासी आणि जातीव्यवस्था अशा खोट्या कथानकांची निर्मिती

अ. बाहेरून आलेले गोर्‍या रंगाचे आर्य : संस्कृत श्रेष्ठ भाषा आहे आणि वैदिक संस्कृतीही श्रेष्ठ आहे; परंतु ही संस्कृती भारतीय लोकांनी बनवली नसून ती पश्चिमेकडून आलेल्या गोर्‍या रंगाच्या आर्य लोकांनी बनवली आहे, असे सांगून त्यांनी आपल्या समाजात अशी फूट पाडली की, ज्याच्याशी आम्ही आजपर्यंत झुंजत आहोत.

आ. आदिवासी : जे लोक जंगलात रहात होते, त्या लोकांना आपल्या परंपरेमध्ये आपण ‘वनवासी’ असे म्हणतो किंवा त्यांना ‘वनजाती’ म्हणत होतो; परंतु इंग्रजांनी त्यांना ‘आदिवासी’ असा शब्द दिला. ‘आदि’, म्हणजे ‘जे पूर्वीपासून भारतात रहात आहेत ते आदिवासी’, असे त्यांनी सांगितले. ‘हे आदिवासी येथील मूळ निवासी आहेत आणि बाकी सर्वजण बाहेरच्या देशातून आले आहेत’, अशी आणखी एक नवीन फूट त्यांनी पाडली.

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

इ. आर्य आणि द्रविड संकल्पना : आपला समाज, इतिहास आणि शास्त्रे यांमध्ये आर्य अन् द्रविड या दोन वंशांचा कधीही उल्लेख नव्हता. आर्य एक गुण विशेषता आहे आणि द्रविड ही एक भौगोलिक संज्ञा होती. जे दक्षिणेत रहातात, त्यांना ‘द्रविड’ म्हणतात. जो प्रदेश तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, तेथे रहाणारे ‘द्रविड लोक’ आणि आर्य म्हणजे ज्यांच्यामध्ये काही गुण आहेत, ते ‘आर्य लोक’ असे म्हटले जाऊ लागले. वास्तविक हिंदु संस्कृतीत अशी वंशांसाठी कधीही नावे दिली जात नव्हती; परंतु ब्रिटिशांनी आर्य आणि द्रविड वंश अशी नवीन संकल्पना निर्माण केली. असे करून त्यांनी हिंदु समाजात मोठी फूट पाडली.

ई. जातीव्यवस्था : आणखी एक शब्द होता ‘जात’. ‘जात’ हा शब्द आपल्या इतिहासात कधी उच्चारलेलाच नाही. आपल्याकडे वर्णव्यवस्था होती आणि ही व्यवस्था व्यवसायावर आधारित होती. ‘जात (कास्ट)’ हा शब्द युरोप, स्पेन आणि पोर्तुगाल येथेही होता. जो जन्मावर आधारित होता. हा पुष्कळ मोठा इतिहास आहे; परंतु ही जी पालट करता न येणारी जात आपल्या वर्णव्यवस्थेवर लादण्यात आली, त्यामुळे प्रचंड मोठी फूट हिंदु समाजात पाडली गेली. हे सर्व इंग्रजांनी केवळ त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी केले. त्यांनी भारतियांची ओळख हिरावून घेतली आणि त्यांच्या स्वार्थासाठी जेवढी पूरक अन् सोयीस्कर तेवढीच ओळख आपल्यावर थोपवली.

३. ब्रिटिशांनी रचलेले इतिहासाचे खोटे कथानक साम्यवाद्यांनी पुढे चालू ठेवून देशाची केली मोठी हानी !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या सर्व खोट्या गोष्टी का पालटल्या नाहीत ?, असे कुणालाही वाटू शकते. भारताच्या इतिहासाचे क्षेत्र स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून साम्यवाद्यांच्या हातात होते. स्वातंत्र्यापूर्वी इतिहासाविषयी बोलणारे काही प्रमुख प्रवाह होते. त्यांपैकी ‘इस्लामी विद्वान’ हे प्रमुख होते. त्यांनाच ‘देवबंद स्कूल’ आणि ‘अलिगड स्कूल’ म्हटले जाते.

दुसरा एक प्रवाह काँग्रेस पक्षाचा होता. त्यांच्या इतिहासाचे खोटे कथानक एम्.एन्. रॉय यांनी लिहिले होते. काही वर्षांपर्यंत ते काँग्रेस पक्षात राहिले; पण नंतर त्यांनी ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’ची स्थापना केली. अशा प्रकारे भारतात इतिहासाचे खोटे कथानक बनत गेले, जे संपूर्ण साम्यवाद्यांच्या हातात गेले. वर्ष १९६९ मध्ये इंदिरा गांधीचे सरकार अल्पमतात आले असता ते वाचवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने इंदिरा गांधींना साहाय्य केले. त्याच्या बदल्यात ते कोणतेही महत्त्वाचे मंत्रीपद मागू शकत होते; परंतु त्यांनी धूर्तपणे शिक्षण मंत्रालय मागितले. त्यांना माहिती होते की, येणार्‍या भावी पिढीच्या मेंदूवर जर साम्यवादी विचारांचे नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या हातात शिक्षण मंत्रालय असणे आवश्यक आहे. नंतर त्यांनी साम्यवादी नुरुल हसन यांना शिक्षण खात्याचे राज्यमंत्री बनवले. त्याच वर्षी वर्ष १९६९ मध्ये ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठ’ (जे.एन्.यू.)ची स्थापना झाली. तेथे रोमिला थापर, राम शरण शर्मा आणि इरफान हबीब हे सर्व इतिहासकार होते. शिक्षण राज्यमंत्री नुरुल हसन यांच्यासमवेत त्यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण भारताच्या इतिहास क्षेत्रावर अशी घट्ट पकड घेतली की, आपण आजपर्यंत ती सोडवू शकलो नाही. संपूर्ण इतिहासाचे खोटे कथानक जे ब्रिटिशांनी रचले होते, तेच साम्यवाद्यांनी जसेच्या तसेच पुढे चालू ठेवले. अशा प्रकारे भारताचा इतिहास आणि शिक्षण या २ शक्तीस्थानांवर ब्रिटिशांनी प्रहार केला. स्वातंत्र्यानंतर ती साम्यवाद्यांच्या नियंत्रणात गेली. त्यांनी भारतियांची ओळख आपल्यापासून हिरावून घेतली, तसेच देशाचे शक्तीस्थान असलेली शिक्षणव्यवस्था आणि आम्हा हिंदूंचा उज्ज्वल इतिहास यांची मोडतोड करून ते अत्यंत विकृत केले.’

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.