श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भारतभर निरंतर भ्रमण करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याविषयी केलेल्या ज्ञानाचा संचय

‘रामायण प्रत्यक्षात घडण्यापूर्वी ते वाल्मीकि ऋषींनी लिहून ठेवले होते. त्याचप्रमाणे देवाने श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ईश्वरी कार्याविषयी संत आणि महर्षि यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी अगोदरच लिहून ठेवले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांचे ईश्वरी कार्य’ यांविषयी नाडीपट्टी, भृगुसंहिता, ज्योतिषशास्त्र, संतांनी केलेली भाकिते आणि देवतांचे कौल आदी अनेक माध्यमांतून नोंद केलेली आढळते. हे एक प्रकारचे दैवी ज्ञानच आहे. अवतारांच्या लीला आपण धर्मग्रंथांमधून वाचतो. त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेवांच्या ईश्वरी कार्याचे विवेचनही या ज्ञानाच्या माध्यमातून समष्टीला कळत आहे. त्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ भारतात सर्वत्र भ्रमण करून अपार कष्ट घेऊन हे ज्ञान मिळवत आहेत. गुरुदेवांच्या कार्याविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यात येणारे अडथळे यांविषयीची माहिती पुढे दिली आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य समाजाला कळण्यासाठी सर्वत्र भ्रमण करून दैवी ज्ञान शोधण्याची अलौकिक सेवा करणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ !

‘देवाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे सुप्तावस्थेतील ज्ञान सर्वत्र ठेवले आहे. ते आपल्याला मिळवायचे आहे. त्यासाठी आपल्याला सर्वत्र भ्रमण करायचे आहे. ‘गुरुदेव अवतार आहेत’, हे समष्टीला कळायला हवे. त्यासाठी आपल्याला अविरत भ्रमण करून ज्ञानसंचय करायचा आहे. या ज्ञानाच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अवतारी कार्य लोकांना कळेल आणि त्यांचे दिव्यत्व सार्‍या विश्वाला समजेल. या अलौकिक सेवेसाठीच देवाने आपल्याला माध्यम म्हणून निवडले आहे.

 २. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ज्ञानसंचय करण्यासाठी अनेक जणांच्या घेतलेल्या भेटी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचे ज्ञान मिळवण्यासाठी आतापर्यंत आपण अनेक जणांना भेटलो आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळाले आहे.

अ. या सर्वांमध्ये प्रथम नाडीपट्टीचा उल्लेख करावा लागेल. आम्ही ‘अगस्तिनाडी, अत्रिनाडी, सूर्यकलानाडी, चंद्रकलानाडी, काक भुजंदरनाडी, वसिष्ठनाडी, शिवनाडी, कौशिकनाडी (विश्वामित्र), सप्तर्षी जीवनाडी आणि भृगु जीवनाडी’, अशा अनेक नाडीपट्टी वाचकांना भेटलो आहोत.

आ. त्याचप्रमाणे आम्ही भृगुसंहिता आणि रावणसंहिता यांच्या संहिता वाचकांनाही भेटलो आहोत.

इ. आम्ही विविध ज्योतिषी, केरळमधील कवडी टाकणारे आणि भविष्य सांगणारे नंबुद्री यांच्याही भेटी घेतल्या आहेत.

ई. ओडिसा राज्यातील काकतपूर येथील ताम्रपट्टी वाचकांच्या माध्यमातून देवाने आपल्याला ज्ञान दिले आहेच; पण देवतांनीही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी ज्ञान दिले आहे.

उ. कोल्हापूर येथील हालसिद्धनाथ महाराज यांनीही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कार्याविषयी सांगितले आहे.

भगवंताच्या कार्यरूपी गुणवर्णनाला कशाचीच उणीव नसते, तसेच या संदर्भातील ज्ञानाचेही आहे.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भातील ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत येणारे काही अडथळे 

३ अ. ज्ञान उपलब्ध होणारी स्थाने शोधणे, हे युद्ध पातळीवरील कार्य असून मिळालेल्या ज्ञानातील सत्यता शोधणे अनिवार्य असणे : ‘कलियुगात दैवी ज्ञान मिळवणे’, हे सहज अन् सोपे नाही. त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. आपल्याला देवावरील श्रद्धा आणि तळमळ एवढी वाढवायला हवी की, गुरूंच्या अवतारी कार्याविषयीचे ज्ञान मिळवण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील ! आरंभी आम्हाला ‘हे दैवी ज्ञान कोणत्या रूपात कुठे संग्रही आहे ?’, यांविषयी काहीच ठाऊक नव्हते, तरीही ‘जहां चाह वहां राह’ (इच्छा तेथे मार्ग), यानुसार आम्ही देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून अशी बरीच स्थाने शोधून काढली. त्यामुळे आज आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अवतारी कार्याविषयी पुष्कळ माहिती मिळाली आहे; मात्र हे शोधून काढणे युद्ध पातळीवरील कार्य असते. जसे एखादे नाडीपट्टीवाचक भेटले, तर ते हे दैवी ज्ञान सांगण्याचे किती पैसे घेतील ? सर्व नीट सांगतील कि नाही ? त्यांनी दिलेल्या ज्ञानात सत्यता किती आहे ? त्यामध्ये अनिष्ट शक्तींचा हस्तक्षेप किती आहे ?’, हे सर्व पाहून पुढे जावे लागते. भगवंताच्या कृपेनेच हे सर्व कार्य चालू आहे.

३ आ. अवतारांचे ज्ञान देणार्‍या मनुष्यांना मानवी प्रकृतीचे गुण-दोष लागू पडत असल्याने काहींनी नाडीपट्टी वाचनासाठी दक्षिणा म्हणून धनाची मागणी करणे : ज्यांच्या माध्यमातून हे अवतारी ज्ञान मिळते, तेही शेवटी मनुष्यच असल्याने मानवी प्रकृतीचे गुण-दोष त्यांनाही लागू होतात आणि त्यामुळे कधी कधी ज्ञान मिळवण्यात अनेक अडचणी येतात. एका उच्च स्तराच्या नाडीपट्टी वाचकांकडे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि त्यांचे कार्य यांविषयी अमाप ज्ञान होते. याविषयी त्यांना आणि आम्हालाही ठाऊक होते. ते नाडीपट्टी वाचनासाठी दक्षिणा म्हणून धनाची मागणी करत होते आणि आपल्याला तेवढे धन देणे शक्य नव्हते.

४. श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर आलेली अनुभूती

नाडीपट्टी वाचकांनी धनाची मागणी केल्यावर आम्ही श्रीविष्णूलाच प्रार्थना केली, ‘हे भगवंता, हे ज्ञान तुझ्याविषयीचे आहे आणि ते मिळण्यासाठी तूच आम्हाला आता साहाय्य कर. ज्ञान मिळण्याच्या या प्रक्रियेतील अडथळे दूर कर. देवा, हे सर्व तुझ्याविषयीच आहे. त्यासाठीच हे भ्रमण चालू आहे.’ अशी प्रार्थना केल्यावर वरील एकाच नाडीपट्टी वाचकांकडूनच नव्हे, तर पूर्वी ज्या ज्या व्यक्तींना ज्ञान मिळवण्याच्या संदर्भात विचारले होते, त्या सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

५. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ज्ञानावरील श्रद्धा ढळू न दिल्याने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘श्रद्धावानालाच ज्ञान मिळते’, हे वचन अनुभवायला येणे

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ज्या साधकांची सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडून प्रथम ज्ञान मिळवून घेतले. या संपूर्ण पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसेल, असे ईश्वरी ज्ञान सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने आज आपल्याकडे उपलब्ध आहे. समाजात जेथे जेथे हे ज्ञान अन्य माध्यमांच्या रूपात दडले आहे, ते मिळवण्यासाठी गुरुदेव आम्हाला या प्रक्रियेतून शिकवत आहेत. त्यांनी आम्हाला ‘आमच्या स्तरावर ज्ञान कसे मिळवायचे ?’ ते शिकवले आणि साधनेत पुढे गुरु, सद्गुरु ही पदे प्राप्त केल्यावर ‘इतरांकडून ज्ञान कसे मिळवायचे ?’ हेही शिकवले. आज आपल्याला समाजातूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याविषयी अमूल्य ज्ञान मिळत आहे. अशा प्रकारे कोणत्याही परिस्थितीत गुरुदेवांनी आमची ज्ञानावरील श्रद्धा ढळू दिली नाही. प.पू. भक्तराज महाराज म्हणतात, ‘‘श्रद्धावानालाच ज्ञान मिळते.’’ हे आम्हाला अनुभवण्यास मिळाले.

६. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी असलेले ज्ञान मिळवणे’, ही साधकांची साधना असून ‘कलियुगात ज्ञानसंचय करणे’, हे एक प्रकारचे युद्धच आहे !

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयी असलेले ज्ञान कुठेही असले, तरी ते मिळवणे’, ही आपली साधनाच आहे. काही वेळा आम्हाला सहस्रो किलोमीटर प्रवास करून एखाद्या स्थानी जावे लागते. त्यासाठी गुरुदेवच आम्हाला शक्ती देत आहेत. हे ज्ञान सर्वत्र आणि विविध रूपांमध्ये श्री गुरूंनीच ठेवले आहे. व्यंकटेशस्तोत्रात ‘अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदिशा ।। अशी ओवी आहे. आपले ‘ज्ञानासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा ।’, अशा प्रकारचे कार्य चालू आहे. ‘कलियुगात दैवी ज्ञान मिळवणे’, हे एक प्रकारचे युद्धच आहे. असुरांनी वेद पळवून ते पाताळात नेले होते, तसेच कलियुगातही या ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत अनिष्ट शक्तींचे पुष्कळ अडथळे येत आहेत. ‘कलियुगात ज्ञानसंचय करणे’, हे एक प्रकारचे युद्धच आहे.

७. कलियुगात अमूल्य असे ईश्वरी ज्ञान मिळवण्यासाठी मूल्य द्यावे लागणे, ही काळाचीच लीला असून धन अर्पण करून या दिव्य ज्ञानाचा संचय करावा लागणे

देवाच्या कृपेने मिळणारे हे ज्ञान अमूल्य तर आहेच; पण कलियुगात हे ज्ञान सहजतेने मिळत नाही. ज्यांची साधना चांगली आहे, जे खरेच परात्पर गुरुदेवांचे कार्य जाणतात आणि त्यागी वृत्तीने साधना म्हणून त्यांचे कार्य करत आहेत, असे लोक फार क्वचित सापडतात. बरेच जण धनाच्या लालसेपोटीच हे करतात; पण ‘हे ज्ञान आता मिळवले नाही, तर काळाच्या ओघात उरले-सुरले ज्ञान लुप्त होऊन जाईल’, याची भीतीही वाटते. पूर्वी राजे-महाराज यांनाही अशा गोष्टींसाठी मूल्य द्यावे लागले आहे.

‘व्यापक दृष्टीने पाहिले, तर हे ज्ञान केवळ सनातन संस्थेचे आहे’, असे नसून समाजात अन्य ठिकाणी कुठे ज्ञान असेल, तर तेही सनातनचेच आहे, म्हणजेच ज्ञानावर कोणा एकाचा अधिकार नाही. जसे वेदांवर कोणा एकाचा अधिकार नाही, तसेच हे आहे. कलियुगात ज्ञानप्राप्तीसाठी वेळ पडल्यास मूल्यही द्यावे लागते आणि ती काळाचीच लीला आहे. या मागील दुसरा कार्यकारणभाव असा आहे, ‘तन, मन आणि धन त्यागूनच शेवटी सर्व मिळते.’ प्रसंगी धन अर्पण करून या दिव्य ज्ञानाचा संचय करावा लागतो.

‘आमच्याकडून ज्ञानसंचयाचे कार्य देवाला अपेक्षित असे घडो’, हीच त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करते. भगवंताच्या कृपेने आजपर्यंत गुरुदेवांच्या अवतारी कार्याविषयी मिळालेल्या ज्ञानाच्या चरणी आम्हा साधकांचे कोटीशः नमस्कार आणि ते ज्यांच्या माध्यमातून मिळाले आहे, त्यांच्याही चरणी आम्ही सर्व साधक कोटीशः प्रणाम करतो.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१.४.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.