‘वारकरी गुरुकुल आश्रमा’च्या बाल वारकर्यांकडून संतांचे चैतन्यमय प्रसंग सादर !

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरीचे चैतन्य अवतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ‘अमरवाणी फाउंडेशन’ने या अपूर्व सोहळ्याचे आयोजन केले होते. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील ‘श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रमा’च्या बाल वारकर्यांनी या वेळी केलेल्या कलाविष्काराने उपस्थित भाविक आणि मान्यवर यांना मंत्रमुग्ध केले.
संतांचा दैदीप्यमान इतिहास झाला जिवंत !
या ‘भक्ती सोहळ्या’त बाल वारकर्यांनी पावली आणि फुगडीच्या तालावर वारकरी खेळांचे सादरीकरण केले. या वेळी संतांच्या जीवनातील अद्भुत प्रसंग अत्यंत भावपूर्ण रितीने साकारण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत, संत जनाबाईंसमवेत विठ्ठलाने दळलेले दळण आणि संत नामदेवरायांच्या हाताने भगवंताने ग्रहण केलेली खीर, अशा प्रसंगांतून भक्तीचा महिमा दर्शवण्यात आला. जगद्गुरु संत तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्तनातील ऐतिहासिक भेट बालसंस्कारांचा गौरव करणारी ठरली. संत गोरोबाकाकांनी भक्तीच्या अवस्थेत चिखलासह बाळ तुडवल्याचा कारुण्यमय प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडून कौतुक !
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यांनी या बाल वारकर्यांच्या कला अन् संस्कारांचे विशेष कौतुक केले. या वेळी न्यायमूर्ती मदन गोसावी, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. रामेश्वरजी महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निल्लोडच्या मातीतील या बालकांनी मुंबईच्या राजभवनापर्यंत घेतलेली झेप वारकरी संस्कृतीचा विजय मानला जात आहे.
वारकरी भक्तीचा दरवळ जागतिक स्तरावर !
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ठगनराव भागवत यांनी विशेष संधी उपलब्ध करून दिली. वारकरी अध्यापक ह.भ.प. संदीप महाराज काकडे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पवार, व्यवस्थापक ह.भ.प.गजानन महाराज दिगावकर, संस्था सदस्या शारदा पवार आणि सर्व शिक्षक-कर्मचारी वृंदाने यासाठी परिश्रम घेतले. या सोहळ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची थोरवी आणि हिंदु संस्कृतीचे संस्कार जागतिक स्तरावर पोचत असल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला