सामाजिक चेतनेत होणारे परिवर्तन आणि त्यामुळे उद्भवणारा आगामी आपत्काळ, यासंबंधी ज्योतिषशास्त्रीय विवेचन

‘सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. जागतिक व्यवस्था (world order) पालटत आहे. जागतिक व्यवस्थेत होणारे परिवर्तन, हा केवळ योगायोग नसून समाजाच्या चेतनेत (जागरुकतेत) होणार्‍या पालटांचा तो दृश्य परिणाम आहे. समाजाच्या चेतनेत होणारे परिर्वतन आणि त्याचे आगामी काळात होऊ शकणारे परिणाम, यांचे विवेचन ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या लेखात केले आहे. २६ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘समाजाच्या चेतनेचे तात्त्विक विवेचन’ याविषयी जाणून घेतले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

उत्तरार्ध 

पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1033729.html

२. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून समाजाच्या चेतनेचा प्रवास आणि आगामी काळ यांचे विवेचन

‘सामाजिक चेतनेचा प्रवास हा काळाच्या चौकटीत होत असतो. ग्रह हे काळाचे दर्शक आहेत. ग्रहांमध्ये गुरु, शनि, हर्षल आणि नेपच्यून हे मंदगतीचे ग्रह असल्याने त्यांच्यात होणारे योग (संबंध) हे अनेक वर्षांनी होतात. त्यामुळे ते योग सामाजिक चेतनेत स्थित्यंतरे दर्शवतात. यासंबंधीचे विवेचन आता पाहूया. हे विवेचन सायन ज्योतिषपद्धतीनुसार (टीप) केले आहे.

टीप – सायन ज्योतिषपद्धत : सायन ज्योतिषपद्धतीत राशीचक्राचा आरंभ ‘वसंतसंपात’ या अयनबिंदूपासून करतात. पृथ्वीचा सूर्याभोवतीचा भ्रमणमार्ग (ecliptic) आणि पृथ्वीचे विषुववृत्त (equator) हे एकमेकांना ज्या २ ठिकाणी छेद देतात, त्यांपैकी एका बिंदूला ‘वसंतसंपात’ म्हणतात. संपातबिंदू हा पृथ्वीसापेक्ष असल्याने मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषाचा अभ्यास करण्यासाठी सायन ज्योतिषपद्धत उपयुक्त असते.

२ अ. गुरु आणि शनि यांच्या युतीचे चक्र : गुरु ग्रह अनुमाने १२ वर्षांत आणि शनि ग्रह अनुमाने ३० वर्षांत सूर्याभोवतीचे १ भ्रमण पूर्ण करतो. गुरु आणि शनि यांची प्रत्येक २० वर्षांनी युती होते, म्हणजे ते एकत्र येतात. गुरु आणि शनि यांची युती ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. ही युती समाजाची विचारधारा, मूल्ये, धारणा, चेतनेचा स्तर आदींतील पालट दर्शवते, म्हणजेच ती समाजाच्या आंतरिक स्थितीवर परिणाम करते. त्यामुळे हा परिणाम लगेच दृश्यमान होत नाही; पण तो सूक्ष्म असल्याने प्रभावी असतो आणि अधिक काळ टिकतो.

भारतात सांस्कृतिक पुनरुज्जीवन होणे

वर्ष २०३३ नंतर भारतात सांस्कृतिक पुनरुज्जीवन होईल. हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी संविधानिक, शैक्षणिक, न्यायिक, आर्थिक इत्यादी व्यवस्थांमध्ये सुधारणा होतील. हिंदु धर्माच्या नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांना समाजव्यवस्थेत स्थान मिळेल. धर्म आणि विज्ञान, कर्तव्य अन् अधिकार, श्रद्धा आणि बुद्धीवाद, उत्तरदायित्व अन् स्वातंत्र्य, परंपरा आणि प्रगती यांचा समन्वय साधला जाईल. पुढील २५ वर्षांत भौतिक, मानसिक अन् आध्यात्मिक प्रगती होऊन भारत ‘विश्‍वगुरु’ म्हणून जगात मान्यता पावेल.’

– श्री. राज कर्वे

श्री. राज कर्वे

२ अ १. वर्ष १८०० ते १९८० या कालावधीत गुरु आणि शनि यांची युती ‘पृथ्वीतत्त्वा’च्या राशींमध्ये होणे : गुरु आणि शनि यांची युती अनुमाने १८० वर्षांत एकाच तत्त्वाच्या राशींमध्ये होत असते, उदा. वर्ष १८०० ते १९८० या १८० वर्षांच्या कालावधीत गुरु आणि शनि यांची युती सायन ‘वृषभ’, ‘कन्या’ आणि ‘मकर’ या राशींमध्ये झाली. या तिन्ही राशी ‘पृथ्वीतत्त्वा’च्या आहेत. पृथ्वीतत्त्व हे जडत्व, संकोच, स्थूलता, कठोरता (rigidity) आदी गुणांनी युक्त आहे. त्यामुळे वर्ष १८०० ते १९८० या कालावधीत भौतिकवाद प्रधान होता. औद्योगिकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाची प्रगती होऊन भौतिक विकास साधला गेला. या काळात ब्रिटनसारख्या साम्राज्यवादी शक्तींचे जगावर वर्चस्व होते. अर्थकारण हे जगाच्या केंद्रस्थानी राहिले; मात्र उपभोगवाद वाढून मनुष्याची प्रवृत्ती आत्मकेंद्रित झाली. समाजाचा नैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास मागे पडला.

२ अ २. वर्ष १९८० ते २१६० या कालावधीत गुरु आणि शनि यांची युती ‘वायुतत्त्वा’च्या राशींमध्ये होत असणे : वर्ष १९८० मध्ये गुरु आणि शनि यांची युती सायन तूळ राशीत झाली. तेथून पुढे १८० वर्षे म्हणजे वर्ष २१६० पर्यंत गुरु आणि शनि यांची युती सायन ‘मिथुन’, ‘तूळ’ आणि ‘कुंभ’ या राशींमध्ये होईल. या तिन्ही ‘वायुतत्त्वा’च्या राशी आहेत. वायुतत्त्व हे सूक्ष्मता, पारदर्शकता, विरळता, हलकेपणा आदी गुणांनी युक्त आहे. त्यामुळे २० व्या शतकाच्या शेवटच्या काळात सामाजिक चेतनेत परिवर्तन दिसून आले. ‘इंटरनेट’च्या उदयामुळे जागतिकीकरण झाले. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती झाली. पर्यावरणाच्या रक्षणाविषयी जागृती वाढून अनेक चळवळी उभ्या राहिल्या. भौतिकवादाचा प्रभाव न्यून होऊन अध्यात्माला उर्जितावस्था प्राप्त होत आहे. मानसिक शांती, समाधान, अर्थपूर्ण जीवन आदींकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. पुढील काही दशकांत जगभरात पुढीलप्रमाणे परिर्वतन होऊ शकते.

अ. समाजमनाची जागरुकता आणि संवदेनशीलता वाढत जाईल. आत्मकेंद्रितपणा न्यून होऊन सुसंवाद, सद्भाव आणि संघभाव वाढत जाईल. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (अर्थ : जग एक कुटुंब आहे) या उपनिषदातील घोषाकडे जगाची वाटचाल होईल. ‘प्रेम’ या मूल्याला अधिक महत्त्व प्राप्त होईल. सामाजिक चेतना प्राणमय स्तरावरून मनोमय स्तराकडे मार्गक्रमण करेल.

आ. जागतिक शिक्षणव्यवस्थेत सुधारणा होऊन नैतिक विकास साधणारे आणि जीवनमूल्यांचे ज्ञान देणारे जीवनाभिमुख शिक्षण मिळेल. स्वैराचार आणि स्वच्छंदता न्यून होऊन विवेक अन् जागरुकता वाढेल.

इ. निसर्गाला ओरबाडण्याची प्रवृत्ती पालटून निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी कार्यवाही होईल. नवीन तंत्रज्ञानाद्वारे शाश्‍वत ऊर्जेचा (sustainable energy) वापर प्रधान होईल.

ई. धार्मिक विचारधारांमध्ये व्यापकता येईल. संकुचितपणा, द्वेष आणि कट्टरता यांना खतपाणी घालणार्‍या धार्मिक विचारधारा आणि व्यवस्था शक्तीहीन होतील.

उ. केवळ भौतिक स्तरावरील संशोधन न होता मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील संशोधनाला गती येईल. त्यामुळे विश्‍वासंबंधी असलेल्या आकलनात मूलभूत पालट होईल.

ऊ. अध्यात्माचे महत्त्व पुष्कळ वाढेल. सत्य, ज्ञान, प्रीती, व्यापकता आदी वैश्‍विक तत्त्वांकडे लोक आकर्षित होऊन अध्यात्माला दैनंदिनी जीवनात आचरण्याचा प्रयत्न करतील.

२ आ. शनि आणि हर्षल यांची युती : शनि ग्रह अनुमाने ३० वर्षांत आणि हर्षल ग्रह अनुमाने ८४ वर्षांत सूर्याभोवतीचे १ भ्रमण पूर्ण करतो. शनि आणि हर्षल यांची प्रत्येक ४५ वर्षांनी युती होते, म्हणजे ते एकत्र येतात. शनि ग्रह हा सामाजिक व्यवस्था आणि हर्षल ग्रह नाविन्यता अन् उत्क्रांती यांचा कारक आहे. त्यामुळे शनि आणि हर्षल यांची युती क्रांतीकारी असते. युद्धे, क्रांती, चळवळी, राजकीय स्थित्यंतरे येऊन जागतिक व्यवस्था पालटते. हा परिणाम दृश्यमान असतो.

२ आ १. वर्ष १९४२ मध्ये झालेली शनि आणि हर्षल यांची युती : २० व्या शतकात शनि आणि हर्षल यांची युती वर्ष १९४२ मध्ये झाली होती. हा दुसर्‍या महायुद्धाचा काळ होता. दुसर्‍या महायुद्धामध्ये जगभरात एकूण ६ कोटींहून अधिक सैनिक आणि नागरिक यांचा मृत्यू झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिक व्यवस्था पालटली. जागतिक शक्तीचे केंद्र युरोपकडून ‘अमेरिका’ आणि ‘सोव्हिएत रशिया’ यांच्याकडे सरकले. ब्रिटन, फ्रान्स यांसारख्या साम्राज्यवादी शक्ती कोसळून भारत, इंडोनेशिया, श्रीलंका आदी अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली.

२ आ २. वर्ष १९८८ मध्ये झालेली शनि आणि हर्षल यांची युती : वर्ष १९४२ नंतर शनि आणि हर्षल यांची युती वर्ष १९८८ मध्ये झाली. या काळाच्या सुमारास ‘अमेरिका’ आणि ‘सोव्हिएत रशिया’ यांच्यातील शीतयुद्धाचा शेवटचा चरण चालू होता. त्यामध्ये रशियाचा पराभव होऊन त्याचे १५ तुकडे झाले. यानंतर २ दशके ‘अमेरिका’ ही एकमेव महासत्ता राहिली. साम्यवाद आणि एकाधिकारशाही यांचे वर्चस्व न्यून होऊन भांडवलशाही अन् लोकशाही प्रधान झाली. २१ व्या शतकात चीन, भारत, ब्राझील आदी उदयोन्मुख देशांची शक्ती वाढून जागतिक शक्तीचे केंद्र विखुरले गेले.

२ आ ३. वर्ष २०३२ मध्ये होणारी शनि आणि हर्षल यांची युती : आता शनि आणि हर्षल यांची पुढील युती वर्ष २०३२ मध्ये होणार आहे. त्या अगोदर वर्ष २०२८ ते २०३१ या कालावधीत गुरु आणि शनि यांचा प्रतियोग (परस्परांच्या समोर येणे) होणार आहे. थोडक्यात वर्ष २०२८ ते २०३२ या काळात गुरु, शनि आणि हर्षल या तिन्ही ग्रहांचे परस्परांशी महत्त्वाचे योग होणार आहेत. हा काळ जागतिक स्तरावर मोठी स्थित्यंतरे दर्शवतो. या काळात होणारे संभाव्य परिणाम पुढे दिले आहेत.

२ आ ३ अ. शक्तीशाली देशांमधील सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता : वर्ष २०२० मध्ये सायन कुंभ राशीत गुरु आणि शनि यांची युती झाली. तेव्हापासून जागतिक सत्तासंघर्षाने गती पकडली आहे. वर्ष २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण, वर्ष २०२४ मध्ये बांगलादेश आणि वर्ष २०२५ मध्ये नेपाळ येथे घडवले गेलेले सत्तांतर, वर्ष २०२६ मध्ये अमेरिकेने इराणवर केलेले आक्रमण, तसेच व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना केलेली अटक इत्यादी घटना अमेरिका, चीन, रशिया आदी देशांमधील सत्तासंघर्ष अधोरेखित करत आहेत. हा सत्तासंघर्ष पुढील ५-६ वर्षांत तीव्र होत जाईल. हे देश नैसर्गिक ऊर्जासाठे आणि दुर्मिळ खनिजे असणार्‍या दुर्बल देशांवर आक्रमण करतील, तसेच भौगोलिकदृष्ट्या महत्त्व असणार्‍या देशांमध्ये छद्म युद्धे (proxy wars) घडवतील. त्यामुळे तेथे अराजकता माजून नागरिकांना इतरत्र पलायन करावे लागेल. हे देश अन्य विकसनशील देशांना स्वतःच्या बाजूला आणण्यासाठी दबाव आणतील, तसेच त्यांच्या विकासात अडथळे आणतील. थोडक्यात पुन्हा शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल.

भारतासाठी आव्हानात्मक काळ

पुढील ५-६ वर्षे भारतासाठी आव्हानात्मक असतील. अमेरिका, चीन इत्यादी जागतिक शक्ती भारतावर दबाव आणून त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतील. भारताची कोंडी करून त्याच्या विकासात अडथळे आणतील. जागतिक शक्ती पाकिस्तानला माध्यम करून भारतावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे भारतातील अंतर्गत विघातक शक्ती देशात यादवी माजवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे भारताला पुढच्या काळात सावधपणे पावले टाकणे महत्त्वाचे असेल, तसेच जनतेला जागरूक आणि संघटित रहावे लागेल.

– श्री. राज कर्वे

२ आ ३ आ. सामान्य नागरिकांना आपत्काळाची मोठी झळ बसणे : या सत्तासंघर्षात आधुनिक शस्त्रास्त्रे, माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचा वापर, तसेच ऊर्जासाठ्यांवर ताबा, आर्थिक नाकेबंदी, व्यापार-प्रतिबंध, राजकीय दबाव आदी रणनीतींचा अवलंब होत आहे. हा संघर्ष केवळ भूमी ताब्यात घेण्यापुरता मर्यादित नसून ऊर्जा, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, सामाजिक माध्यमे, लोकांची विचारसरणी आदी सर्व घटकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चालू आहे. त्यामुळे पुढील ५-६ वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा दुष्परिणाम होईल. अन्न, पाणी, इंधन, वीज, दळणवळण, संपर्कयंत्रणा आदी जीवनावश्यक गोष्टींचा दीर्घकालीन तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी इत्यादी वाढेल. सततच्या अस्थिरतेमुळे भीती, ताण आणि चिंता निर्माण होऊन लोकांचे मनोबल न्यून होईल. थोडक्यात सामान्य माणसालाही या आपत्काळाची मोठी झळ बसेल.

२ आ ३ इ. वर्ष २०३२ नंतर नवीन जागतिक व्यवस्थेचा उदय होणे : शक्तीशाली देशांमध्ये चालू असलेला हा सत्तासंघर्ष निर्णायक ठरणार नाही. वर्ष २०३२ मध्ये शनि आणि हर्षल यांची युती सायन मिथुन राशीच्या शेवटी आणि कर्क राशीच्या आरंभी (म्हणजे संधीवर) होणार आहे. ‘कर्क’ ही जलतत्त्वाची आणि चर स्वभावाची (नवनिर्मिती करणारी) रास आहे. त्यामुळे वर्ष २०३२ नंतर नवीन जागतिक व्यवस्था (world order) जन्म घेईल. अमेरिकेचे जागतिक वर्चस्व न्यून होईल. कोणताही एकटा देश महासत्ता रहाणार नाही. जागतिक व्यवस्था बहुधुव्रीय (multipolar) आणि जटील होईल. प्रत्येक देशाला ऊर्जा, सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान आदींसाठी वेगवेगळ्या देशांशी संबंध ठेवावे लागतील. जागतिक शक्तीचे केंद्र विखुरले जाईल.

हा संकटकाळ म्हणजे मानवजातीसाठी नियतीचा एक धडा असेल. मनुष्याने ‘वर्चस्व, अधिकार आणि सत्ता’ ही संकुचित मूल्ये त्यागून ‘सहकार्य, सामंजस्य, संवदेनशीलता, सहानुभूती अन् सद्भाव’ ही व्यापक मूल्ये आत्मसात केली, तरच पुढील काळात त्याची प्रगती होईल.

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२६)-

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.