सामाजिक चेतनेत होणारे परिवर्तन आणि त्यामुळे उद्भवणारा आगामी आपत्काळ, यासंबंधी ज्योतिषशास्त्रीय विवेचन

‘सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. जागतिक व्यवस्था (world order) पालटत आहे. जागतिक व्यवस्थेत होणारे परिवर्तन, हा केवळ योगायोग नसून समाजाच्या चेतनेत (जागरूकतेत) होणार्‍या पालटांचा तो दृश्य परिणाम आहे. समाजाच्या चेतनेत होणारे परिर्वतन आणि त्याचे आगामी काळात होऊ शकणारे परिणाम, यांचे विवेचन ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या लेखात केले आहे.

(पूर्वार्ध)

१. समाजाच्या चेतनेचे तात्त्विक विवेचन

१ अ. समाजाच्या चेतनेची २ अंगे : एका व्यक्तीचे अस्तित्व जसे त्याच्या व्यक्तीगत चेतनेवर आधारलेले असते, तसेच समाजाचे अस्तित्व सामूहिक (collective) चेतनेवर आधारलेले असते. सामूहिक चेतनेची २ अंगे आहेत – आंतरिक आणि बाह्य.

१ अ १. आंतरिक अंग : समाजाच्या आंतरिक अंगामध्ये लोकांची प्रवृत्ती, संस्कार, विचारसरणी, जीवनाकडे पहायचा दृष्टीकोन, श्रद्धा, नैतिकतेच्या धारणा, सत्याविषयीचा बोध आदी घटक अंतर्भूत असतात. हे घटक समाजमनात रुजलेले असतात. ते गुप्त आणि अदृश्य असतात.

१ अ २. बाह्य अंग : समाजाच्या बाह्य अंगामध्ये विविध प्रकारच्या व्यवस्था अंतर्भूत असतात, उदा. राजकीय, धार्मिक, आर्थिक, न्यायिक, शैक्षणिक इत्यादी. या व्यवस्था दृश्य असतात. त्यांचा वस्तूनिष्ठ अभ्यास करता येतो. त्यांच्या संरचनेत किंवा नियमावलीत पालट करता येतो.

१ आ. समाजाच्या चेतनेची कार्यप्रणाली

१ आ १. समष्टीची चेतना उन्नत होण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक ! : चेतना व्यक्तिगत किंवा सामूहिक असो, ती सतत उत्क्रांत (उन्नत) होण्यासाठी धडपडत असते. तो तिचा नैसर्गिक स्वभावच आहे. तिच्या उन्नतीची दिशा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, संकुचिततेकडून व्यापकतेकडे, संघर्षाकडून संवादाकडे, द्वेषाकडून प्रीतीकडे, पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे, भेदाकडून अभेदाकडे आणि जडाकडून चैतन्याकडे, अशी असते; मात्र चेतनेचा हा प्रवास एका सरळ रेषेत नसून तो गोलाकार पायर्‍यांप्रमाणे (spiral) असतो, म्हणजे ‘चेतनेची सतत उन्नतीच होते, असे नाही’, तर मध्ये-मध्ये तिची अवनतीही होत असते; पण त्या अवनतीमुळेच उन्नतीचा पुढील मार्ग गवसतो. जोपर्यंत चेतना पुढच्या टप्प्याला जाण्यास सक्षम होत नाही, तोपर्यंत ती आहे त्याच स्तरावर गोल फिरत रहाते.

१ आ २. समाजाच्या आंतरिक चेतनेचे बाह्य व्यवस्थांकडून दमन झाल्यास काळाच्या ओघात त्या व्यवस्था मोडकळीस येणे : समाजाची आंतरिक स्थिती आणि बाह्य व्यवस्था या एकमेकांना प्रभावित करतात. साधारणपणे समाजाच्या आंतरिक स्थितीला अनुसरून बाह्य व्यवस्थांना आकार प्राप्त होत असतो. समाजाच्या आंतरिक चेतनेचे बाह्य व्यवस्थांकडून दमन झाले किंवा समाजाची पालटत असलेली मूल्ये, विचारसरणी, धारणा आदींना बाह्य व्यवस्थांकडून प्रतिबंध होत राहिला, तर काळाच्या ओघात त्या व्यवस्था मोडकळीस येतात. समाजाची आंतरिक स्थिती आणि बाह्य व्यवस्था यांच्यात असलेला तणाव हा संघर्ष, क्रांती, स्थित्यंतरे आदींच्या रूपाने व्यक्त होतो. इतिहासात नेहमी असे घडत असल्याचे लक्षात येते, उदा. भारतियांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभारला; कारण ब्रिटिशांनी भारतीय चेतनेचे दमन करून तिला पारतंत्र्य, संकुचित, विभाजित, अशक्त आणि अपमानित केले होते. भारतियांनी स्वातंत्र्य मिळवले, म्हणजे भारताच्या दडपलेल्या चेतनेला मुक्त केले.

१ इ. सद्यःस्थितीतील समाजाच्या चेतनेचा मागोवा

श्री. राज कर्वे

१ इ १. युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती होऊन आधुनिक युगाचा झालेला आरंभ : ‘सध्याच्या जागतिक चेतनेची सद्यःस्थिती काय आहे ?’, याचा मागोवा घेऊया. १६ व्या शतकात युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती होऊन आधुनिक युगाचा आरंभ झाला. युरोपमधील वैज्ञानिक क्रांती हा योगायोग नव्हता, तर त्याला मध्ययुगाची सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत होती. मध्ययुगातील समाज हा परंपराकेंद्रित होता. धर्म, शास्त्र, परंपरा, रूढी आदींचे पालन करण्याला जीवनात सर्वाधिक महत्त्व होते. धर्मसत्ता आणि सरंजामशाही प्रचलित होती.

मध्ययुग हे १५-१६ व्या शतकापर्यंत चालले. मध्ययुगाच्या शेवटच्या काही शतकांमध्ये जगभरात धार्मिक अवडंबरे माजली. धर्म सत्त्वहीन होऊन अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा फोफावल्या. सत्तेचा आणि धर्माचा बलपूर्वक विस्तार करण्यातून वारंवार युद्ध, अत्याचार, नरसंहार इत्यादी होत असत. नवीन संशोधन, तत्त्वज्ञान, सत्यदर्शन आदींना वाव मिळेनासा झाला. स्त्रियांचे समाजातील स्थान कनिष्ठ दर्जाचे झाले. यामुळे दमन झालेल्या जागतिक चेतनेला वैज्ञानिक क्रांतीच्या रूपाने उन्नतीचा मार्ग मिळाला.

१ इ २. वैज्ञानिक क्रांतीमुळे मानवजातीला झालेले लाभ : वैज्ञानिक क्रांतीमुळे सृष्टीची भौतिक सत्ये मानवाला वस्तूनिष्ठपणे कळाली. त्यामुळे समाजाचा विश्वाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला. दैववाद मागे पडून बुद्धीवाद पुढे आला. बर्‍याच अंधश्रद्धा दूर झाल्या. अनेक अनिष्ट रूढी बंद झाल्या. स्त्रियांची सामाजिक स्थिती सुधारली. स्वातंत्र्य, समता, सहभाग, मानवी हक्क आदी मूल्ये प्रधान झाली. या मूल्यांना आश्रय देणारी ‘लोकशाही’ ही राज्यव्यवस्था उदयास आली. भौतिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे तंत्रज्ञान विकसित झाले. त्यातून औद्योगिकरण जन्माला आले. जगभरात दळणवळण आणि संदेशवहन (communication) यांची साधने उपलब्ध झाल्याने जागतिकीकरण झाले.

मध्ययुगात ज्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या आधुनिक युगात सुटल्या; परंतु कोणतीही नवीन स्तराची चेतना जन्म घेतांना तिच्या मर्यादांसहित जन्म घेत असते. आधुनिक युग हे त्याच्या मर्यादांसहितच जन्माला आले. त्याच्यामुळे मानवजातीला जसे मोठे लाभ झाले, तसे मोठे दुष्परिणामही झाले.

१ इ ३. आधुनिक युगात मानवजातीची झालेले हानी : आधुनिक युगात बुद्धीवादाचा अतिरेक झाला. ईश्वर, आत्मा, धर्म, अध्यात्म, साधना आदींना सरसकट थोतांड समजले गेले. ‘सर्व सृष्टीच्या मुळाशी जडपदार्थ (matter) आहे आणि चैतन्य (spirit) हा भ्रम आहे’, अशी धारणा बनली. त्यामुळे जीवनाचा उद्देश हरवला. ‘कशासाठी जगायचे ? कोणत्या ध्येयाकडे जायचे ?’, हे न कळल्याने दिशाहीनता आली. त्यामुळे मनुष्याची प्रवृत्ती संकुचित, स्वार्थी, सुखासक्त आणि आत्मकेंद्रित झाली. ‘पैसा’ आणि ‘सत्ता’ हीच मूल्ये जगाच्या केंद्रस्थानी आली. प्रेम, सद्भाव, सामाजिक बांधीलकी, व्यापकता, पवित्रता, नैतिकता आदी मूल्यांचा र्‍हास झाला. कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली. मनुष्य समाजापासून विलग होऊन एकाकी झाला. वाढत्या औद्योगिकरणामुळे निसर्गाची प्रचंड हानी झाली. प्रदूषण अनियंत्रितपणे वाढल्याने जागतिक हवामान पालटले. कित्येक वनस्पती आणि पशू-पक्षी यांच्या प्रजाती लुप्त झाल्या. मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम झाला. सध्या मनुष्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सामाजिक चेतनेचे मध्ययुगातून आधुनिक युगात झालेले संक्रमण, हा चेतनेच्या विकासासाठी एक आवश्यक टप्पा होता; पण आता आधुनिक युगाच्या मर्यादा स्पष्ट दिसत आहेत. सध्याच्या काळात भौतिक, तांत्रिक, आर्थिक आणि बौद्धिक विकास पुष्कळ झाला; परंतु नैतिक, सामाजिक, मानसिक अन् आध्यात्मिक विकास मागे पडून असंतुलन निर्माण झाले. त्यामुळे आता सामाजिक चेतना आणखी पुढच्या स्तरावर संक्रमण करण्याच्या प्रयत्नांत आहे.’

  (क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२६)

उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1036218.html