Stolen Antiquities Of India : अमेरिकेने भारताला परत केल्या चोरीच्या ६५७ प्राचीन मूर्ती !

नवी देहली – अमेरिकेने भारतीय मूळच्या ६५७ दुर्मिळ आणि प्राचीन मूर्ती भारताला परत केल्या आहेत. या मूर्तींचे मूल्य अनुमाने १२० कोटी रुपयांहून अधिक आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय तस्कर टोळ्यांनी या मूर्तींची तस्करी करून त्या अमेरिकेत नेल्या होत्या. मॅनहॅटन जिल्हा ॲटर्नी कार्यालयाने तस्करीच्या अन्वेषणानंतर या कलाकृती भारताला परत करण्याची घोषणा केली. या मूर्ती भारताला सुपुर्द केल्याने आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याशी संबंधित एका मोठ्या ‘सांस्कृतिक चोरी’चा खुलासा झाला आहे. तस्कर सुभाष कपूर आणि नॅन्सी विनर यांच्याशी संबंधित गुन्हेगारी टोळ्यांच्या चालू  असलेल्या अन्वेषणाच्या वेळी अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी या मूर्ती जप्त केल्या होत्या. महावाणिज्य आयुक्त म्हणाले की, चोरी झालेल्या कलाकृती भारतात परत आणण्यासाठी अजून बरेच काम करणे शेष आहे. अमेरिकेकडून भारताला परत मिळालेल्या या कलाकृतींविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पोस्ट केले आहे.

कोणत्या मूर्तींचा आहे समावेश ?

१. अवलोकितेश्वराची एक कांस्य प्रतिमा – ही प्रतिमा रायपूरच्या महंत घासीदास स्मारक संग्रहालयात ठेवली होती. वर्ष १९८२ मध्ये ती चोरून अमेरिकेत नेण्यात आली. वर्ष २०२५ मध्ये न्यूयॉर्कमधील एका खासगी संग्रहातून ती जप्त करण्यात आली.

२. लाल वाळूच्या दगडातील बुद्ध मूर्ती : तस्कर सुभाष कपूरच्या तस्करांच्या जाळ्याद्वारे ही  मूर्ती न्यूयॉर्कला नेण्यात आली होती.

३. मध्यप्रदेशातील एका मंदिरातून वर्ष २००० मध्ये लुटलेली नृत्य करणार्‍या गणेशाच्या वाळूच्या दगडातील मूर्तीलाही परत करण्यात आले आहे.