निश्चय आणि श्रद्धेची परीक्षा घेणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे वर्ष २०१६ मधील हरिद्वारचे कठीण अनुष्ठान !

‘वर्ष १९७५ पासून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची साधना चालू आहे, ती साधकांना त्यांचे गुरु विष्णुरूपी ‘भगवान आनंदस्वामीजी हिमालयवासी’ यांचे दर्शन घडवण्यासाठी ! ‘दादाजींच्या या प्रयत्नात आपलाही ‘खारी’चा सहभाग असावा’, अशी साधकांची इच्छा होती. त्यातून एक समूह पुढे आला. त्यांनी १२.११.२०१६ ते ४.१२.२०१६ या कालावधीत असे २३ दिवस श्रीक्षेत्र हरिद्वार येथे उग्र साधना केली, त्याचा हा वृत्तांत !

१ मे या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग येथे दिला आहे.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1035468.html

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

३. प्रचंड थंडी आणि झोंबरे वारे अशा प्रतिकूल परिस्थितीत अनुष्ठानास प्रारंभ होणे

३ ऐ. दिवसेंदिवस कष्टप्रद असणारी साधना

१. अकराव्या दिवसापासून १५ व्या दिवसापर्यंत विशेष काही घडले नाही. साधना दिवसेंदिवस अधिकच कष्टप्रद होत होती. कुणीही चेष्टा-मस्करी करत नव्हते. रात्री भोजनानंतर आपापल्या खोलीत विश्रांती घेत होते. शरीर आणि मन यांचा कस लागत होता. त्याचसमवेत एक निश्चिती होती की, हे अनुष्ठान दादाजीच आपल्याकडून पूर्ण करून घेणार आहेत.

२. २८.११.२०१६ हा दिवस साधनेचा १७ वा दिवस होता. आज सूर्य ७.३० वाजताच उगवला खरा; पण ९.३० पर्यंत ढगाआड होता. हवेत विलक्षण गारवा होता. प्रतिदिन निश्चयाने प्रारंभ करायचो; पण थंड पाणी, वारे, थंडी यांचा त्रास सहन होईनासा झाला की, मनाची चलबिचल व्हायची. जणू आमची सत्त्वपरीक्षाच चालू होती. आज पाणीही पुष्कळच थंड होते. दादाजींनी कमी खोल पाण्यात उभे रहायला, ‘जलजपा’ नंतर शेकोटी पेटवण्यास आणि एक अधिक चहा पिण्यास अनुमती दिली.

त्या दिवशी दोन साधकांचे तळपाय पुष्कळ दुखत होते. दादाजींनी त्यांना नदीच्या काठावर टॉवेलची घडी घालून त्यावर उभे राहून जप करण्यास सांगितले. आजही आम्हाला सर्पराज दिसले.

३. २९.११.२०१६ हा साधनेचा १८ वा दिवस होता. आज समजले की, ५ डिसेंबरच्या डेहराडून – मुंबई विमानाच्या तिकिटांचे आरक्षण झाले आहे; कारण पुढे आठवडाभर गाड्यांना गर्दी होती. साधना कष्टप्रद वाटू लागली.

४. ३०.११.२०१६ या दिवशी जप करतांना पुष्कळ त्रास झाला. भूमीवरील जपाचे वेळी थंडीने अंग थरथरू लागल्यावर दोन मिनिटे एकमेकांच्या पाठीला मर्दन केले.

५. १.१२.२०१६ जपाचा २० वा दिवस होता. अनुष्ठानाला १९ दिवस झाले होते. विलक्षण शारीरिक अन् मानसिक दमछाक झाली होती. जशी साधना अंतिम टप्प्यात येऊ लागली, तसे मनात तामसिक विचार येऊ लागले. षड्विकार त्रास देऊ लागले. सर्व जण निश्चयाने उभे होते. हे १९ दिवस स्वप्नवत् गेले. खरे तर प्रतिकूल परिस्थितीत एक एक दिवसही काढणे अवघड होते; पण इथे तर १९ दिवस झाले होते. अक्षरशः खरे वाटत नव्हते की, या परिस्थितीत आपण १९ दिवस टिकलो. हासुद्धा एक चमत्कारच होता.

६. आता अनुष्ठानाला दोनच दिवस शेष राहिले. दादाजींनी अनुमती दिल्यापासून जलपानानंतर शेकोटी पेटवत होतो. आज थंडीने कहर केला. बोचरे वारे विलक्षण वेगाने वहात होते. वर बर्फ वितळल्याची बातमी आली.

सकाळी जमिनीवरील जपाला प्रारंभ केला आणि दादाजींचा भ्रमणभाष आला. आज सर्व साधना ‘अंडरपँट’वर खोलीतच बसून करा. आम्हाला आनंद झाला; पण आश्रमाचे बांधकाम जुन्या पद्धतीचे होते. त्यामुळे दरवाजा आणि खिडकी यांच्या फटींतून झोंबरे वारे येत होते. त्या थंडीतच दिवस पार पडला. शेवटचे दोनही दिवस दादाजींनी खोलीतच साधना करण्यास अनुमती दिली. दोनही दिवस तुलनात्मकदृष्ट्या जप छान झाला.

४. दादाजींच्या साक्षात्कारी अनुभवांपैकी सर्वाेत्तम अनुभव म्हणजे हरिद्वारचे अनुष्ठान !

४ अ. संघभावनेचा परिणाम लक्षात येणे : या साधनेचा आणखी एक अनुभव म्हणजे प्रत्येक जण दुसर्‍याची काळजी घेत होता. एकमेकांना सांभाळून पुढे जात होते. एक प्रकारच्या भावनिक बंधनाने आम्ही एकत्र आलो होतो. संघभावनेने केलेले कार्य कसे परिणामकारक होते, याचे हे एक उत्तम उदाहरणच आहे.

४ आ. दादाजींवरील श्रद्धेच्या बळावर अनुष्ठान पार पडणे : आम्ही संसारी साधक आहोत. आमच्या तुटपुंज्या क्षमतेनुसार; पण दादाजींवरील श्रद्धेच्या बळावर हे अनुष्ठान यथाशक्ती पार पाडले. ‘गुरुकृपा काय असते ?’ आणि तिच्या अमर्याद शक्तीचा पुन्हा प्रत्यय आला.

‘दादाजींनी हिमालयात काय, कशी आणि किती साधना केली असेल’, याची आम्हाला झलक दिसली. ‘साधना’ या शब्दाचा थोडा फार अर्थ समजला.

हे अनुष्ठान म्हणजे दादाजींच्या आजपर्यंतच्या साक्षात्कारी अनुभवांपैकी सर्वाेत्तम अनुभव !’

(समाप्त)

लेखक : श्री. दिवाकर फडके, ठाणे (वर्ष २०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक