भारत संरक्षणक्षेत्रात सर्वाधिक खर्च करणार्‍या देशांच्या सूचीत ५ व्या क्रमांकावर !

अर्थसंकल्पात ८.९ टक्क्यांची वाढ !

नवी देहली – संरक्षण अर्थसंकल्पात ८.९ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे भारत आता जगातील संरक्षणक्षेत्रात सर्वाधिक खर्च करणार्‍या देशांच्या सूचीत ५व्या क्रमांकावर पोचला आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (‘एस्.आय.पी.आर्.आय.’ने) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी जागतिक संरक्षण खर्च विक्रमी २.८९ ट्रिलियन डॉलर्सवर (अनुमाने २७४ लाख कोटी रुपयांवर) पोचला. या सूचीत भारत ९२.१ अब्ज डॉलर्स (अनुमाने ८ लाख ७३ हजार १७९ कोटी रुपये) खर्चासह २०२५ मध्ये ५व्या क्रमांकावर पोचला.

जागतिक संरक्षण खर्चात आघाडीवर असलेल्या पहिल्या ५ देशांमध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर चीन दुसर्‍या, रशिया तिसर्‍या, जर्मनी चौथ्या आणि भारत ५व्या क्रमांकावर आहे. या ५ देशांनी मिळून एकूण जागतिक संरक्षण खर्चाचा ५८ टक्के वाटा उचलला आहे. ही रक्कम १.६ ट्रिलियन डॉलर्स (अनुमाने १५१ लाख ६९ हजार कोटी रुपये) इतकी आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण खर्चातही वाढ !

२०२५ मध्ये पाकिस्तानचा संरक्षण खर्च ११ टक्क्यांनी वाढून ११.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर (अनुमाने १ लाख १२ हजार ८२६ कोटी रुपयांवर) पोचला आहे. भारताशी झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर पाकिस्तानने चीनकडे विमाने आणि क्षेपणास्त्रे खरेदीविषयी केलेला करार, हे या वाढीचे मुख्य कारण आहे.