Iran New Proposal : अमेरिकेने आमच्या अणू कार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडल्यास हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडू ! – इराण

इराणने अमेरिकेसमोर शांतता प्रस्ताव मांडला !

(सामुद्रधुनी म्हणजे दोन मोठ्या जलसाठ्यांना (उदा. समुद्र, महासागर) जोडणारा अरुंद जलमार्ग)

तेहरान (इराण) – अमेरिकेने जर आमच्या अणू कार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडला, तर आम्ही हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडू, असा प्रस्ताव इराणने अमेरिकेसमोर पाकिस्तानच्या माध्यमातून ठेवला. या शांतता प्रस्तावात ३ सूत्रे असून पहिला अणू कार्यक्रमावर बंदी घालण्याचा हट्ट सोडणे, दुसरा संपूर्ण युद्धविराम आणि भविष्यात अमेरिका-इस्रायलकडून सैनिकी कारवाई रोखण्याची हमी देणे, तर तिसरा प्रस्ताव हॉर्मुझमधून अमेरिकेच्या सैन्याने केलेली नाकाबंदी संपवणे हा आहे. या तिन्ही सूत्रांवर टप्प्याटप्प्याने काम व्हावे, अशी अपेक्षा इराणने व्यक्त केली आहे. यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, इराणला त्यानेच बंद केलेली हॉर्मुझ सामुद्रधुनी सर्वांत आधी उघडावी लागेल.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पुतिन यांची भेट !

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी २७ एप्रिलला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. या भेटीत रशियाने इराणला खंबीर पाठिंबा व्यक्त केला.

रशियाच्या माध्यमांनुसार या वेळी पुतिन म्हणाले की, इराणी जनता धैर्याने आणि शौर्याने स्वातंत्र्यासाठी अन् सार्वभौमत्वासाठी लढत आहे. मला इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याकडून एक संदेश मिळाला आहे.

डॉनल्ड ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षा पथकासमवेत बैठक घेणार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प हे लवकरच त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकासमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत इराणसमवेतचा सध्याचा तणाव, रखडलेल्या वाटाघाटी आणि भविष्यातील रणनीती, यांविषयी चर्चा केली जाईल. या बैठकीत इराणवर पुन्हा बाँब आक्रमणे चालू करण्याच्या पर्यायावरही चर्चा होऊ शकते.