संपादकीय : पुन्हा एकदा शिव-समर्थद्वेष !

समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा अनमोल क्षण…

महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात आलेले बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील गुरु-शिष्याचे सुंदर नाते लक्षात आणून देण्यासाठी एक कथा काय सांगितली ! झाले ! बिळात लपून बसलेले समर्थद्वेषी, हिंदु धर्मद्वेषी फुत्कार सोडत बाहेर आले आणि नेहमीप्रमाणे ‘यांना खपवून घेणार नाही, यांची हिंमत कशी होते ? ते मूर्ख, बिनडोक आहेत’ इत्यादी बाष्कळ बडबड करू लागले. जणू काही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी पुष्कळ मोठे चुकीचे आणि अजब विधान केले. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी तर भारताची दैवी गुरु-शिष्य परंपरेची योग्यता, क्षमता या कथेतून दाखवून देत या परंपरेचाच एक प्रकारे गौरव केला आहे; पण हे समजणार कुणाला ? जे हिंदु धर्मातील प्रथा, चालीरिती, गुरु-शिष्य परंपरा यांना मानतच नाहीत, त्यांनी टीका करावी ? असो, या निमित्ताने महाराष्ट्रावर थोपवलेल्या जुन्या वादाविषयी भाष्य करण्याची ही संधी विरोधकांनी दिली आहे.

भारतवर्षात जे राजे, महाराजे, दैवी पुरुष, कर्तृत्ववान व्यक्ती झाल्या, त्यांनी कुणाच्या ना कुणाच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचा इतिहास पालटणारे महान राजे ! त्यांना त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच ईश्वरी अधिष्ठान, दैवी बळ यांची आवश्यकता भासल्याने त्यांनी समर्थ रामदासस्वामी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. युद्धकलेचे ज्ञान दादोजी कोंडदेव यांच्याकडून घेतले, त्याचप्रमाणे अध्यात्म-धर्म यांचे ज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याकडून घेतले. याविषयी समकालीन संदर्भही आढळतात; मात्र समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव ठरले ब्राह्मण समाजातील ! झाले ! येथेच ब्रिगेडी विचारसरणीला ‘शॉक’ बसतो.

ब्राह्मण आणि हिंदु समाज लक्ष्य !

हा मुख्य म्हणजे वाद नसून त्याला सामाजिक आणि जातीय किनार आहे. ‘विसाव्या शतकाच्या प्रारंभीपासून काही इतिहासकारांनी समर्थांना महाराजांचे गुरु ठरवून स्वराज्याचे श्रेय एका विशिष्ट वर्गाकडे नेण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप बहुजन संघटनांकडून केला जातो. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष आणि संघटना स्वत:ची विचारसरणी प्रस्थापित करण्यासाठी या वादाचा वेळोवेळी वापर करतात. अलीकडच्या काळात काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. म्हणजे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांपेक्षा ब्राह्मणवर्गाला अन् त्या आडून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. महाराष्ट्रात आणि देशात गत काही दशकांपासून ‘उच्च जातीने खालच्या जातीवर अन्याय केला; म्हणून खालच्या जातींचा विकास झाला नाही, ते उपेक्षित राहिले’, असे सतत सांगून खालच्या जातींना संरक्षण, सवलती, आरक्षण वगैरे देण्यात आले. त्यामुळे खालच्या जातींतील लोक मूळ प्रवाहात आले, त्यांना चांगले सामाजिक-राजकीय स्थान प्राप्त झाले.

आता त्यांच्या स्थानाला धक्का लागू नये आणि उच्च जातीचे महत्त्वच राहू नये, अशी व्यवस्था असणार्‍या हिंदु धर्माचेही विशेष नाव होऊ नये, असे ब्रिगेडी विचारसरणीला वाटते. त्यामुळे उच्च जातींपैकी ब्राह्मण वर्गातील जो कुणी असेल, मग तो क्रांतीकारक, समाजसुधारक, संत, शासक, प्रशासक इत्यादी असला आणि भारतासाठी कितीही चांगले काम केलेले असले, तरी त्याच्यावर खोटेनाटे आरोप करून, त्याला अपमानीत करून, त्याला मुलांच्या पाठ्यपुस्तकापासून ते त्यांचे विचार मांडण्याला कोणतेही व्यासपीठ मिळू नये, यासाठी धडपडायचे, अशी खेळी ब्रिगेडी विचारसरणीने काही दशके महाराष्ट्रात केली आहे. या खेळीमुळेच उलट जातीयवाद वाढला आहे आणि इतिहास भरकटवला जात आहे. इतिहासातील तथ्यांपेक्षा स्वत:च्या सोयीनुसार इतिहासलेखन काही ब्रिगेडी विचारसरणीने केले आहे. या ब्रिगेडींनी म्हणे हिंदु धर्माला पर्याय म्हणून ‘शिवधर्म’ नावाने नवीन धर्म निर्माण करण्याचाही हास्यास्पद आणि केविलवाणा प्रयत्न केला; मात्र हिंदु धर्मातील तेजस्वीता, चैतन्य आणि मुख्य म्हणजे हिंदूंनीच या प्रयत्नांवर लत्ताप्रहार करत ब्रिगेडींचे षड्यंत्रच नेस्तनाबूत केले. आज ब्राह्मणद्वेषाआडून हिंदु धर्मावर आघात करू पहाणारे कुठे आहेत ? त्यांना तोंड दाखवायलाही जागा नाही. कुणावर शाईफेक होत आहे, कुणावर फसवणुकीचे आरोप होत आहेत, कुणी मार खात आहेत, कुणाची बोबडीच वळली आहे; म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रात जातीय द्वेषाचे राजकारण केले, त्यांचेच हात-पाय पोळून निघत आहेत; मात्र त्यांनी हिंदु मनामनांत भिनवलेल्या विषाचे काय ? सातारा येथे ‘शिवसमर्थ शिल्पा’चे अनावरण करण्यास याच द्वेषमूलक राजकारणामुळे कडाडून विरोध करण्यात आला.

सोयीस्कर विरोध !

येथे आणखी एक महत्त्वाचे सूत्र आहे. ते म्हणजे समर्थ रामदासस्वामी यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ जोडल्यामुळे महाराजांचे महत्त्व, कर्तृत्व न्यून होते, असे सांगणार्‍या संघटना राजकारण्यांकडून छत्रपतींचा अवमान झाला, दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून टीका झाली, छत्रपतींची मानहानी होईल असे स्टेटस धर्मांधांकडून ठेवण्याच्या घटना घडल्या की, ब्रिगेडी त्याला विरोध का करत नाहीत ? शांत का रहातात ? म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा आव आणत छत्रपतींना दिशानिर्देशन करणार्‍यांचे कर्तृत्व नाकारायचे आणि छत्रपतींचा प्रत्यक्ष अवमान करणार्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे, ही खेळी ब्रिगेडी खेळत आहेत. या खेळीत ब्रिगेडींना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साहाय्य लाभते. ‘महाराष्ट्रात जातीय राजकारणाला शरद पवार यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून प्रारंभ झाला’, असे मागे एका भाषणात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे संस्थापक आणि अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्या कालावधीतच अनेक ब्रिगेडी संघटना निर्माण झाल्या आणि त्यांचा वापर सामाजिक अन् राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केला गेला. त्या संघटना आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर असे एकाहून एक राष्ट्रपुरुष महाराष्ट्राने दिलेले असतांना केवळ ‘शाहू-फुले-आंबेडकर’ एवढीच महाराष्ट्राची परंपरा सीमित का ठेवली गेली ? यातून जातीद्वेषामुळे महाराष्ट्रातील अन्य राष्ट्रपुरुषांचे महत्त्वच नाकारले आहे, त्याचे काय ?

यातून समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तर एक निमित्त आहे, खरे लक्ष्य तर वेदपरंपरा असलेला हिंदु धर्म आहे, हिंदु धर्मातील लाखो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आहेत, हे येथे सूज्ञांनी लक्षात घ्यावे !

समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज ही गुरु-शिष्य परंपरा नाकारणे म्हणजे हिंदुत्व नाकारणे !