अलीकडेच स्थानांतर होण्यासाठी प्रसिद्ध झालेले आणि कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या मातोश्रीच्या अंत्यसंस्कारानंतर विधीवत् अस्थीविसर्जन न करता शेतातच खड्डा खोदून तिथे अस्थी पुरल्या आणि त्यावर वडाचे झाड लावले, अशी बातमी वाचनात आली. या बातमीत मुंडे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन मांडला आणि ‘निसर्ग हाच अंतिम सर्जक आहे’, असे मत व्यक्त केले. झाड लावणे, ही चांगलीच गोष्ट आहे; मात्र अस्थीविसर्जन नदीच्या प्रवाहात करण्यामागे परंपरेने चालत आलेले शास्त्र आहे आणि हिंदूंची तशी श्रद्धा असतांना मुंडे यांनी वरील कृती करून त्याचे समर्थन करणे कितपत योग्य ? त्यांनी त्यांच्या मातोश्रींचे अस्थीविसर्जन कसे करावे ? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे; परंतु ते एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याने त्यांची या संदर्भातील वृत्ते प्रसारित झाली.
सर्वसामान्य माणसे समाजात यशस्वी व्यक्तींना त्यांचे आदर्श मानत असतात; मग ते पोलीस अधिकारी, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते किंवा सिनेकलाकार यांपैकी कुणीही असू शकतात. अधिकारी पदामुळे आजूबाजूला असलेला कर्मचारीवर्ग किंवा चाकर यांच्या दृष्टीनेही ते ‘साहेब’ असतात. धार्मिक कृतींच्या संदर्भात अशा व्यक्तींनी वेगळे काही केले, तर त्याचा समाजमनावर नकळत प्रभाव पडू शकतो. त्यामुळे धार्मिक कृतीविषयी परंपरेपेक्षा वेगळे काही करतांना वलयांकित किंवा प्रसिद्धी व्यक्तींनी त्या गोष्टींना प्रसिद्धी देणे कितपत योग्य आहे, हेही पहावे लागेल. प्रसिद्ध व्यक्तींना एकदा का आदर्श मानले की, त्यांच्याप्रमाणे आचार-विचार, वेशभूषा करणे, हे ओघाने येतेच. त्यामुळे अशा व्यक्तींनी अतिशय सजग रहाणे आवश्यक आहे. आपण आपल्या क्षेत्रामध्ये तज्ञ असू शकतो; मात्र धार्मिक कृतींच्या संदर्भात कुठलाही पालट करतांना त्यातील तज्ञ व्यक्तींना (शंकराचार्य, संत, महंत) विचारूनच तो करणे आवश्यक आहे.
मुंडे यांच्या कचेरीमध्ये नेहमीच्या कार्यपद्धती सोडून स्वतःच्या मनाने वेगळी कार्यपद्धत घातली, तर त्यांना चालेल का ? ती योग्य आहे किंवा नाही, हा एक वेगळा भाग झाला; परंतु ती करण्यापूर्वी त्याविषयी विचारून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनाही अपेक्षित असेलच ना ? मग विज्ञानाच्या आधारावर असलेल्या प्राचीनतम धर्मशास्त्राच्या परंपरांमध्ये स्वतःच्या मनाने पालट करणे कितपत योग्य ? माध्यमांनी धर्मासारख्या संवेदनशील विषयांमध्ये दायित्वाने वागून अशा गोष्टींच्या प्रसिद्धीविषयी ठरवायला हवे. हिंदूंचा धर्म आणि परंपरा या केवळ श्रद्धा नव्हेत, तर सहस्रो वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेले ज्ञान आहे. त्यामागे एक तत्त्वज्ञान आणि सामाजिक रचना आहे. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींनी धार्मिक कृती करतांना धर्मपूरकच वागणे अपेक्षित आहे !
– श्री. किशोर जगताप, सोलापूर.


उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?