‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) म्हणजे ‘जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात’, हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र आहे. आपल्या परंपरेत स्त्रीला केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर शक्ती, संस्कार आणि सृजन यांची अधिष्ठात्री म्हणून पाहिले गेले आहे. स्त्री ही कुटुंबाची आधारस्तंभ, समाज घडवणारी शक्ती आणि राष्ट्राच्या प्रगतीची केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच स्त्रीचा सन्मान राखणे, हे केवळ कर्तव्य नसून संस्कृतीचे रक्षण आहे; मात्र सध्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या नावाखाली सादर होणार्या कार्यक्रमांनी चिंतेची परिस्थिती निर्माण केली आहे.
१. मनोरंजनाच्या नावाखाली स्त्रीच्या सन्मानाला धक्का देणारे अपप्रकार
प्रारंभीला मनोरंजनाच्या उद्देशाने चालू झालेला हा उपक्रम कालांतराने मूळ उद्देशापासून दूर गेला आहे. आज या कार्यक्रमांमध्ये महिलांची चेष्टा करणे, त्यांची खिल्ली उडवणे, वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारून त्यांना अवघड स्थितीत आणणे, अश्लील किंवा अयोग्य हावभाव करायला लावणे, चुकीचे अंगविक्षेप करायला भाग पाडणे, तसेच त्यांना तुच्छतेची वागणूक देणे, असे प्रकार वाढलेले दिसतात.
मनोरंजनाच्या नावाखाली होणारे हे अपप्रकार प्रत्यक्षात स्त्रीच्या सन्मानाला धक्का देणारे आहेत. एका बाजूला एखाद्या विजेत्या महिलेला पैठणी किंवा इतर बक्षीस दिले जाते; पण दुसर्या बाजूला सहभागी झालेल्या अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान होतो. यामुळे त्यांच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो, आत्मविश्वास न्यून होतो आणि मानसिक खच्चीकरण होते.
२. कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण दूषित

याचे दुष्परिणाम केवळ त्या महिलांपुरते मर्यादित रहात नाहीत. अशा कार्यक्रमांचा प्रभाव लहान मुलांवरही पडतो. त्यांच्या मनावर चुकीचे संस्कार होतात आणि स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत होण्याची शक्यता निर्माण होते, तसेच महिलांमध्ये एकमेकींविषयी ईर्षा, स्पर्धा आणि द्वेष वाढीस लागतो, ज्यामुळे कौटुंबिक अन् सामाजिक वातावरण दूषित होते.
३. स्त्रीचा अपमान म्हणजे समाजाची अधोगती !
भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते, ‘स्त्री ही पूजनीय आहे, विनोदाची वस्तू नाही.’ म्हणूनच स्त्रीच्या सन्मानाला धक्का पोचवणार्या कोणत्याही प्रकाराला समाजाने ठामपणे विरोध करणे आवश्यक आहे. स्त्रीचा अपमान, म्हणजे समाजाच्या मूल्यांचा अपमान होय आणि जिथे स्त्रीचा सन्मान नाही, तिथे समाजाची अधोगती निश्चित आहे.
४. स्त्रीचा सन्मान तुडवणारे कार्यक्रम बंद करणे आवश्यक !
आज आवश्यकता आहे, ती समाजात जागृती निर्माण करण्याची. महिलांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, तसेच पुढील पिढीला योग्य संस्कार देण्यासाठी अशा कार्यक्रमांवर तातडीने नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. मनोरंजनाच्या नावाखाली स्त्रीचा सन्मान तुडवणारे कार्यक्रम बंद होणे, ही काळाची आवश्यक आहे.
५. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्त्री सन्मानासाठी आवाज उठवावा !
स्त्री ही केवळ घराची ‘होम मिनिस्टर’ (गृहमंत्री) नसून ती समाजाची संस्कृती, कुटुंबाची ओळख आणि राष्ट्राची शक्ती आहे. तिचा सन्मान राखणे, म्हणजे आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे होय. म्हणूनच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्त्री सन्मानासाठी आवाज उठवावा, अशा कार्यक्रमांना विरोध करावा आणि सन्मानपूर्वक, संवेदनशील अन् संस्कारित समाज घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.
– सौ. नलिनी वायाळ गावडे, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य महिला बालकल्याण समिती, पिंपरी-चिंचवड, जिल्हा पुणे. (२०.४.२०२६)

‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !