महाराष्ट्रातील गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचे जे पानिपत झाले, त्यामुळे हे पक्ष जितके निराश झाले नसतील, इतकी त्यांची साम्यवादी यंत्रणा (इकोसिस्टम) चवताळली आहे. महाराष्ट्रात झालेली हिंदु मतांची एकजूट हे या प्रचंड विजयाचे प्रमुख कारण असल्यामुळे ही एकजूट कशी तोडता येईल, याची कारस्थाने या मंडळींनी चालू केली आहेत. यासाठी आजवर हुकमी ठरलेला ‘जातीयवादाचा पत्ता’ या वेळी चालला नाही म्हटल्यावर नवे संघर्षबिंदू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वारकरी समाजात फूट पाडण्यासाठी सूची करून काही संतांना लक्ष्य बनवण्याचा नुकताच झालेला प्रकार हा या प्रयत्नांचाच एक भाग !

१. मराठीविषयी अचानक उफाळून आलेले प्रेम, म्हणजे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे एक नवीन कारण !
असाच आणखी एक संघर्षबिंदू निर्माण करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. हा संघर्षबिंदू म्हणजे भाषा. मराठीवर होणारे हिंदी आणि गुजराती या भाषांचे ‘आक्रमण’, मराठीचा अपमान वगैरे विषयांची चर्चा चालू करण्यात आली आहे. हा आवाज त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने हळूहळू वाढवत नेला जाईल. काही साळसूद नावे असलेल्या संस्था चालू केल्या जातील. त्यांना मोठ्या प्रमाणात ‘फंडिंग’ (निधी) चालू होईल. त्याआधारे काही तथाकथित विद्वानांना या कामाला जुंपण्यात येईल. मराठीवरील प्रेमाचा सद्गुण संकेत देणारे आकर्षक मुखवटे चढवले जातील आणि त्यांच्या मागे भाषा-भाषांमध्ये भांडणे लावून हिंदूंचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न होईल. येत्या महाराष्ट्रदिनाचे निमित्त साधून १ मे या दिवसाच्या आसपास या ‘टूलकिट’चा परिणाम जाणवू लागेल. या मुखवट्यांना न भुलता त्यामागचा विभाजनकारी ‘अजेंडा’ (कार्यसूची) समजून घेणे आवश्यक आहे; कारण मराठीविषयी अचानक उफाळून आलेले प्रेम हा पुतनामावशीचा पान्हा आहे.

२. ‘विद्या भारती’ संस्थेने असमिया भाषेचे जतन करण्याच्या माध्यमातून भाषाद्वेषाचा रोखलेला संघर्ष
आसाममध्ये बांगलादेशातून होणार्या अनिर्बंध घुसखोरीमुळे ‘असमिया’ भाषेच्या भवितव्याविषयी स्थानिक लोक मोठ्या काळजीत पडले होते. तिथेही ‘आसामी’ विरुद्ध ‘बंगाली’ असे भांडण लावून हिंसा आणि अराजक माजवण्याचा प्रयत्न झालाच; पण ‘असमिया भाषेचे जतन व्हावे आणि तिचा सन्मान जपला जावा’, यांसाठी ‘विद्या भारती’ या संस्थेने ‘शंकरदेव शिशु निकेतन’ आणि ‘शंकरदेव विद्या निकेतन’ या शाळा चालू केल्या. या शाळांमध्ये आसामी माध्यमातून शिक्षण दिले जाऊ लागले. त्यामुळे आसामच्या जनतेने या शाळांना प्रचंड प्रतिसाद दिला. आज आसाममध्ये ‘विद्या भारती’च्या जवळपास ७०० हून अधिक शाळा आहेत, जिथे सहस्रो विद्यार्थी बंगालीचा द्वेष करण्याऐवजी अभिमानाने मातृभाषेतून शिक्षण घेतात. अशा प्रकारे ‘विद्या भारती’ने इतर भाषांची रेष छोटी करण्यापेक्षा मातृभाषेची रेष मोठी करण्यासाठी रचनात्मक कार्यावर भर दिला. यामुळे असमिया भाषेच्या प्रेमाची परिणती इतर भारतीय भाषांविषयीच्या विद्वेषात झाली नाही आणि ‘आसामी’ विरुद्ध ‘बंगाली’ हा संघर्षही कायमचा संपला.
३. भाषा संवर्धनाचे रचनात्मक कार्य करण्याऐवजी विद्वेषी संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रातही ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ने गेल्या ३ वर्षांत सर्व वयोगटातील लाखो लोकांना मराठी पुस्तकांकडे आकर्षित करून भाषेसाठी सकारात्मक काम कसे करावे, याचा धडा घालून दिला आहे. येत्या वर्षी १०० वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरणार आहे. त्याची सिद्धता म्हणून ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ ९९ पुस्तक प्रदर्शने संपूर्ण महाराष्ट्रात भरवणार आहे. यामुळे अर्थातच मराठी वाचनाची आवड वाढत जाईल आणि मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी, यासाठी होणार्या प्रयत्नांना बळ मिळेल; पण असे रचनात्मक काम करायचे, तर त्यासाठी काहीतरी टिकाऊ आणि चांगले करून दाखवण्याचे उद्दिष्ट समोर असावे लागते. भूमीवर उतरून, पाय रोवून उभे रहाण्याची वृत्ती आणि समर्पण भावना लागते. कलहजीवी लोकांचे उद्दिष्ट विध्वंसाचे आणि वृत्ती विद्वेषाची असते. त्यामुळे ते सामाजिक ऐक्याचा विध्वंस करण्यासाठी भाषा-भाषांमध्ये भांडणे लावून संघर्ष भडकवण्याचाच प्रयत्न करणार, हे स्पष्ट आहे.
४. फूट पाडणार्यांना दूर ठेवा !
ज्यांचे मराठीवर प्रेम आहे आणि आपल्या भाषेच्या उज्वल भविष्यासाठी काही तरी करण्याची इच्छा आहे, त्यांनी या दिशेने चालू असलेल्या रचनात्मक, सकारात्मक आणि ठोस प्रयत्नांमध्ये सामील व्हायला हवे, तसेच आकर्षक मुखवट्यांना न भुलता त्यांच्या मागचे कलहजीवी चेहरे ओळखून अन् त्यांच्या फूटपाड्या कारवायांना खड्यासारखे दूर ठेवायला हवे.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२०.४.२०२६)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !