अजेय योद्धा भगवान परशुराम याने केलेले अपूर्व अवतारी कार्य आणि पराक्रम !

१९ एप्रिल या दिवशी  श्री परशुराम जयंती झाली. त्या निमित्ताने...

परशुराम अवतार

१. श्रीविष्णूचा सहावा अवतार 

सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगूंच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार धारण केला. त्याचे नाव ‘परशुराम’ होते. भार्गवगोत्री असल्याने त्यास ‘भार्गवराम’ असेही संबोधले जात असे.

२. सप्तचिरंजिवांपैकी एक असल्यामुळे प्रातःकाळी स्मरण केले जात असणे

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः ।।

अर्थ : अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, बिभीषण, कृप आणि परशुराम हे सात चिरंजीव होत.

३. काळ आणि काम यांच्यावर विजय प्राप्त केलेले दैवत

श्रीविष्णूचा ६ वा अवतार परशुराम याने काळ आणि काम या दोन्हींवर विजय प्राप्त केला आहे. त्याने काळावर विजय प्राप्त केल्यामुळे तो सप्तचिरंजिवींपैकी एक आहे, तर त्याने कामावर विजय प्राप्त केल्यामुळे तो अखंड ब्रह्मचारी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळील ‘लोटे परशुराम’ या गावातील महेंद्र पर्वतावर भगवान परशुरामाचे पुरातन मंदिर आहे. तेथे परशुरामाचे पदचिन्ह उमटलेल्या शिळेचे नित्यपूजन होत असते. या शिळेच्या मागे तीन मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मध्यभागी भगवान परशुरामाची आकाराने मोठी आणि रेखीव मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे काळदेवतेची आणि डावीकडे कामदेवतेची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती लहान आकाराच्या आहेत. या मूर्ती भार्गवरामाने ‘काळ आणि काम’ यांवर विजय प्राप्त केल्याचे द्योतक आहेत. परशुरामाने कामवासनेला जिंकले होते. त्यामुळे तो अखंड ब्रह्मचारी आणि परम वैरागी आहे.

४. हनुमान आणि परशुराम यांच्यातील साम्य अन् भेद

४ अ. हनुमान आणि परशुराम यांच्यातील साम्य : हनुमान रुद्रावतार आहे; परंतु त्याने प्रभु श्रीरामाला स्वामी मानून त्याची दास्यभावाने सेवा केली. त्याप्रमाणेच परशुराम हा श्रीविष्णूचा सहावा अवतार असून त्याने शिवाला गुरु मानून शिष्यभावाने त्याच्या प्रत्येक आज्ञेचे तंतोतंत पालन केले. ज्याप्रमाणे हनुमानाने प्रभु श्रीरामाच्या चरणी सर्वस्व अर्पण करून त्याची मनोभावे सेवा केली, त्याप्रमाणे परशुरामाने गुरुवर्य शिवाला सर्वस्व अर्पण करून त्याची कृपा संपादन केली.

१. दोघेही सप्तचिरंजीव आहेत.

२. दोघेही बालब्रह्मचारी आहेत.

३. दोघेही परम वीर आणि महाबलशाली आहेत.

४. दोघेही धर्मसंस्थापनेच्या कार्याला अप्रत्यक्षपणे साहाय्य करतात.

५. दोघेही शिष्य असून हनुमान सूर्यनारायणाचा आणि परशुराम शिवाचा शिष्य आहे.

६. दोघेही परम भक्त आहेत. हनुमान प्रभु श्रीरामाचा आणि परशुराम शिवाचा भक्त आहे.

७. दोघेही परम त्यागी आणि निःस्पृह (निरिच्छ) आहेत.

८. दोघेही निरासक्त, निर्माेही आणि संपूर्ण वैरागी आहेत.

९. दोघांकडेही वेदांचे ज्ञान आहे आणि दोघेही ब्रह्मज्ञानी आहेत.

१०. दोघेही निरहंकारी आहेत.

४ आ. हनुमान आणि परशुराम यांच्यातील भेद 

(चित्रावर क्लिक करा)

हनुमान सूर्यनारायणाचा शिष्य आणि प्रभु श्रीरामाचा भक्त होता, तसेच परशुराम हा शिवाचा शिष्य आणि शिवाचा भक्त होता.

५. अपराजेय योद्धा असलेला कार्तवीर्य सहस्रार्जुन याचा विनाश करण्यासाठी परशुरामाने केलेला अद्वितीय पराक्रम !

हैैहय वंशातील राजा आणि महिष्मती नरेश कार्तवीर्य सहस्रार्जुनाने सहस्रो वर्षे कठोर तपश्चर्या करून भगवान दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले. त्याने दत्तात्रेयांकडून असीम बलशाली होण्यासाठी सहस्रो भुजा धारण करण्याचे वरदान प्राप्त केले होते. त्यानंतर त्याने जमदग्नि ऋषींकडे असलेल्या कामधेनूचे बलपूर्वक हरण केले. ही घटना घडली, तेव्हा परशुराम आश्रमात नव्हता. तो घनघोर अरण्यात कठोर तपश्चर्या करण्यात मग्न होता. जेव्हा तो जमदग्नींच्या आश्रमात पोचला, तेव्हा त्याला घडलेला प्रकार समजला. त्यानंतर परशुरामाने कार्तवीर्य सहस्रार्जुनाशी घनघोर युद्ध करून त्याच्या सहस्र भुजा परशूने छाटून त्याचा शिरच्छेद केला आणि त्याच्या कह्यात असणार्‍या कामधेनूची मुक्तता करून तिला पुन्हा पिता जमदग्निऋषींच्या आश्रमात आणली.

अशा प्रकारे अहंकारी क्षत्रियांचे निर्दालन करण्यासाठी भगवान परशुरामाने महाकालेश्वर शिवाने त्यांना दिलेल्या परशूचा शस्त्र म्हणून वापर करण्यास आरंभ केला.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

६. भगवान परशुराम याने केलेले अपूर्व अवतारी कार्य आणि पराक्रम !

६ अ. २१ वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करून संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करणे : भगवान परशुरामाने एकट्याने संपूर्ण पृथ्वीला २१ वेळा प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर माजलेल्या अहंकारी आणि अधर्मी क्षत्रियांचा निःपात केला. अशा प्रकारे पृथ्वीप्रदक्षिणा घालून त्याने पृथ्वीचा भार हलका केला आणि त्याचबरोबर पृथ्वीप्रदक्षिणा घालण्याचे परम पुण्यही प्राप्त केले.

६ आ. शत्रूचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र या दोन्ही तेजांचा उत्कृष्ट उपयोग करणारे श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान परशुराम असणे 

अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे, अशा ब्राह्म अन् क्षात्र तेजांनी युक्त भगवान परशुराम दुर्जनांचा ब्राह्मतेजाने शाप देऊन किंवा क्षात्रतेजाने धनुष्यबाणाने संहार करत.

परशुरामाने ‘शास्त्रबळ’, म्हणजे ‘ज्ञानबळ’ आणि ‘शस्त्रबळ’, म्हणजे ‘बाहूबळ’ या दोन्हींच्या संयोगाने रिपुदमन केले. आध्यात्मिक परिभाषेत ‘ज्ञानबळ’, म्हणजे ‘ब्राह्मतेज’ आणि ‘बाहूबळ’, म्हणजे ‘क्षात्रतेज’ होय. परशुरामाने ब्राह्मतेजाच्या बळावर शाप देऊन, अर्थात् संकल्पाने आणि क्षात्रतेजाच्या बळावर, म्हणजे परशूने प्रत्यक्ष प्रहार करून शत्रूंचा संहार केला. अशा प्रकारे शत्रूंचे निर्दालन करण्यासाठी ‘ब्राह्म आणि क्षात्र’ या दोन्ही तेजांचा उत्कृष्ट उपयोग करणारे श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान परशुराम आहे.

६ इ. ज्ञानशक्ती (ब्राह्मतेज) आणि क्रियाशक्ती (क्षात्रतेज) यांद्वारे अधर्माचे उच्चाटन करणे : पित्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि मातेप्रमाणे क्षात्रतेज असणारा परशुराम हा ‘योद्धावतार’ आहे. ब्रह्मवृंदांना नामशेष करण्यासाठी त्यांचे आश्रम आणि गुरुकुलाची उज्ज्वल परंपरा उद्ध्वस्त करणार्‍या अन्यायी राज्यसत्तेला दोन्ही तेजांनी संपन्न असणार्‍या परशुरामाने ललकारले. वैदिक ज्ञानाचे ब्राह्मतेज आणि शस्त्ररूपी क्षात्रतेज यांद्वारे परशुरामाने अधर्माचे उच्चाटन केले, तसेच दुष्टांना शाप देऊन किंवा शस्त्राने वार करून कठोर शासन केले.

७. संपूर्ण अवतारकाळात सर्वाधिक क्षात्रोपासना केल्याचे एकमेव उदाहरण

गुरुकुलाची परंपरा, आश्रमव्यवस्था आणि ऋषीजीवन यांना क्षत्रियांच्या उन्मत्तपणाने ग्रासून टाकले होते. क्षत्रियांच्या जाचातून परंपरा, संस्कृती आणि धर्म यांचे रक्षण करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे भगवान परशुरामाने शिष्यावस्था संपताच शिवाने आशीर्वादस्वरूप दिलेला परशू, धनुष्यबाण आणि शापमय वाणी यांचा शत्रूवर वार करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करून कार्तवीर्य सहस्रार्जुनासह सर्व उन्मत्त क्षत्रियांचा निःपात केला. संपूर्ण अवतारकाळात सर्वाधिक क्षात्रोपासना केल्याचे एकमेव उदाहरण, म्हणजे भगवान परशुराम होय.

८. परशुरामाने ब्राह्मतेजाच्या बळावर शाप देऊन अनेक आसुरी शक्ती आणि उन्मत्त राजे यांचा नाश केला.

९. परशुरामाने विविध युगांमध्ये श्रीविष्णूच्या अन्य अवतारांना साहाय्य करणे

९ अ. त्रेतायुगातील कार्य : त्रेतायुगात मिथिला नगरीत सीतास्वयंवराच्या वेळी भगवान परशुरामाने प्रभु श्रीरामाला श्रीविष्णूचे शारंग धनुष्य देऊन स्वतःतील तेजांश आणि दिव्य शक्ती त्याच्यामध्ये संक्रमित केली.

९ आ. द्वापरयुगातील कार्य : द्वापरयुगात जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे सांदिपनी ऋषींच्या आश्रमात राहून गुरुकुलाचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा भगवान परशुरामाने त्याला दर्शन देऊन ‘सुदर्शनचक्र’ दिले आणि मथुरेवर स्वारी करणार्‍या जरासंधाच्या सेनेशी लढण्याचा निर्देश दिला.

९ इ. कलियुगातील कार्य : कलियुगात जेव्हा श्रीविष्णूचा ‘कल्की’ अवतार होणार आहे, तेव्हा भगवान परशुराम त्याच्या महेंद्र पर्वतावरील समाधीचा त्याग करून कार्यशील होणार आहे. तेव्हा तो त्याची शस्त्रे आणि अस्त्रे कल्कीला देऊन त्याच्यासह अधर्माशी युद्ध करणार आहे.

१०. कृतज्ञता

‘श्री गुरूंच्या कृपेमुळे भगवान परशुरामाच्या संदर्भात हे दिव्य ज्ञान मिळाले’, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे. आम्हा साधकांना येणार्‍या भीषण आपत्काळात तोंड देण्यासाठी भगवान परशुरामाची कृपा संपादन करता यावी’, हीच श्री गुरुचरणी विनम्रभावाने प्रार्थना आहे.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ६.४.२०२६, वेळ : सायंकाळी ४.२० ते ५, कालावधी : ५० मिनिटे)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.