Italy Gurdwara Shooting : इटलीमध्ये गुरुद्वाराबाहेर २ शिखांची गोळ्या झाडून हत्या

पूर्ववैमनस्यातून भारतीय वंशांच्या लोकांकडून हत्या झाल्याचा संशय

रोम (इटली) – इटलीतील कोवो येथे गुरुद्वाराबाहेर अज्ञातांनी गोळीबार करून गुरुद्वारातील राजिंदर सिंह (वय ४८ वर्षे) आणि गुरमीत सिंह (वय ४८ वर्षे) या २ सेवादारांची हत्या केली. या गोळीबारात अन्य एक जण घायाळ झाला. घायाळावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणातून गोळीबार करणारे भारतीय वंशाचे असल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण आपापसांतील वैमनस्याशी संबंधित आहे. मृत सेवादार बर्‍याच काळापासून गुरुद्वारामध्ये सेवादार म्हणून कार्यरत होते.

गुरुद्वारामध्ये बैसाखी (खालसा पंथाचा स्थापना दिवस) निमित्त १८ एप्रिल या दिवशी नगर कीर्तनाची सिद्धता चालू होती. दोघे सेवादार रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गुरुद्वारातून बाहेर पडत असतांना चारचाकी वाहनातून आलेल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि पलायन केले. घटनेनंतर कोवोमध्ये होणारे नगर कीर्तनही रहित करण्यात आले.