अक्षय्य तृतीयेला झालेल्या गंगावतरणाची (जलावतरणाची) दिव्य कथा !

अक्षय्य तृतीयेला गंगेचे अवतरण झाले, अशी आपली परंपरा सांगते. ‘वाल्मिकी रामायणा’च्या बालकांडात सर्ग ३४ ते ४४ या ११ सर्गांमध्ये विश्वामित्र ऋषींनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना गंगावतरणाची कथा सांगितली आहे. महाभारताच्या उद्योग पर्वात गंगावतरणाची कथा आढळते. तथापि या ग्रंथांमध्ये ‘गंगा अक्षय्य तृतीयेला भूतलावर अवतरली’, असा संदर्भ आढळत नाही.

प्रसिद्ध लेखक रवींद्र भट यांनी गंगावतरणाला ‘जलावतरण’ असे संबोधून भगीरथ नावाची याच विषयावरील एक कादंबरी ५० वर्षांपूर्वी लिहिली होती. या कादंबरीत गंगावतरणाचे वर्णन करतांना त्यांनी ‘वैशाख मासाची चाहूल लागली’, असे लिहिले. वैशाख मासातील सूर्याचे प्रखर किरण हिमवनाच्या, म्हणजे बर्फाच्छादित शिखरांचा वेध घेऊ लागले. कैलास, मैनाक, भृगतृंग आणि मोक्षकाम या पर्वत श्रेणींवरील हिमाला सूर्यकिरणांचा सतेज स्पर्श होताच ते थरारले. स्वतःच्या माथ्यावर धारण केलेल्या हिमरूपाला जलरूप देऊ लागले. चारही दिशांच्या शिखरांवरून सहस्रावधी प्रपात (धबधबे) तपोवनाच्या भूमीवर उड्या घेऊ लागले. निर्मळ सलीलाचे (जलाचे) असंख्य ओहोळ झेपावत येऊन माणसांनी उत्खनीत केलेले पात्र समृद्ध करू लागले. कैलास आणि मैनाक यांना जोडणार्‍या मृत्तिका बांधावर पाण्याच्या लाटांवर लाटा आदळू लागल्या. युगानुयुगे उत्तरेच्या दरीतून उत्तर कुरू देशाकडे जाणारे प्रचंड जलतत्त्व आज कैलास पर्वताच्या माथ्यावरील मृत्तिकाबंधनाने अडवले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली. काढलेल्या पाटात पाण्याचे लोंढेच्या लोंढे पश्चिमेला घुसू लागले. खळखळत्या पाण्याला सृष्टीकर्त्याने ठरवून दिलेली दिशा पालटावी लागली. मानवाने निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीत तिला प्रवेश करावा लागला. पश्चिमेचा पाट सार्‍या तपोवन भूमीला अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालून मोक्षकाम पर्वताच्या प्रचंड गुहेला जोडला गेला. पाण्याचा प्रचंड लोंढा मोक्षकाम पर्वताच्या गुहेत शिरला. पर्वतगर्भाला सलील स्पर्श होताच त्याचे सारे अंग थरारले. ‘एका अभिनव मनूला प्रारंभ करणार्‍या या जलयज्ञाला आपल्या परिसराची वेदी लाभत आहे’, या कल्पनेने मोक्षकाम पर्वताच्या अणूरेणूंतून चैतन्य सळसळू लागले. ‘या जलतत्त्वाला आधार देण्यासाठी आपल्याला युगानुयुगे समर्थपणे उभे रहायला हवे’, असा विचार करून त्याचे रजकण परस्परांत मिसळले आणि अधिक बलवान झाले. गुहेच्या आतील मृत्तिका आस्तरण (थर) पाषाण खडकांच्या आधाराने कठीण झाले.

सगर राजाच्या ५ पिढ्यांनी गंगावतरणासाठी केलेल्या तपश्चर्येविषयीचे ‘एआय’निर्मित प्रातिनिधिक चित्र

पाण्याचा तो लोंढा निमिषार्धात गंगेच्या मुखातून फेसाळत बाहेर पडला आणि ‘स्वर्गवाहिनी’ गंगा ‘पृथ्वीवाहिनी’ होऊन पूर्व-पश्चिम पर्वतश्रेणींच्या मधील निमुळत्या प्रदेशावर दक्षिणाभिमुख अवतरली ! पाषाणत्रिशूळांना गंगास्नान घडले. प्रथम जलाचा पवित्र स्पर्श होताच पाषाण त्रिशूळ कृतार्थ झाले. त्यांच्या सर्वांगातून कौतुकाचे पाझर फुटले. ते प्रथम या जलात एकरूप झाले आणि दोन्ही दिशांनी कोसळणार्‍या निर्झरांना, ओहोळांना आणि शुभ्र प्रपातांना (प्रवाहांना) सामावून घेत पाणी वैखानस सरोवरात (म्हणजेच आजची गंगोत्री) आले. आजवर सीमित असलेले बंदिस्त सरोवर असीम (अमर्याद) आणि मुक्त झाले. स्वर्गगंगेला स्वतःच्या उदकात स्थान देऊन झपाट्याने दक्षिणेच्या दरीकडे झेपावू लागले.

आपला आर्यावर्त कृषीप्रधान आहे. ‘निसर्ग हा लहरी असल्यामुळे तो नेहमीच मानवाला साथ देतो’, असे नाही. कधी पाऊस अपुरा पडतो, तर कधी अतीवृष्टी होते. नद्यांना पूर येऊन अनेक गावे पुराच्या पाण्याखाली जातात. जीवितहानी आणि आर्थिक हानीसुद्धा होते. पिकांची नासाडी होते. काही भागांतील नद्या कोरड्या पडतात. त्यामुळे आर्यावर्तातील सर्व नागरिकांना नद्यांच्या पाण्याचा उपयोग होतोच, असे नाही. ज्या भागात नदीचा प्रवाह अनियमित असतो किंवा नदीचे पात्र पावसाळ्यानंतर कोरडे पडते, त्या नदीकाठी रहाणार्‍या मानवी समाजाला पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागते. अशा भागात नदी १२ महिने वहात राहिली पाहिजे, तरच आर्यावर्तातील जनतेला मुबलक पाणी उपलब्ध होऊन त्यांची समस्या दूर होईल.

याच हेतूने रघुवंशातील सगर, सगरपुत्र, अंशुमान, दिलीप आणि भगीरथ या राजांनी गंगा नदीच्या पाण्याचा उपयोग आर्यावर्तातील जनतेला व्हावा; म्हणून अपार परिश्रम घेतले. साधारणपणे ५ पिढ्यांनी त्यांचे सर्वस्व पणाला लावून गंगेचे पवित्र पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले. यालाच ‘गंगावतरण’ असे नाव देण्यात आले.

१. रघुकुळातील राजांप्रमाणे सध्याच्या शासनकर्त्यांनी प्रजाहितार्थ प्रयत्न करावेत !

हिमालयातील गंगेचे पाणी भूमीवर आणण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, त्यांना तोड नाही. हिमालयातील पाण्याचा अपरंपार साठा मानवाच्या प्रयत्नांच्या बळावर वळवण्यात आला. तो पठारावर आणला आणि पाण्याचा वारंवार भेडसावणारा प्रश्न कायमचा सोडवला गेला. शासनकर्त्यांनीही प्रजेला सर्व मूलभूत गोष्टी विनासायास उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या कर्तव्याची जाणीव रघुकुळातील राजांना होती.

श्री. दुर्गेश परुळकर

२. गंगावतरणासाठी संपूर्ण जीवन पणाला लावणार्‍या रघुकुळातील ५ पिढ्या !

गंगोत्रीत साठून राहिलेले गंगेचे पाणी हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे रहाणार्‍या नागरिकांसाठी उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी रघुकुळातील राजांनी अपार कष्ट घेतले. निसर्गशक्तीशी लढून मानवीशक्ती विजयी करणे, याचे भान या राजांना होते. या कार्यात यश प्राप्त होण्यासाठी रघुकुळातील पाच पिढ्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन पणाला लावले. त्यात ४ पिढ्यांनी त्यांचे प्राण गमावले. पाचव्या पिढीतील भगीरथाला मात्र त्या कार्यात यश संपादन करता आले. आधीच्या चार पिढ्यांनी सहस्रावधी बळी देऊन जलयज्ञ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्याची सांगता त्यांना करता आली नाही. या चार पिढ्यांच्या अनुभवाचा लाभ झाल्याने भगीरथ राजाला ठामपणे निर्णय घेता आले.

महती अक्षय्य तृतीयेची !

१. दान देण्यासाठीचा अत्यंत शुभ दिवस – अक्षय्य तृतीया !

‘वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया ! या दिवशी आपल्याकडून घडणार्‍या सत्कार्याचा कधीही क्षय होत नाही. हा दिवस दान देण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान, तप आणि सत्कार्य हे अक्षय्य फळ देणारे असते.

आपले पूर्वज, ऋषिमुनी, देव आणि अवतारी पुरुष यांचे स्मरण करून या दिवशी सत्कार्य करावे, तसेच दान देऊन आपली सर्व कर्मे ईश्वरचरणी समर्पित करावीत, म्हणजे आपल्यावर ईश्वराची अक्षय्य कृपा राहील.

२. मुहूर्त पहाण्याची आवश्यकता नसणारा दिवस !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया ! कोणतेही शुभकार्य करण्यासाठी पंचांगात मुहूर्त पहाण्याची आवश्यकता नसते.

३. पितरांचे स्मरण करून दान देण्याची परंपरा !

काही कुटुंबांमध्ये पितरांचे स्मरण करून उदककुंभ, पंखा, चपला, वस्त्रे, अन्न यांचे दान देण्याची परंपरा आहे. ती आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जाते. अक्षय्य तृतीयेचा दिवस ‘अखातीज’ म्हणूनही ओळखला जातो.’

– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर

३. भगीरथाने केलेले अथक प्रयत्न !

सगर राजापासून दिलीप राजापर्यंत ज्या विशिष्ट भूभागांत उत्खनन करण्यात आले, तो भूभाग असंख्य पर्वत आणि अडचणी यांनी व्यापलेला होता. कुठल्याही सम्राटाने कितीही शक्ती खर्ची घातली असती, तरीसुद्धा तेथून गंगेचा जलमार्ग वळवून योग्य ठिकाणी तिचा प्रवाह आणणे अत्यंत कठीण; किंबहुना अशक्य होते. ‘त्यासाठी नवीन योजना आखणेच क्रमप्राप्त आहे’, हे भगीरथ राजाच्या लक्षात आले. त्याने एक योजना आखली. ईशान्येच्या दिशेने उत्तरकुरु देशाकडे जाणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह कैलास आणि त्रिशूल पर्वतांतील खिंड अडवून पश्चिमेकडे वळवण्याचे ठरवले. मोक्षकाम पर्वतात बोगदा काढून वैखानास सरोवराला, म्हणजेच आताच्या ‘गंगोत्री’ स्थानाच्या वरच्या भागात पूर्व-पश्चिम पर्वतरांगांतील जलसंचाला आणून जोडायचे ठरवले. तेथून खाली सपाटीवर पाण्याचा स्रोत आणायचा, अशी भव्य योजना आखण्यात आली. भगीरथाच्या या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि हिमालयातील गंगेचे पाणी आर्यावर्तातील नागरिकांना उपलब्ध झाले, ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच ! असे परंपरेनुसार मानले जाते.

अक्षय्य तृतीयेचा आध्यात्मिक वारसा !

१. ‘श्रीविष्णूचा सहावा अवतार भृगुनंदन परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला.

२. सत्ययुग आणि त्रेतायुग यांचा आरंभही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला, असे मानले जाते.

३. पौराणिक गोष्टींनुसार भगवान कुबेराने भगवान शंकराची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घेतले. त्याच्याच कृपाप्रसादामुळे कुबेराचे गेलेले धन त्याला याच दिवशी पुनश्च प्राप्त झाले.

४. भगीरथाचे प्रयत्न आणि कठोर तपस्या यांमुळे स्वर्गातील गंगा भूतलावर अवतीर्ण झाली, तीही याच दिवशी ! म्हणून हा दिवस गंगा स्नानासाठी अधिक पवित्र मानला जातो.

५. श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षांनंतर श्रीकृष्णाला भेटण्यासाठी सुदामा द्वारकेत गेला. अत्यंत गरीब असलेल्या सुदाम्याने मित्रासाठी दोन मुठी पोहे साध्या फडक्यात गुंडाळून नेले. मित्राने दिलेली ही भेट श्रीकृष्णाने आनंदाने स्वीकारली. एवढेच नाही, तर ते पोहे भक्षणही केले. सुदाम्याने न मागताही श्रीकृष्णाने त्याची नगरी सुवर्णमय करून त्याचे दारिद्र्य दूर केले. तो दिवसही वैशाख शुक्ल तृतीयेचा, म्हणजे अक्षय्य तृतीयेचा होता.

६. पांडव आणि कौरव द्यूत खेळले. त्यात पांडवांचा पराभव झाला. त्यांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. वनवासात असतांना पांडवांना अक्षय्य अन्नाचा पुरवठा व्हावा; म्हणून भगवान श्रीकृष्णाने अक्षय्य पात्र दिले. तो दिवस वैशाख शुक्ल तृतीयेचाच होता. या अक्षय्य पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे या पात्रातील भोजन कधीही संपत नसे. त्यामुळे १२ वर्षे वनवासात राहूनही पांडवांवर कधी उपाशी रहाण्याची वेळ आली नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर

४. तपश्चर्या केलेल्या रघुवंशातील ५ पिढ्यांचे अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिनी स्मरण करा !

अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी घेतलेले अपार कष्ट आणि केलेले प्रयत्न यालाच ‘तपश्चर्या’ असे म्हणतात. ही कर्मयोग्यांची तपश्चर्या आहे. रघुवंशातील पाच पिढ्यांनी अशी कठोर तपश्चर्या केली. मानवी समाजाच्या कल्याणार्थ त्यांनी बलीदानही दिले; पण यश येईपर्यंत त्यांनी त्यांचे कार्य पाच पिढ्यांपर्यंत चालूच ठेवले. त्यांचे हे अफाट कार्य आणि अथक परिश्रम पाहून भगवान शंकर अन् ब्रह्मदेव यांनी प्रसन्नतेने त्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्या या सत्कार्याचा अक्षय्य लाभ युगानुयुगे मानवी समाजाला होत आहे. अशा कर्मयोगी राज्यकर्त्यांचे स्मरण अक्षय्य तृतीयेच्या पवित्र आणि पावन दिवशी सर्वांनी करावे. त्यांच्या पदपथावरून वाटचाल करण्याची प्रेरणा राज्यकर्त्यांना युगानुयुगे मिळेल, एवढे सामर्थ्य या राजांचा कर्मयोग आणि तपश्चर्या यांत आहे. रघुवंशातील या ५ पिढ्यांतील राजांना विनम्र प्रणिपात !

– श्री. दुर्गेश जयवंत परूळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (८.४.२०२६)