‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य समाजात सर्वत्र पोचावे’, या तळमळीने सेवा करणार्‍या मिरज, जिल्हा सांगली येथील कै. (सौ.) उमा लेले (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७२ वर्षे) !      

सनातन संस्थेच्या मिरज (जिल्हा सांगली) येथील साधिका सौ. उमा यशवंत लेले (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७२ वर्षे) यांचे ७.४.२०२६ या दिवशी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई आणि नात, असा परिवार आहे. १६.४.२०२६ या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी झाला आणि १८.४.२०२६ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. कै. (सौ.) उमा लेले यांची सहसाधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

सौ. उमा यशवंत लेले

१. सुश्री सुरेखा आचार्य (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६९ वर्षे), मिरज, जिल्हा सांगली.

१ अ. आनंदी आणि उत्साही : ‘लेलेवहिनी नेहमी आनंदी आणि उत्साही असत. त्या प्रतिकूल परिस्थितीत समाधानी राहून साधना करत असत.

१ आ. सत्संग, सेवा आदींची तळमळ असणे : लेलेवहिनींना सत्संग, सेवा आणि साधकांना भेटणे, यांची पुष्कळ तळमळ होती. त्यांचा मुलगा योगेश्वर हा गतिमंद आहे; पण कितीही अडचणी असल्या, तरी त्या मुलाला घेऊन प्रत्येक सत्संगाला उपस्थित रहायच्या. त्या प्रत्येक सेवा परिपूर्ण करायच्या.

१ इ. सौ. लेलेवहिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात राहून गुरुकार्याचे चिंतन करायच्या.

१ ई. ‘गतिमंद मुलाची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्न करणे : लेलेवहिनी मुलाकडून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची घडी घालण्याची सेवा करून घ्यायच्या. प्रत्यक्षात योगेश्वरची शारीरिक स्थिती चांगली नसूनही त्या त्याला सेवेत आणि आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायच्या. त्यांना कधी आश्रमात येणे शक्य नसल्यास त्या त्यांच्या वाहनचालकाच्या समवेत योगेश्वरला ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी पाठवायच्या. योगेश्वरही सतत आनंदी असायचा. यावरून ‘लेलेवहिनी स्वतःसह आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही सत्संगात आणि गुरुसेवेत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असत’, हे जाणवते.

१ उ. रुग्णाईत स्थितीत ‘वॉकर’ घेऊन सत्संगाला आलेल्या सौ. लेले यांना साधकांना पाहून भावाश्रू अनावर होणे : एकदा मिरज येथील सनातनच्या आश्रमात सत्संग चालू होता. तेव्हा अकस्मात् लेलेवहिनी ‘वॉकर’ घेऊन त्यांचा वाहनचालक आणि परिचारिका यांच्या समवेत योगेश्वरला घेऊन सत्संगात आल्या. त्या वेळी सर्व साधकांना ‘रुग्णाईत स्थितीतही त्या आश्रमात आल्या’, हे पाहून पुष्कळ आश्चर्य वाटले. साधकांना पाहून वहिनी भावविभोर आणि आनंदी झाल्या. त्यांना भावाश्रू आवरेनात. यातून ‘त्यांच्यातील भावाची स्थिती किती उच्च कोटीची आहे’, हे माझ्या लक्षात आले. ५ मिनिटांनी त्या निघून गेल्या. ‘त्यांची भावाची स्थिती टिकून रहाण्यासाठी देव त्यांना साधकांचा सत्संग देऊन साहाय्य करायचा’, हे मला शिकायला मिळाले.’

२. श्री. महादेव जाधव (गुरुजी) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७४ वर्षे), मिरज, जिल्हा सांगली.

२ अ. नम्रता, प्रेमभाव आणि इतरांविषयी आदर असणे : ‘नम्रता’ हा लेलेवहिनींचा स्थायी गुण होता. त्या कधीही मोठ्या आवाजात बोलत नसत. समाजातील व्यक्ती, तसेच साधक यांच्याशी बोलतांना त्यांच्यातील प्रेमभाव आणि नम्रता प्रकर्षाने जाणवत असे. त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही ‘इतरांशी कसे बोलावे ?’ हे समजत असे. भ्रमणभाषवरही त्या नम्रतेने आणि प्रेमाने बोलून इतरांना आनंद देत असत. इतरांविषयी असणारा आदरही त्यातून व्यक्त होत असे.

२ आ. सेवेची तळमळ : वहिनी सेवा वेळेत, तत्परतेने आणि भावपूर्ण रितीने करत असत. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे कार्य समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोचले पाहिजे’, असे त्यांना वाटत असे. गेल्या ४ वर्षांपासून त्या रुग्णाईत होत्या, तरी त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांचे अधिकाधिक वितरण करण्याचा प्रयत्न केला.

लेलेवहिनींच्या निधनाची बातमी कळल्यावर ‘प्रेमभावाची एक मूर्तीच हरवली’, असे मला वाटले.’

३. सौ. शोभा शेट्टी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६८ वर्षे), मिरज, जिल्हा सांगली.           

३ अ. भ्रमणभाषवरून वाचकांच्या संपर्कात रहाणे : ‘लेलेवहिनी भ्रमणभाषवरून वाचकांच्या संपर्कात रहात. त्यांनी विज्ञापनदात्यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून पुष्कळ विज्ञापनेही मिळवली होती. त्या ‘ऑनलाईन’ सत्संगांना नेहमी उपस्थित रहात.

३ आ. आनंदी राहून परिस्थिती स्वीकारणे : रुग्णाईत असल्याने त्या अंथरुणावर पडून असायच्या, तरी त्या नेहमी आनंदी असायच्या. ‘प्रारब्धभोग भोगूनच संपवायला हवेत’, हे त्यांनी मनापासून स्वीकारले होते.

‘सकारात्मक राहून परिस्थिती कशी स्वीकारावी ?’, हे मला लेलेवहिनींकडून शिकायला मिळाले. यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !’

४. श्री. किरण कुलकर्णी (वय ६५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), मिरज, जिल्हा सांगली.   

४ अ. साधनेत सातत्य ठेवून प्रारब्ध शांतपणे आणि अनुसंधानात राहून भोगणे : ‘अनेक दिवसांपासून अंथरुणावर असूनही सौ. लेले यांच्या साधनेत कधी खंड पडला नाही. त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य असायचे. प्रारब्धाप्रमाणे आलेले भोग त्या शांतपणे आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून भोगत होत्या.’

५. सौ. वीणा पानसे, मिरज, जिल्हा सांगली.            

५ अ. रुग्णाईत स्थितीतही सेवेचा ध्यास असणे : ‘सौ. उमा लेले गेल्या ४ वर्षांपासून रुग्णाईत होत्या; मात्र त्यांना सेवेची पुष्कळ तळमळ होती. त्या भ्रमणभाषवरून संपर्क करून अर्पण मिळवत असत. आजारामुळे ‘त्यांची जीभ जड झाल्याने त्या भ्रमणभाषवर काय बोलतात ?’, ते मला समजायचे नाही; पण भ्रमणभाषवर ‘लघु संदेश (मेसेज)’ पाठवून त्या मला अर्पणदात्यांची माहिती देत असत.’

६. श्रीमती मधुरा तोफखाने, सांगली  

६ अ. मृत्यूपूर्वी ५ दिवस आधी सौ. लेलेकाकूंचा भ्रमणभाष येणे, बोलता न आल्याने त्यांनी केवळ ‘परम पूज्य, परम पूज्य’, असे म्हणणे : ‘२.४.२०२६ या दिवशी सकाळी सौ. उमा लेलेकाकू यांचा मला भ्रमणभाष आला होता. तेव्हा त्या काहीच बोलत नव्हत्या; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘काकू, तुम्हाला काय झाले आहे ? काही बोलायचे आहे का ?’’ तेव्हा त्या केवळ ‘परम पूज्य, परम पूज्य’, असे म्हणत होत्या. त्या वेळी त्यांची जीभ जड झाली होती. दुसर्‍या दिवशी मला समजले, ‘लेलेकाकू कोमात (दीर्घकालीन बेशुद्धावस्थेत) गेल्या आहेत.’

७. सौ. मंगल खटावकर, मिरज, जिल्हा सांगली.        

७ अ. पार्थिवाकडे पाहिल्यावर लेलेवहिनींचा चेहरा तेजस्वी दिसणे : ‘लेलेवहिनींचे निधन झाल्याचे कळल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता आणि ‘त्या शांतपणे झोपल्या आहेत’, असे वाटत होते. त्यांच्या घरात चांगले वाटत होते.’

८. वैद्या श्रीमती मृणालिनी भोसले, मिरज, जिल्हा सांगली.

८ अ. मनमिळाऊ आणि प्रेमळ : ‘लेलेवहिनींचा स्वभाव मनमिळाऊ होता. ‌सर्व साधकांविषयी त्यांच्या मनात पुष्कळ प्रेम होते. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रवचनासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी त्या बर्फी करून आणत असत. ती बर्फी फार छान असे.

८ आ. ‘प्रतिकूल परिस्थितीतही सेवा कशी करता येईल’, असा विचार असणे : लेलेवहिनींमध्ये समष्टी सेवेची पुष्कळ तळमळ होती. साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्या एकट्याच मिरजेतील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या मारुति मंदिरात प्रत्येक शनिवारी ग्रंथप्रदर्शन लावत असत. त्या प्रत्येक सेवा भावपूर्ण रितीने करत. ‘प्रतिकूल परिस्थितीतही सेवा कशी करता येईल’, असा त्यांचा विचार असायचा. त्यांचा मुलगा योगेश्वर याला समवेत घेऊनच त्या सेवा करायच्या.

८ इ. शरिराची थोडीसुद्धा हालचाल होत नसतांनाही लेलेवहिनींच्या चेहर्‍यावर वेदनेचा लवलेशही नसायचा.

८ ई. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे : लेलेवहिनींच्या मृत्यूनंतर मी त्यांच्या घरी गेले. तेव्हा श्री. लेलेकाका, वहिनींची मुलगी सौ. रेवती, मुलगा श्री. योगेश्वर आणि कु. तन्वी (नात, मुलीची मुलगी कु. तन्वी पेठे, आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १० वर्षे) हे सगळेच अतिशय शांत होते. वहिनींचा चेहरा तेजस्वी आणि शांत दिसत होता. त्यांच्या चेहर्‍यावर साधनेचे तेज दिसत होते. त्या वेळी ‘त्यांनी मृत्यूही आनंदाने स्वीकारला आहे’, असे मला जाणवले.

‘यापुढेही लेलेवहिनींची उत्तरोत्तर प्रगती होत राहू दे’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’

(लिखाणाचा दिनांक : ११.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक