चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. मला या महायज्ञाला उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले. महायज्ञाच्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

१. त्रास न्यून झाल्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सौ. संध्या जामदार

१ अ. यज्ञाच्या २ दिवस आधी डोके, हात-पाय इत्यादी अवयव जड झाल्यासारखे वाटणे आणि निश्चयपूर्वक सेवेला गेल्यावर त्रास न्यून होणे : १५.५.२०२६ या दिवशी सकाळी उठल्यावर मला माझे डोळे, डोके, हात-पाय इत्यादी अवयव जड झाल्यासारखे वाटले. माझी मानही जड झाल्यामुळे मला मागे वळून बघता येत नव्हते. मागे वळून बघण्यासाठी मला माझे पूर्ण शरीर वळवायला लागत होते. ‘कितीही त्रास झाला, तरी सेवेला जायचे’, असा निश्चय करून मी यज्ञस्थळी सेवेला गेले. संध्याकाळपर्यंत मला होणार्‍या त्रासाची तीव्रता न्यून झाली.

१ आ. यज्ञाच्या दिवशी डोके आणि हात-पाय जड होणे अन् प्रार्थना करून त्रासदायक शक्तीचे आवरण काढल्यावर बरे वाटू लागणे : १७.५.२०२६ या दिवशी महायज्ञाच्या वेळी आहुती दिली जात असतांना पुन्हा माझे डोके आणि हात-पाय जड झाले. तेव्हा मी श्री राजमातंगीदेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्या चरणी प्रार्थना करून माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढले. त्यानंतर आणि महापूर्णाहुती झाल्यानंतर हळूहळू मला बरे वाटायला लागले.

२. अन्य अनुभूती

अ. महायज्ञाच्या आदल्या दिवसापासून, म्हणजे १६.५.२०२६ पासूनच मला महायज्ञाचे चैतन्य जाणवू लागले होते.

आ. यज्ञस्थळी गेल्यावर ‘तेथे सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला जाणवत होते. महायज्ञापूर्वी शंखनाद झाल्यावर मला तेथील वातावरण चैतन्यमय झाल्याचे जाणवले.

इ. प्रथम सर्वांकडून प्रार्थना करून घेण्यात आली. त्यानंतर श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’ म्हटले. त्या वेळी माझी लढाऊ वृत्ती जागृत झाली.

ई. श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे अनुयायी यज्ञाच्या वेळी मंत्रोच्चार करत होते. तेव्हा मंत्रांचा शुद्ध उच्चार आणि स्पष्ट लयबद्ध आवाज ऐकून माझ्या मनाला पुष्कळ आनंद अन् उत्साह जाणवला.

उ. देवीची आरती होत असतांना मला देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न दिसत होती आणि ‘ती आनंदाने सर्वांना आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.

या अनुभूतींबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. संध्या जामदार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक